आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्टकाळात दिलासा : उत्तर महाराष्ट्र, खान्देशातील धरणे तुडुंब;  नांदूर मध्यमेश्वर मधून 58 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा ही दोन्ही महत्त्वाची धरणे अनुक्रमे ८० आणि ८७ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि. २९) पाणी विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ४ हजार १६१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातून शनिवारच्या ३ हजार १४९ पाणी विसर्गात वाढ करत तो १३ हजार ५८ क्युसेक अन् नंतर १६ हजार ६८८ क्युसेक करण्यात आली. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही ४५ हजार २३४ क्युसेकने पाणी गोदावरीमार्गे जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. दरम्यान, पाऊस कायम असल्याने विसर्गवाढीचीही शक्यता आहे. नांदूर मध्यमेश्वर मधून मंगळवारी सकाळी 10 वाजता 58 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.  त्यामुळे गोदावरीसह दारणा नदीकाठच्या रहिवासी व दुकानदारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 


त्र्यंबकेश्वरमध्ये मागील तीन दिवसांत चारशे मिलिमीटर पाऊस कोसळला. बहुतांशी हा परिसर शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. जलसाठाही ८० टक्क्यांपर्यंत पोहाेचला. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नियमानुसार जुलैअखेर आवश्यक असलेला पाणीसाठा विचारात घेता अन् खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडले जात आहे. सोमवारी दुपारी २ वाजता धरणातून एक हजार क्युसेकने पाणी सोडले. साडेतीन वाजता पाण्याची अावक लक्षात घेता हा विसर्ग ३५०० क्युसेक केला. ४ वाजता तो ४१६१ क्युसेक केला.  दारणातून १६ हजार ६८८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. कडवा आणि पालखेडमधूनही पाणी सोडावे लागल्याने नांदूर मधमेश्वरमधून ४५ हजार २३४ क्युसेकने जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाकाठावरील रहिवासी, दुकाने, व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने संबंधितांना सूचना दिली असून लाऊडस्पीकरद्वारेही त्याची माहिती देण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

 

हतनूर धरण क्षेत्रात ४७२ मिमी पाऊस; सर्व ४१ दरवाजे उघडले

तापी, पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
 

भुसावळ - हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४७२ मिमी पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी ३ वाजता धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग करण्यात आला. प्रती सेकंद १ लाख ७० हजार ५६० क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडल्याने तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गोपाळखेडा, लोहारा, देडतलाई, टेक्सा, चिखलदरा व बऱ्हाणपूर आदी स्थानकांवर २४ तासांत ४७२ मिमी पावसाची नोंद झाली, तर सोमवारी सकाळी ८ ते १२.३० वाजेपर्यंत १४६ मिमी पाऊस झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या नोंदीतही २३ मिमी पाऊस झाला. यामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला. धरणातून पाण्याचे सहज उत्सर्जन व्हावे यासाठी सकाळी २४ दरवाजे अर्धा मीटरने, तर १२ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. मात्र, पाण्याचे प्रमाण वाढल्याने दुपारी ३ वाजता सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडून विसर्ग केला जात आहे.  

 

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मार्गिकेचा भाग खचला
रायगड -
गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातले जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचा भाग खचला आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. घाटमाथ्यावरून कोसळणारे पाणी आणि मार्गाच्या खालच्या बाजूला कोसळलेली दरड यामुळे हा मार्ग खचल्याचे समोर आले आहे. 

 

उत्तर महाराष्ट्रातील धरणांतून विसर्ग (क्युसेक)
> गंगापूर      ४ हजार १६१
> दारणा     १६ हजार ८८८ 
>  भावली     १ हजार ५०९ 
> { कडवा     १० हजार ९९८ 
>  पालखेड     ४ हजार ७००
>  पुनद     २ हजार ८९५
>  नांदूर मधमेश्वर     ४५ हजार २३४

बातम्या आणखी आहेत...