टीकास्त्र / शौर्य व त्यागाच्या किल्ल्यांवर ‘छमछम’ खपवून घेणार नाही; शरद पवार यांचा इशारा

 परभणीतील बैठकीत नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून प्रहार

Sep 20,2019 08:19:00 AM IST

परभणी - छत्रपतींच्या शौर्य व त्यागाचा इतिहास असणाऱ्या गडकिल्ल्यांवर छमछम नाचवण्याचा या सरकारचा घाट कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देतानाच नव्या पिढीसमोर काय इतिहास ठेवणार, असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे दिला.


वसमत रस्त्यावरील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी या विषयांवर केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली. व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आ.विजय भांबळे, बाबाजानी दुर्राणी, डॉ.मधुसुदन केंद्रे, रामराव वडकुते, महिला अध्यक्षा फौजिया खान, जि. प. अध्यक्षा उज्वला राठोड, भावना नखाते, प्रदीप सोळंके, माजी महापौर प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार आदींची प्रमुख उपस्थिती होती.


पवार म्हणाले, संघर्षाची तयारी आपण नेहमीच ठेवली आहे. राज्यात परिवर्तनाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांना सामान्य माणसाची काळजी नाही. आजमितीला १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही हे सरकार मदतीला तयार नाही. शेतमालाला भाव न देताच पाकमधील कांदा व साखर आयात केली जात आहे. कारखानदारी बंद पडत आहे. बेरोजगारी वाढत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याऐवजी सरकार निवडणूक आली की पाकचा मुद्दा काढून लोकांना भावनिक बनवत आहे, असा आरोप पवार यांनी केला.

जाणाऱ्यांची चिंता नाही

पक्षांतर करणाऱ्यावर बोलताना १९८० मध्येही ६० आमदार निवडून आणले असताना ५२ आमदार पक्ष सोडून गेेले. परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ही मंडळी भुईसपाट झाली. त्याचाच प्रत्यय याही वेळी येईल. त्यामुळे जाणाऱ्या माणसांची चिंता वाटत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींचा इतिहास विस्मरणात
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांची स्मारके हे सरकार उभारू शकले नाही, उलट शिवरायांचे नाव घेऊन धंदा सुरू ठेवला आहे. ही माणसे फसवी आहेत. तरुणांनी हे लक्षात घेऊन येणाऱ्या निवडणुकीत आपली भूमिका बजवावी, असेही आवाहन पवारांनी केले. या वेळी आ. दुर्राणी, आ. भांबळे, डॉ. केंद्रे, फौजिया खान यांनी मनोगत व्यक्त केले.

आजच्या छत्रपतींची शरणागती
छत्रपती उदयनराजे यांच्यावर टीका करताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आजचे छत्रपती आपल्या इतिहास विसरले आहेत की काय, असा प्रश्‍न उपस्थित करीत २१ व्या शतकातले छत्रपती शरण गेले आहेत. त्यामुळे इतिहास काय सांगायचा हा प्रश्‍न निर्माण होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची पेक्षा छत्रपतींचा वंशज होण्याचा मान मोठा असल्याचे मुंडे म्हणाले.

कार्यकर्ते पोलिसांत बाचाबाची
कार्यकर्त्यांना बैठकीचे ठिकाण अपुरे पडले होते. त्यातच समोरील भाग डी झोन मुळे व्यापला गेला होता. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या भागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यानंतर कार्यकर्ते व पोलिसांत चांगलीच चकमक उडाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करीत पोलिसांना कार्यकर्त्यांना डी झोनमध्ये बसू देण्यास सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना भेट देण्यासाठी आणलेली तलवार नेण्यास पोलिसांनी अडवल्यानंतर चांगलीच बाचाबाची झाली. मुंडे यांनी पुन्हा मध्यस्ती करीत कार्यकर्त्यांसह ती तलवार व्यासपीठावर आणून भेट देण्यासाठी सहाय्य केले.

X