आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचा ‘यू टर्न’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रातील भाजपच्या पूर्वसुरींनी शिवसेना नेतृत्वाला याेग्य सन्मान दिला, त्यामुळे गेली २५ वर्षे युती टिकली. शिवसेनेनेदेखील फारशी अपेक्षा ठेवली नव्हती. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत भाजपला केंद्रात बहुमत मिळाल्यानंतर तरी सन्मान मिळावा, ही शिवसेनेची अपेक्षा गैर नसावी. परंतु गेल्या साडेचार वर्षात दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी सलाेख्यावर भर देण्याएेवजी प्रसंगाेपात एकमेकांचे उट्टे काढण्यात धन्यता मानली. एकीकडे सत्ताविरह अनुभवलेल्या काँग्रेस अाणि राष्ट्रवादीने लाेकसभेसाठी अाघाडी केली. अर्थातच त्यांच्यातील मतभेद-विसंवाद मिटला असे मुळीच नाही; परंतु राजकारणात मुरलेल्या या पक्षाच्या नेत्यांनी राजकीय समज दाखवून दिली अाहे. मात्र, दुसऱ्यांदा सत्ता मिळवलेल्या भाजप-शिवसेना युतीचे नेते सत्तेत वाटेकरी असले तरी राजकीय अाखाड्यात परस्परांसमाेर शड्डू ठाेकून उभे अाहेत. दाेन्ही पक्षांतील खासदारांच्या नजरा युतीकडे लागलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात युती हाेईल की नाही, याविषयी त्यांनाही खात्री वाटत नाही. गेली साडेचार वर्षे युतीच्या राजकीय कलगीतुऱ्याने राज्यातील जनतेची करमणूक केली असली, तरी लातूरच्या सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेला ‘पटक देंगे’चा इशारा उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागला नसता तरच नवल. ‘शिवसेनेला पटकवणारा जन्माला यायचा अाहे, लेचेपेचे समजू नका; अाम्ही लाटेची वाट लावताे,’ असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी करताच अपेक्षेप्रमाणे भाजपच्या गाेटात खळबळ उडाली अन्् काेल्हापुरातील अाढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ‘यू टर्न’ घेणे भाग पडले. वस्तुत: लाेकसभेसाठी भाजपला शिवसेनेची जशी गरज अाहे, तशीच विधानसभेसाठी शिवसेनेला भाजपची गरज अाहे, हे तितकेच खरे. मात्र, जागावाटपाच्या डावात एक-दुसऱ्याला ‘अासमान’ दाखवण्याच्या इराद्याने दाेघेही इरेला पेटले अाहेत, हेच यातून ध्वनित हाेते. ‘युतीच्या फाॅर्म्युल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिक्कामाेर्तब केले अाहे. मतविभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युती व्हावी असा अामचा अाग्रह अाहे. जेथे जागांचा प्रश्न निर्माण हाेईल तेथे केंद्रीय पातळीवर चर्चा व्हावी,’ हे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे विधान बरेच सूचक ठरते. रामदास कदम यांनी ‘शिवसेनेला पटकवू पाहणाऱ्यांना गाडून टाकू’ असा खरमरीत इशारा दिला असला तरी चंद्रकांत पाटील, माधव भंडारी यांनी अतिशय संयत भूमिका घेतली, याचाच अर्थ शिवसेनेसाेबतचे संबंध विकाेपाला गेले असले तरी भाजप अाशावादी अाहे. ‘रालाेअा’तील गळतीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी कधी नव्हती इतकी शिवसेनेची गरज भाजपला वाटत अाहे, हे त्यामागचे मूळ अाहे. 
बीडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भलेही ‘युती गेली खड्ड्यात’ म्हटले असले तरी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत काेण खड्ड्यात जाणार, याची पुरेशी जाण युतीच्या नेत्यांना नक्कीच असावी. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत भाजपने २३, शिवसेनेने १८ जागांवर मिळवलेले यश हा युती पर्वातील विक्रम ठरावा. परंतु, सद्य:स्थितीत युतीला २०-२२ जागांवर समाधान मानावे लागू शकते. कदाचित युती झाली नाही तर शिवसेनेचे काही खासदार, अामदार भाजपचा झेंडा हाती घेऊ शकतात हे उद्धव ठाकरे यांनी हेरलेले असावे. उल्लेखनीय म्हणजे शिवसेनेला अाजवर विधानसभेच्या ८० पेक्षा अधिक जागा जिंकता अाल्या नाहीत. 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १२२, शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, त्या वेळी शिवसेना नेतृत्वाने मुत्सद्दीपणा दाखवला असता तर कदाचित मुख्यमंत्री शिवसेनेचा राहिला असता. वस्तुत: ३५ जागा अशा हाेत्या की ज्या शिवसेनेला कधीच जिंकता अाल्या नाहीत. त्यापैकी १०-१५ जागांची मागणी भाजपने केली हाेती. कदाचित १३५ जागा लढवूनही भाजपला १२२ जागा जिंकता अाल्या नसत्या. १५३ जागा लढवूनही भाजपपेक्षा अधिक जागा शिवसेनेच्या खात्यावर राहिल्या असत्या. तात्पर्य, सत्ता मिळवायची तर अहंकार दाबून ठेवणे अाणि याेग्य समीकरणांनी राजकीय गणिते साेडवणे अपरिहार्य असते. मात्र, नेमके याकडे दुर्लक्ष झाले. अलीकडच्या काळातील युतीच्या नेत्यांतील खडाखडी पाहता अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा 
२०१४ मधील अहंमन्यता उसळी घेत असल्याचेच दिसून येते. अर्थात, शिवसेनेचा खरा विराेध भाजपला नव्हे तर माेदी-शहांच्या भूमिकेला अाहे. शिवसेना नेत्यांकडून पंतप्रधान माेदींवर सातत्याने टीकास्त्र साेडले जात असले तरी भाजप प्रत्युत्तर देत नाही. कारण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह अन्य लहानसहान पक्षांसाेबत वेगळी चूल मांडली तरी भाजपला पुरेसे बळ मिळण्याची फारशी शक्यता नाही. म्हणूनच साेलापूरच्या सभेत पंतप्रधान माेदींनी शिवसेनेचा नामाेल्लेख न करण्यामागचा अर्थही समजून घेतला पाहिजे. पराकाेटीची कटुता निर्माण झालेली असली तरी प्रसंगी भाजप-शिवसेनेची युती घडवण्यात कदाचित माेदीच महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...