मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी 14 संपत्तींवर येणार जप्ती...

तस्करी विरोधी संस्थेद्वारे या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे

दिव्य मराठी

Apr 24,2019 06:51:00 PM IST

रत्नागिरी- भारताचा मोस्ट वॉन्टेड क्रिमीनल दाऊद इब्राहिम आणि त्याची बहिण हसीना पारकर यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त केल्यानंतर आता त्याचे मुळ गाव कोकणातील संपत्तीवरही जप्ती येणार आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात मुंबके गावात असलेल्या 14 मालमत्तेचा लिलाव लवकरच केला जाणार आहे. तस्करी विरोधी संस्थेद्वारे या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे.


रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या मुंबके गावात दाऊदचा बंगला आहे. तीन मजली असलेला हा बंगला दाऊदची आई अमिना आणि बहीण हसीना पारकर यांच्या नावे आहे. याशिवाय दाऊदच्या मुंबके गावात विविध ठिकाणी 14 जमिनी आहेत. या सर्व मालमत्तांची खरेदी गुन्हेगारी पैशातून करण्यात आली आहे.


खेडमध्ये असणारा तीन मजली अलिशान बंगला हा दाऊदच्या बहिणीच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावावर आहे. सध्या दाऊदचे संपूर्ण कुटुंब मुंबईतील पाकमोडीया स्ट्रीटवर असलेल्या फॅल्टमध्ये राहते. पण दाऊदचे कुटुंबब 1980 दरम्यान खेडच्या बंगल्यात राहायचे. त्यानंतर 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भितींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असे असले तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.


विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरुन 38 वर्षांपूर्वी दाऊदचा हा बंगला सरकारद्वारे सील करण्यात आला होता. पण काही वर्षांपासून या बंगल्यात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याचा पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या घराकडे काही पोलिसांना तैनात केले आणि याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सूचना केल्या. आता हा बंगला अत्यंत जीर्ण झाला असून तो कधिही कोसळू शकतो. त्यामुळे हा बंगला ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच याबाबतचे पत्रही ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.


काही महिन्यांपूर्वी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील नागपाडा विभागात असणार हा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला होता. त्यानंतर आता तस्करी विरोधी संस्थेने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या 14 मालमत्तांची किंमत ठरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कुख्यात डॉन दाऊदच्या गावातील 14 मालमत्तांवर लवकरच जप्ती येणार आहे.

X