आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दशावताराचे भीष्माचार्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘रात्री राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा..’ असे समीकरण बनलेल्या दशावतारी नाट्यकलेला बाबी कलिंगण यांनीच खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप दिले. ख्यातनाम दशावतारी कलावंत राष्ट्रपती पदक विजेते बाबी कलिंगण यांचा जन्म नेरूरगावचा. घरात गरिबी, शेतीवाडी नाही. लहानपणी वाण्याच्या दुकानात पुड्या बांधत असताना रात्री दशावतार पाहून त्यांना त्याची ओढ लागली. पण दशावतारात मोठी भूमिका कोण देणार? मग पेटारा उचलण्यापासून, गणपतीसमोर चादरीचा पडदा धरणे, अडीअडचणीला झांज वाजवण्यापासून, ‘बिलिमारा' ह्या स्त्री भूमिकेपर्यंत त्यांचा प्रवास झाला. रात्री बारापासून उजाडेपर्यंत प्रेक्षकांत तळी फिरवण्याचे काम ते करत. मात्र, त्यांचे कान रंगमंचावरील दशावताऱ्यांच्या संभाषणाकडे असायचे. एकलव्यासारखी त्यांनी दशावतारी कलेची साधना केली व पुढे प्रथम स्त्री भूमिका व नंतर कधी खलनायक, तर कधी शंकर, हनुमान, भक्त पुंडलिकाच्या आईची भूमिका आणि विनोदी अशी कोळ्याची भूमिका त्यांनी अजरामर केली.  शब्द सामर्थ्याने, नजरेने, देहभाषेने प्रेक्षकांना बांधून ठेवायचं कसब त्यांच्याकडे होतं. अंगावर भरजरी वस्त्रे आणि चेहऱ्यावर रंग लावून जेव्हा ते आपल्या एंट्रीपूर्वी आरशात प्रतिबिंब पाहत तेव्हा त्यांच्यातला बाबी नाहीसा होऊन त्या देहात गंधर्वाचा प्रवेश होत असे. ‘एकदा तोंडाक रंग लावलो की आम्ही आमचे राहत नाही. तो जो कोण आसा तो आमच्या मुखातून बोलता. नाटक संपल्यानंतर आमका विचारा. सभेत तू काय बोललंय. आमका आठवाचा नाय.' सर्वच दशावतारी कलावंतांची हीच भावना असते. २० डिसेंबर २०१२च्या रात्री कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातल्या ‘डामरे' गावात रवळनाथाच्या जत्रेत बाबी कलिंगण यांच्या “कलेश्वर दशावतार नाट्यमंडळा'चा दशावतार रंगला होता. रात्री बाराच्या सुमारास देवळात आडदशावतार सुरू झाला तो दीडच्या सुमारास संपला. आता उत्तररंगास सुरुवात होणार होती. मात्र, रंगपटातल्या पेटाऱ्यातल्या गणपतीसमोरच्या बाबीच्या नेहमीच्या विश्रांतीच्या जागीच त्याला कायमची विश्रांती मिळाली. दीडच्या सुमारास रंगपटात बाबींचं हृदयविकारानं निधन झालं. 

बातम्या आणखी आहेत...