आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अंत्यविधीनंतर हेल्मेटचा दशक्रिया विधी, पिंडेला कावळाही शिवला, कृती समितीकडून आंदोलन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती लागू केल्याने नागरिकांनी विविध प्रकारे हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलने सुरू केली आहेत. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पाच दिवसांपूर्वी कोंढवा परिसरात हेल्मेटचा अंत्यविधी करत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर मंगळवारी पुण्यातील वैकुंठ सम्शानभूमीत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने पुजाऱ्याच्या साक्षीने हेल्मेटचा दशक्रिया विधी कार्यक्रम पार पाडत यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या वेळी हेल्मेट विरोधी कृती समितीचे शिवसेना माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, भाजपचे नेते संदीप खर्डेकर, नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

 

काकडे म्हणाले, गेल्या चार ते पाच दिवसांत वाहतूक पोलिसांनी पुण्यात हेल्मेट न घातल्याबद्दल दुचाकीस्वारांना प्रत्येकी 500 रुपये दंड करून अडीच ते तीन कोटी रुपये दंड गोळा केला आहे. पोलिसांचे काम दंडवसुली करण्याचे नसून वाहतुकीला शिस्त लावणे, वाहतूक नियमांचे प्रबोधन करणे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हेल्मेट सक्ती विरोधी समितीचे आंदोलन दडपण्याचा पुण्याचे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पोलिस खाते प्रयत्न करत आहेत. पोलिस आयुक्त कार्यालय समोर, अलका टॉकीज, टिळक पुतळा येथे समितीच्या वतीने आंदोलनाची परवानगी मागण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकारची परवानगी पोलिस देत नसल्याने वैकुंठ स्मशानभूमीत आंदोलन करावे लागत असल्याचे ते म्हणाले.

 

हेल्मेटच्या पिंडेला कावळाही शिवला  
कोंढवा येथे हेल्मेटचा अंत्यविधी पार पडल्यानंतर दुखवटा पाळण्यात आला होता. त्यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यविधी झाल्यावर दशक्रियाविधी करणे गरजेचे असते. त्यादृष्टीने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत पुजाऱ्याच्या साक्षीने दशक्रियाविधी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मध्यभागी हेल्मेट ठेवून त्याला हळद-कुंकू, गुलाल-बुक्का, अक्षता वाहून फुले आणि हार वाहण्यात आला. तसेच हेल्मेट घातल्याने मानेचे आजार वाढत असल्याने गळ्याचा पट्टा ठेवण्यात आला होता. तसेच हेल्मेटच्या वापराने केसांची गळती होत असल्याने केसांचा विगही ठेवण्यात आला होता. हेल्मेटसमोर इडली-वडा-बिस्कीट-भेळ असे नैवेद्यही मांडण्यात आले होते. विधी पार पडल्यानंतर भाताच्या पिंडेला कावळाही शिवला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...