आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसांना माणसांचं दु:ख सांगून, पाहूनही कळत नाही, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही अशा संवेदनाहीनतेचं हे युग. अशा गजबजाटात मुक्या प्राण्याची तडफड कुणाला कळणार? बालपणी नकळत घडलेल्या चुकीमुळे आजही मनाची तगमग अनुभवणाऱ्या संवेदनशील कवी दासू वैद्य यांची आठवण  

 

आमच्या गावात दरवर्षी शिवरात्रीला मोठी जत्रा भरायची. मठ गल्लीचा रस्ता आणि पोलिस स्टेशन समोरची मोकळी जागा जत्रेमुळे गजबजून जायची. गावातली आम्ही मुलं या जत्रेची वाट पाहत असू. घरून मिळतील तेवढ्या पैशांवर जत्रेची मौज अवलंबून असे.बहीण भावंडांना जत्रेसाठी सारखेच पैसे मिळायचे. आकाशपाळण्यात बसणे, गोडी शेव, रंगीत चष्मा, भिरभिर, पुंगी, चेंडूं, अशी खरेदी दरवर्षी व्हायची. एका वर्षी जत्रेत गुलेर विकायला आली. जरा महाग होती. पण मला ती गुलेर घ्यायचीच होती. गुलेर घेण्यासाठी घरी जास्तीचे पैसे मागितले. आई दाद देईना म्हणून बाबांकडे गेलो. बाबांचा सक्त विरोध होता. बाबा म्हणाले, मूर्खा, गुलेर घेऊन पाखरं मारत फिरणारेस का?’ बाबांच्या या वाक्याचा मला अर्थ लागला नाही. मी कशाला पाखरं मारेन? आणि माझ्या गुलेरीनं पाखरू मरेल तरी का? गुलेर घेण्याचा माझा निर्धार पक्का होता. रडून रडून हट्टानं मी गुलेर घेतलीच. ‘वाय’ आकाराच्या चोपड्या लाकडाला जाडजूड रबर लावलेलं. त्या दगडात रबर ठेवण्यासाठी नेमकी जागा केलेली. त्या रबरात दगड ठेवून रबर ताणलं की दगड खूप लांबवर वेगानं जायचा. या गुलेरीचं चांगलंच वेड लागलं. घरी मात्र हे गुलेर प्रकरण कुणालाच आवडलं नाही. मी नदीवर जाऊ लागलो. गुलेर चालवण्यात मी तरबेज नव्हतो. पण नदीवरच्या झाडाझुडपात दगड सोडू लागलो. कशाचा नेम धरायचा नव्हताच. फक्त आपण सोडलेला दगड वेगानं दूरवर जातो याचीच गंमत वाटायची. एक दिवस असंच रबर वेगानं ताणून दगड झाडाच्या दिशेनं सोडला. दोन चार हिरवी पानं वेटोळे घेत खाली आली. गुलेर चालवता येतेय याचा आनंद घेण्यासाठी दगड पुन्हा पुन्हा झाडात मारत होतो. पानं गळत होती. यात एख दगड महाभयंकर ठरला. फांदीत दगड घुसला आणि पाखराचा चित्कार ऐकू आला. मी थांबलो. काही कळायच्या आत फांदीतून वेटोळे घेत एक पक्षी खाली पडला. मी त्या तडफडणाऱ्या पक्ष्याजवळ गेलो. रक्तबंबाळ झालेली ती रानटी चिमणी चोचीची उघडझाप करत होती. मी घाबरलो. पळत जाऊन नदीतलं पाणी ओंजळीत आणलं. चिमणीच्या चोचीत टाकलं.  चिमणीचे पाय अधिक गतीनं हलले. पंखांचीही हालचाल झाली. शेवटचीच. चिमणी शांत झाली. मी भानावर आलो. आपल्या गुलेरीमुळे चिमणीचा जीव गेलाय हे माझ्या ध्यानात आलं. चिमणीचा रक्तबंबाळ मृतदेह बघवेना. म्हणून तिथेच माती उकरून चिमणीला पुरलं. खरं तर तो माझा प्रमाद पुरण्याचा प्रयत्न होता. घरीही जावं वाटेना. नदीत पाय टाकून बसून राहिलो. माशांची हालचाल पाहताना चिमणीची रक्तबंबाळ तडफड जाणवू लागली. मी पाय पाण्याबाहेर काढले. संध्याकाळ भरून आलेली. जड पावलांनी घरी निघालो. घरी देवघरात वडील आरती करत होते. टाळ्या वाजवत आरतीत सामील झालो. पण मनात विचार तोच. वाटलं घडलेलं सांगून टाकावं. शिव्या खाव्यात, मार खावा. आईच्या कुशीत शिरून रडावं. पण हिंमत झाली नाही. वडिलांनी गुलेर घ्यायला केलेला विरोध आठ‌ला. बहिणीनं दिलेल्या प्रसादासारखी ही त्रासदायक घटनाही गिळून टाकली. सांगून टाकलं असतं तर कदाचित मोकळा झालो असतो. मनावरचा ताणही हलका झाला असता. पण तसं घडलं नाही. डोळ्यासमोर चिमणी तडफडत राहिली. पुढं कधी तरी मित्राला ही घटना सांगितली तर मित्र म्हणाला, त्यात काय एवढं, गुलेर पक्षी मारण्यासाठीच असते. माझं मन हे मानायला तयार नव्हतं. खरं तर त्या संध्याकाळी आरतीच्या वेळीच आर्त मनाने ही चूक आई बाबांना सांगून टाकायला हवी होती, पण राहूनच गेलं. आज आई-बाबाही नाहीत. चिमणीची तडफड मात्र सुरूच आहे.