आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठग्स ऑफ लिबर्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस जन्मत: गुन्हेगार नसतो. माळीवाडा गावानजीक समाधी असलेला लाल्या मांग हा एकेकाळचा दरोडेखोरही तसा नव्हता. समाजाकडून मिळालेल्या हीन वागणुकीमुळे तो गुन्हेगारीकडे  वळला होता.वर्णव्यवस्थेविरोधातल्या रागातून हे घडत असल्याने गरिबांना, बायाबापड्यांना त्याने कधी हात लावला नव्हता. त्याचं असणं आणि संपणं हे जातिव्यवस्थेचं फलित होतं...


रंगाबादहून नाशिकच्या दिशेनं निघालं की, माळीवाडा या गावापासून डाव्या हाताला रेल्वे फाटक लागतं. ते ओलांडून थोडं पुढं आलं, की रस्त्याच्या कडेची एक पाटी तुमचं लक्ष वेधून घेते, त्या पाटीवर लिहिलेलं असतं, लाल्या मांग यांची समाधी! या पाटीपासून काही अंतरावर एका शेतात लाल्या मांग याची समाधी आहे. एक झाडाखाली चार धोंडे ठेवलेली आणि थोडंसंच बांधकाम असलेली अशी. त्या समाधीचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आलाय. जीर्णोद्धार म्हणजे, त्या समाधीची काही प्रमाणात डागडुजी करण्यात अाली आहे. मात्र समाधिस्थळी काहीच माहिती मिळत नाही. समाधीपासून थोड्या अंतरावर एक गाव आहे. त्या गावचं पूर्वीचं नाव निझामपूर, असेगाव हे आताचं बदललेलं नाव. या गावात आजही लाल्या मांगाचे दोन भाऊ राहतात. त्यातला भिका मांग हा लाल्याबरोबर अनेक दरोड्यांमध्ये सहभागीही झाला होता. गावात जाऊन थेट त्याच्या भावालाच भिका मांग याला गाठून चौकशी केली, तेव्हा समजलं की, हा लाल्या एक अट्टल दरोडेखोर होता. साधारण १९६०-७०च्या दशकात औरंगाबाद जिल्ह्यात आणि खासकरून गंगापूर तालुक्यात याची मोठी दहशत होती.


भिका मांग सांगत होते की, "आम्ही पाच भावंडं. लाल्या सगळ्यात मोठा. मी तिसऱ्या नंबरचा. माझ्या पाठीवर एक बहीण आणि शेवटी माझा एक भाऊ. आमचे वडील जंगलातून शिंदीचे फाटे तोडून आणायचे. आई-बाप फडे बनवायचे आणि विकायचे. तरीही लेकरांची उपासमार व्हायची. फडे दिले तर लोकं एखादी भाकर द्यायचे, पैसे कोण द्यायचं नाही. पैसे द्यायची तेव्हा पद्धतही नव्हती. एखाद्या भाकरीत कुणाचं पोट भरतं का? हळूहळू आमचा लाल्या मोठा झाला, आई वडिलांनी बनवलेले फडे नाशिक-मनमाड इकडं-तिकडं नेऊन विकू लागला. तेव्हा कुठे जरा पैसे यायला लागले, पोटाला खायला- प्यायला मिळू लागलं. पण गरिबांचं बरं चाललेलं मोठ्या लोकांना बघावतं का साहेब? मग गावात कुणीही मांगट्या म्हणून ओरडायचं, शिव्या घालायचं, ते  ऐकून लाल्याचा संताप व्हायचा. गावात कुणी मांगट्या म्हटलेलंही त्याला चालायचं नाही. आमच्या गावाजवळ रेल्वे फाटक आहे, तिथे एका बड्या माणसाचा बंगला होता. तो लाल्याला लहानपणापासून घालून पाडून बोलायचा, जातीवरून बोलायचा, मग एक दिवस रात्री लाल्या त्याच्या घरात घुसला. त्याला बेदम झोडपला. पळून जावं लागणार हे पक्कं असल्यामुळे लाल्याने सगळं घरही साफ केलं. बस्स तिथून पुढं चोरी आणि दरोडा हे लाल्याचं समीकरण बनलं. 
तब्बल दहा वर्षे लाल्या चोऱ्या करत जंगल शिवारात दिवस-रात्र फिरत राहिला. त्याला भूक लागायची तेव्हा तो कुण्याही शेतात जायचा. शेतात आयाबहिणी असायच्या. हा लांब धुऱ्यावर उभा राहायचा. लांबून आयाबहिणींना भूक लागल्याचा इशारा करायचा. लाल्याला सगळेच ओळखत, त्यामुळे लाल्या बांधावर आला की बाया त्यांच्याकडे असलेल्या भाकरी,हंडाभर पाणी झाडाखाली ठेवून द्यायच्या. लांब जाऊन बसायच्या. त्यानंतर हा लाल्या जेवण करायचा, निघून जायचा. त्याच्या हयातीत लाल्या मांगाने कधीच कुण्या बाईच्या अंगावरलं सोनं हिसकावून घेतलं नाही की मंगळसूत्राला हात घातला नाही. हे तत्त्व लाल्या मांग आयुष्यभर सांभाळत राहिला. म्हणूनच   दरोडे घालूनसुद्धा त्याच्याबद्दल लोकांत घृणा वा तिरस्काराची भावना निर्माण झाली नाही. लाल्या मांगाचं मूळ आडनाव आव्हाड. पण विकृत जातीय मानसिकतेनं लाला आव्हाडचा लाल्या मांग केला. त्यानं त्याच्या उभ्या हयातीत बाईला हात लावला नाही की कधीच कुणाच्या घरात चोर पावलानं लपत छपत येऊन चोरी केली नाही. गुपचूप खिसे कापून पळाला नाही. लाल्या चोरी करायला बेधडक यायचा आणि बेधडक निघून जायचा. कधी कुणाला घाबरला नाही आणि कधी कुणाला त्रासही दिला नाही. लाल्याने आयुष्यात अनेक प्रसंगांत धाडसी दरोडे घातले, पण गरिबाच्या घरात त्याने कधी पाय ठेवला नाही. गरिबाच्या घरात भाकरीच्या पलीकडे त्याने काही अपेक्षा ठेवली नाही. कुणाच्या लेकीचं लग्न असेल, मग ती श्रीमंतांची असो नाही तर गरिबाची, तिथं लाल्याने चोरी केली नाही. त्यामुळे लाल्या या भागातला परोपकारी चोर ठरला. पण जातीवरून मात्र त्याच्या मनात निर्माण झालेली तेढ अखेरपर्यंत कायम राहिली.
लाल्या कधी कधी घरी  यायचा. त्याने एक कुत्री पाळली होती. ती घराच्या वर बसलेली असायची, गावात कुणीही आलं, तर ती भुंकायची नाही, पण पोलिस लांबून येतानाच दिसले की ती जोरजोरात भुंकायची. लाल्या पसार व्हायचा... तिचा ठोका कधीच चुकला नाही, लाल्या घरात असला तरी पोलिसांच्या हाती कधीच लागला नाही. लाल्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं, पण लाल्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात माहीर होता. लाल्याबद्दल एक दंतकथाही चर्चिली जाते. की, एकदा एका गावात लाल्या चोरी करायला गेला. तिथंही त्याने माणसांना बदडलं, पण तेवढ्यात पोलिसांनी त्या घराला घेराव टाकला. लाल्याला आत्मसमर्पण करायला सांगितलं. वाडा तसा मोठा. वाड्यात अनेक कुटुंबं वास्तव्याला होती. त्यातल्याच एक कुटुंबात एक मुलगीही बाळंत व्हायला आली होती. घर बड्या असामीचं असल्यामुळे बाळंतपणासाठी तिथे डॉक्टरही आलेला होता. त्याच घरातल्या एक महिलेच्या लक्षात आलं की, लाल्या आज पकडला गेला तर तो पुन्हा सुटल्यावर आपल्या घरातल्या चार-पाच माणसांना संपवणार. मग त्या महिलेनं लाल्याकडून वचन घेतलं की, तू सहीसलामत बाहेर निघशील, पण वचन दे तू माझ्या घरातल्या माणसांना पुन्हा मारणार नाहीस, लाल्याने वचन दिलं आणि त्या थोड्याफार शिकलेल्या बाईने लाल्याला डॉक्टरचे कपडे दिले. तिनेच बाहेर येऊन पोलिसांना सांगितलं की, तुम्ही थांबा, आत मुलगी बाळंत होत आहे. त्यानंतर तुम्ही या. झालं पोलिस थांबले. मुलगी बाळंत झाली आणि डॉक्टरचे कपडे अंगावर घालून लाल्या पसार झाला. पोलिस मात्र इकडे घर शोधून बेजार झाले. असंही सांगितलं जातं की, पुढे मरेपर्यंत लाल्यानं त्या महिलेशी बहिणीचे आणि आपुलकीचे संबंध जोडले. 


लाल्याचं ठरलेलं होतं, पोलिसांच्या हाती कधी लागणार नाही आणि मेलो तर एक-दोन पोलिस घेऊन मरीन. बस्स तो जसं बोलत होता, शेवटी तेच घडलं. गंगापूर तालुक्यातल्या आंबेगावात लाल्या पोलिसांच्या हाती लागला. त्या वेळच्या जमादाराने लाल्याला मागून घट्ट पकड मारली.जमादार कसलेला होता, त्याची पकड लाल्याला काही सुटता सुटेना. शेवटी लाल्याने नाइलाज म्हणून एका हाताने जांबिया काढला आणि मागच्या मागे जमदाराच्या पोटात खुपसला. त्या झटापटीत काही पोलिस जखमी झाले. लाल्या पोलिसांच्या तावडीतून सुटला, पण जातीच्या मिठीने जन्मापासूनच त्याच्या भोवती मगरमिठी मारली होती. ही झटापट होत असताना सगळं गाव तिथं जमलं होतं. पोलिसांच्या तावडीतून सुटून लाल्या पळून जायला लागला. पण जातीपातीत लोळणाऱ्या गावाने त्याला गाठलं. पकडलं आणि दगडाने ठेचलं. भाई भिका मांग सांगत होता की, "गावातले लोक त्याला मारतानाही मारा मारा लई माजलंय मांगटं असंच म्हणत होते.’ शेवटी लाल्याला छिन्नविच्छिन्न केलं गेलं.  


ज्या जातीच्या त्वेषातून लाल्या दारोडेखोर बनला होता त्याच जातीच्या तीव्र द्वेषाने झुंडीने त्याला मारण्यात आलं. दुसऱ्या दिवशी लाल्याचा बाप आंबेगावात पोहोचला. त्याने आपल्या तरण्याताठ्या पोराचा मृतदेह उचलून आणला. लाल्याच्याच हयातीत घेतलेल्या थोड्याशा शेतावर खड्डा करून त्याला पुरण्यात आलं. आयुष्यभर माणुसकीची तत्त्वं पाळणाऱ्या या दरोडेखोरच्या अंत्यविधीला धाकापोटी कुणीच गेलं नाही. घरच्याच माणसांनी त्याला मूठमाती दिली. लाल्याच्या बायकोनं घाबरून त्याच वेळी गाव सोडलं, पोराबाळांना घेऊन ती लासूरला जाऊन राहू लागली. आज तिची मुलं तिथंच लहानाची मोठी झाली. आता कष्ट करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. खरं तर नंतर चोरीच्या रस्त्याला त्यांच्या घरातलं कुणीही गेलं नाही. वयाच्या २५ व्या वर्षी चोऱ्या करू लागलेला हा लाल्या वयाच्या पस्तिशीत जग सोडून गेला. आज त्याला इतिहासजमा होऊन ४० वर्षे उलटलीत, पण त्याच्यातल्या माणुसकीमुळे आजही त्याचं नाव कुतूहल आणि आदराने घेतलं जातंय!


 लेखकाचा संपर्क : ९९७५३०६००१

बातम्या आणखी आहेत...