आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकरांची सरणवाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाडा तालुक्यातल्या आश्रमशाळेत शिकणारी १४ वर्षांची मुलगी कुपोषणाला नुकतीच बळी पडली. हा व्यवस्थानिर्मित सापळा आहे. सापळा लावणारे अनेक आहेत, पण सोडवणारे कमी. मेळघाटात आजवर असे अनेक सापळे लावले गेलेत. त्यात आदिवासी मुलं कुपोषणाला बळी पडताहेत. हिरा बंबई आणि दादरा नावाच्या गावातले आजचे वर्तमान त्याचीच साक्ष देतेय...

 

मुंबई...! कधीकाळची बंबई...! धष्टपुष्ट लोकांची, करोडपतींची...! दादरसुद्धा...! इथे सुखावलेले, धडधाकट आणि सुदृढ लोक सगळीकडे पाहायला मिळतील, याच शहरात लाखो रुपयांचं उष्ट अन्न कचऱ्यात फेकलं जात असेल... इकडे मेळघाटातही मुंबई नावाशी साधर्म्य असलेली हिरा बंबई आणि दादरा नावाची गावं आहेत. मेळघाटातल्या धारणी तालुक्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर दूर. यातलं हिरा बंबई हे हजार दीड हजार लोकसंख्येचं आणि दादरा हे हजारभर लोकसंख्येचं. या गावांची नावं मुंबईशी मिळतीजुळती असली तरीही इथली परिस्थिती मुंबईच्या नेमकी उलट आहे. थकलेली, आजारी, हातपायांच्या काड्या झालेली लहान लहान मुलं या गावात प्रत्येक घरात सापडतील. त्यातलं एखादं मूल खोकतंय, तर एखाद्या मुलाला ताप चढलाय, आणि आजारी मुलाला अढ्याला टांगलेल्या झोक्यात घालून त्याची आई हताशपणे झोका देतेय...या घडीला एकट्या हिरा बंबईत २१ मुलं तीव्र कुपोषित आहेत, तर दादऱ्यात १३ मुलं.

 

पण, गेल्या  तीस वर्षांपासून मेळघाटातल्या ३२४ गावांमध्ये हे चित्र नेहमीचंच झालंय.  १९९३ मध्ये संपूर्ण मेळघाटात तब्बल एक हजार पन्नास बालमृत्यू झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी याच  दादऱ्याला भेट देऊन कुपोषणाच्या स्थितीची पाहणी केली होती. पवारांना परतून आता २५ वर्षे उलटलीत, पण या गावातल्या कुपोषणाच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री, मंत्री, राज्याच्या वेगवेगळ्या खात्यांचे सचिव येऊन गेले, पण कुपोषण मात्र ‘जैसे थे’ आहे. ९४-९५च्या आसपास अनेक समाजसेवी संस्थांनी या भागात येऊन काम करायला सुरुवात केली, त्यामुळे दुःख काही अंशी हलकं झालंय, पण लेकरांच्या मरणाची सरणवाट अजून काही थांबली नाही...


मी अमरावती जिल्ह्यातलं परतवाडा मागे टाकून मेळघाटच्या दिशेने निघालो, तेव्हा पाऊस मागेपुढे फटकारे मारत होता. धुक्यात हरवलेली छोटी छोटी गावं दिसत होती. गर्द हिरव्या झाडीत हरवलेला नागमोडी रस्ता वेगाने धावत होता. सोबत उंचच उंच डोंगराचे कडे, धुक्याने गच्च  खोल दऱ्या, कोसळणारे फेसाळ धबधबे... स्वर्ग आणखी काय वेगळा असावा...? पाऊस  पहाडी मेळघाटच्या अंगाखांद्यावर खेळत असतो. याच पावसाने तिथल्या कोरकू आदिवासींची आगळी संस्कृती जन्माला घातलीय. मुक्त जीवनशैली असलेली ही जमात अजूनही समृद्ध आहे. पण याच समृद्ध कोरकू आदिवासींना ९० च्या दशकापासून कुपोषणाचा शापही लागलाय.आज इथल्या पाड्यांवर असं एकही घर सापडणार नाही, की त्या घरात बालमृत्यू झालेला नाही. अशी एकही आई नाही, की तिनं आपलं मूल गमावलेलं नाही. चेलाटी गावातल्या ‘मेळघाट मित्र’ या संस्थेत भेटलेला सखाराम हा आदिवासी मुलगा सांगत होता की, त्याच्या आईला एकूण आठ मुलं झाली होती. त्यातली जगली फक्त चार. त्यातला हा सखाराम एक...!

 

मी जेव्हा हिरा बंबई या गावात पोचलो तेव्हा झिमझिम पाऊस सुरूच होता. इथली घरं तीव्र उताराची छपरं असलेली आणि आखूड दरवाजाची. त्यामुळे घरात सूर्यप्रकाश पोहोचतच नाही. परिणामी घरात सगळीकडे ओल पसरलेली. दारात आणि अंगणात सगळीकडे चिखल.  याच गावात सुनीता भिलावेकर या आदिवासी महिलेचं घर आहे. सुनीता ही २० वर्षांची महिला, एकही वर्ग न शिकलेली. तिची मातृभाषा कोरकू. हिंदी तिला मुश्किलीने येतंय. मराठीची तर तिला खबरबातही नाही. नाकी डोळी नीटस असलेल्या सुनीताचं वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न झालं. आता तिला दोन मुलं आहेत. त्यातला कुपोषित असलेला राम गणेश भिलावेकर हा मुलगा १६ महिन्यांचा आहे. सामाजिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांचं प्रतिनिधित्व करणारं तिचं जगणं आहे. त्याचे दुष्परिणाम मुलांच्या आयुष्यावर होताहेत.  या मुलाला कुठलाच पोषण आहार मिळत नाही. सुनीता सांगत होती की, "अंडी, दूध आणि केळी हे तर आम्हाला अंगणवाडीने कधी दाखवलेच नाहीत...’ खरं तर हा आहे, स्थानिक पातळीवर वाढलेला भ्रष्टाचार आणि प्रशासकीय बेफिकिरीचा ढळढळीत परिणाम.


गावातल्या अंगणवाडी-नंबर-एकमध्ये गोपी पटेल नावाची अंगणवाडी सेविका आहे. अकरा वाजले तरी अंगणवाडीत तिचा पत्ता नाही. तिची मदतनीस निकृष्ट तांदळाची खिचडी शिजवत होती. अंडी नाहीत का? असं विचारलं तेव्हा अंडी फक्त शुक्रवारी देतो पुन्हा नाही देत, असं तिने सांगितलं. शेजारी दोन-तीन मुलं खेळत होती. बाकी अंगणवाडी मात्र ओकीबोकीच होती. काही वेळानंतर प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकेला भेटलो. मीटिंग असल्यामुळे मी सुसरदा या गावी चाललेय, मला वेळ नाही असं तिने सांगितलं. तिला अंडी आणि इतर पोषक आहाराबाबत विचारलं तेव्हा ती म्हणाली, गावात अंडी महाग मिळतात.त्यामुळे सुसरदा या गावी गेले की अंडी पाठवून देत असते. पण तिला जेव्हा याची कल्पना दिली की, तिची मदतनीस फक्त शुक्रवारी अंडी देतो, असं सांगते आहे. तेव्हा मदतनीस खोटं बोलत आहे, असं उत्तर तिने दिलं. मात्र ती ज्या गावातून अंडी पाठवणार होती, त्या गावात जायला तिला एक तास आणि तिथून अंडी यायला एक तास असे दोन तास लागणार होते. म्हणजे, अंडी पाठवली तरी पोचायला दुपारचा एक वाजणार होता. सोबत असलेले दिनेश आणि कालू सांगत होते, की अंडी पाठवायला आता दुपारी बसच नाही. दुसरी वाहनं इकडे येत नाहीत. आता बस थेट संध्याकाळी येते त्यामुळे अंडी काही येणार नाहीत.

 

२०१६-१७ या वर्षात शासनाने मेळघाट परिसरातल्या कुपोषण निर्मूलन आणि आदिवासी विकास कामासाठी तब्बल १९५ कोटी रुपये खर्च केलेत. मात्र आजही गावांची बिकट अवस्था का आहे? धारणी तालुक्यातल्या सुसरदा गावातही एकूण २७ मुलं कुपोषित आहेत. पण एकालाही अंडी किंवा इतर प्रोटीनयुक्त आहार मिळत नाही. या गावात तीन अंगणवाड्या आहेत. त्यातल्या एका अंगणवाडी सेविकेने घरातच किराणा दुकान थाटलंय, तर दुसऱ्या अंगणवाडी सेविकेने ज्या गावात अजूनही खोपटाची घरं आहेत, त्याच गावात अारसीसीचं घर बांधलंय आणि विशेष म्हणजे, तिच्या घराच्या दर्शनी भिंतीला उभी फरशी बसवण्याचं कामंही सुरू आहे. पण गावात मात्र कुपोषणाचा हलकल्लोळ उडालेला आहे.

 

अंगणवाडीने वाऱ्यावर सोडलेली आणि मरणाच्या दारावर पोचलेली अशी असंख्य मुलं धारणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात क्रिटिकल स्टेजल उपचारासाठी दाखल होत आहेत. यातली काही आयसीयूमध्ये तर काही जनरल वाॅर्डात दाखल केली जातात, अत्यंत सीरियस असलेली मुलं पुढं अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात रेफर केली जातात. पण ती मुलं वाटेतच जग सोडून गेलेली असतात. धारणीचं उपजिल्हा रुग्णालय कुपोषित लहान मुलांनी भरून गेलेलं होतं. या रुग्णालयाची क्षमता फक्त ५० खाटांची आहे. पण  २७ ऑगस्ट रोजी इथे तब्बल १२० मुलं उपचार घेत होती. खाटावर, जमिनीवर जागा मिळेल, तिथे आईबाप आपल्या मुलांना घेऊन पडलेले होते. मात्र, इथले डॉक्टर आणि सगळी यंत्रणा रोज दुप्पट आणि तिप्पट क्षमतेने काम करते आहे. नाइट शिफ्ट करून बाहेर पडणारे डॉ. विनय खडसे सांगत होते, की "कधी-कधी २४ तास ड्यूटी करावी लागते. नेहमी शंभरच्या वर पेशंट असतात. स्टाफ मात्र ५० बेडच्या प्रमाणात आहे. रात्री ड्यूटीवर आल्यानंतर या मुलांना तपासण्यात आणि औषध देण्यातच सकाळ होऊन जाते. इतके प्रयत्न करूनही आठवड्याला तीन ते चार बालमृत्यू आम्हाला डोळ्यांनी बघावे लागतात. "मागच्या जुलै महिन्यातच ३१ दिवसांत तब्बल ३७ बालमृत्यू झाल्यामुळे मेळघाटातला धारणी तालुका पुन्हा चर्चेत आला होता. मेळघाटातले बालमृत्यू हे एप्रिल ते एप्रिल असे मोजले जातात, गेल्या एप्रिलपासून ते जुलैपर्यंत या चार महिन्यांतच तब्बल १८४ बालमृत्यू झालेत. त्यातले ५८ बालमृत्यू हे उपजतमृत्यू आहेत. याचं दर दिवसाचं प्रमाण काढलं तर मेळघाटात रोज मावळतीला जाणारा सूर्य, हा किमान दोन तरी बालमृत्यू पाहूनच मावळतो आहे...

 

१९९३ पासून आजपर्यंत मेळघाटात तब्बल ११ हजार ४३६ कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतलाय, तर अजूनही पाच हजाराच्या वर मुलं कुपोषित आहेत. यातले किती जण उद्या जगाचा निरोप घेतील याची कल्पना देता येत नाही. आजघडीला मेळघाटात तब्बल १९४० मुलं तीव्र कुपोषित आहेत आणि सर्वसाधारण कुपोषित मुलांचा आकडा याहीपेक्षा खूप मोठा आहे. मेळघाटच्या जंगलात वाघांना वाचवण्यासाठी सरकार  कोट्यवधी रुपये खर्च करून गावांचं पुनर्वसन करत आहे. पण आठवड्याला तीन ते चार बालकांचा मृत्यू होत असताना आहे ती यंत्रणा राबवण्यासाठी सरकार पारदर्शक प्रयत्न करायला तयार नाही...


मनाला अस्वस्थ करून गेलेले  शेकडो कुपोषित हात नजरेआड करून मी परतीच्या प्रवासाला निघालो. पाऊस धो धो बरसू लागला. गाडी घाट उतरू लागली, दरीत दाटलेलं धुकं पुन्हा काळजात धडकी भरवू लागलं.  मेळघाटात जाणारी ती डोंगरातली धूसर नागमोडी वाट पुन्हा धुक्यात हरवून गेली. तेव्हा मनात सहज प्रश्न आला की, ‘१९९३ मध्ये शरद पवार मुंबईहून मेळघाटातल्या हिराबंबई, दादऱ्यात आले खरे... पण, शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे याच हिराबंबई दादऱ्यात जन्माला आले असते तर ते मुंबईपर्यंत पोचले असते का?...

 

dattakanwate@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९९७५३०६००१

बातम्या आणखी आहेत...