आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामुआण्णांचा एल्गार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवस खूप वाईट होते साहेब, भाकर खायला मिळायची नाही, ढोराचं मटण खावं लागायचं, गावात कुणाचं ढोर मेलं तर बाप ओढून नेहून पांदीला टाकायचा, कातडं काढून घ्यायचा आणि इळ्यानं मटण कापून घरी आणायचा, ते खराब असायचं की चांगलं याचा काही फरक पडायचा नाही, त्याने पोटातली आग विझते एवढंच माहीत होतं. आम्ही तीन-चार भावंडं मिटक्या मारत खायचो, पुन्हा कुणाचं तरी ढोर मरेल, याची वाट पाहायचो’ काळजाला भोक पडणारे हे शब्द आहेत, दामुअण्णांचे...! 

 

आयुष्याची पंचेचाळिशी ओलांडलेले दामुआण्णा आपल्या टुमदार घरासमोर बसून, कातर नजरेने स्वतःच्या आयुष्याची चित्तरकथा सांगत होते. त्यांच्या लहानपणी धूसर कधीतरी मुलं शाळेत जायची. त्यांनाही खूप जावंसं वाटायचं शाळेत. पण शाळा ही महारा-मांगांसाठीही असते, हेच त्यांच्या अडाणी बापाला तेव्हा माहीत नव्हतं. त्यामुळे नाव कधीच शाळेत घातलं गेलं नाही. दामुआण्णाचा बाप गावात गावकी करायचा. सकाळी उठलं की रस्त्यावर पडलेलं शेण उचलायचे अगदी गावभर आणि शिवारभरसुद्धा. तिकडे गावातल्या मुलांची शाळेत जायची लगबग असायची आणि इकडे दामुआण्णा अर्धउघड्या अंगाने बापाच्या मागोमाग रस्त्यावरलं शेण उचलत फिरायचे. शाळेत जाणाऱ्या मुलांबरोबर त्यांनी कधीतरी शाळेत जाऊन बसण्याचा प्रयत्नही केला, पण बापाने हाताला धरून आणून हातात शेणाची पाटीच दिली.

 

सकाळी शेण गोळा करून झालं की सांजच्याला मात्र गावात येसकर पाळी मागायची. "एका हातात दुरडी आणि दुसऱ्या हातात काठी, कंबरेला धोतराचा खोचा घातलेला बाप त्या धूसर अंधारात लोकांच्या दारात थांबलेला आणि 'भाकर वाढा माय' म्हणून आवाज दिलेला बाप मला अजूनही जसाच्या तसा आठवतो.’ हे सांगताना दामुआण्णाचा गळा दाटून येतो. त्याच दाट होत जाणाऱ्या अंधारात दामुआण्णाही बापाच्या मागोमाग रेंगाळायचे. गावभर मागून आणलेले तुकडे घरातल्या चटणीसोबत खायचे... उरलेले तुकडे तसेच बांधून ठेवायचे. कधी कधी त्या तुकड्यांना बुरा चढायचा, जाळ्या धरायच्या पण ते पुसून काढून भाकरीचे तुकडे घशाखाली उतरवण्याशिवाय पर्याय नसायचा. कारण ते टाकून दिलं तर दुसरं काय खाणार...? 

 

सुगीच्या दिवसातलं आणखी एक काम. गावात शिवारभर शेतकऱ्यांचे खळे चालायचे आणि बाप ते खळे मागत फिरायचा. दामुआण्णा पुन्हा बापाच्या मागे असायचेच. खळ्यावरल्या ओंजळ दोन ओंजळ धान्यासाठी बापाला शेतकऱ्यांच्या खळ्यावर राबावं लागायचं, पण त्याचं कधी काहीच वाटायचं नाही. ही सगळी कामं दामूआण्णाचे वडील अगदी निमूटपणे सहन करायचे. त्यांची याबाबत कधीच काहीच तक्रार नसायची. मळकटलेलं फाटकं धोतर अंगावर घालून अठरविश्व दारिद्र्याचा गाडा दामूअण्णााच्या बापाने आयुष्यभर ओढला, आईनेही फाटकं लुगडं ठिगळं मारून आयुष्य काढलं.


हळूहळू घर वाढत गेलं,आईबाप तीन भावंडं. मागून आणलेल्या येसकर पाळीवर आता पोटं भरेनाशी झाली. उपासमार रोजचीच दारात घर करू लागली. तेव्हा दामुआण्णांनी हळूहळू गावातल्या ट्रॅक्टरवर काम करायला सुरुवात केली. ट्रॅक्टर भरण्याची कामं करता करता ट्रॅक्टर शिकून घेतलं, पण बापाला हे काही रुचलं नाही. बापाचा एकच आग्रह गावकी करा, येसकर पाळी मागा, खळे मागा, शेण उचला, पण दामुआण्णांनी बापाच्या चोरून ट्रॅक्टर चालवणं सुरूच ठेवलं. थोडेफार पैसे मिळायचे, घर भागायचं... नंतर दामुआण्णाचे वडील थकले, गावकीची कामं होईनशी झाली. लोक आरडाओरडा करू लागली. दोन भाऊ लहान त्यांच्यावर काही जबाबदारी नव्हती. मोठा असल्यामुळे बापाने गावकी करण्यासाठी दामुआण्णाकडे तगादा लावला, पण हा माणूस काही तयार होईना, लोकांच्या दारात जाऊन ‘भाकर वाढा माय’ म्हणायची, या माणसाची काही तयारी होईना. गावात शेण उचलणं, तर त्याहून महाकठीण. गावकरी दामुअण्णाच्या बापाच्या हात धुऊन माघे लागले. रडत पडत बापानेच कामं सुरू ठेवली, पण घरात मात्र आता बापलेकाचा विसंवाद वाढला आणि गावात दामुआण्णा गुन्हेगार ठरू लागला. जातीच्या वकुबाने न वागणारा माजुरडा वगैरे.


वय झालं. पुढे दामुआण्णाचं लग्नही झालं, पण बापाला आवडत नसलेलं दामुआण्णाचं ट्रॅक्टर चालवणं सुरूच होतं. एक दिवस "कडक थंडीत, बापाने घराबाहेर काढलं. अंगावर नुसतेच कपडे आणि पोटात आग पडलेली. पुढे दामुआण्णाने गावातलं ट्रॅक्टर सोडलं. बाहेर एमएसईबीच्या कामावर लाइट पोलचे गड्डे खोदणे, आणि त्यात पोल उभे करणे, हे कामं सुरू केलं. एमएसईबीत चव्हाणसाहेब नावाचा अधिकारी आयुष्यात आला आणि हुन्नरबाज काम करणारे दामुआण्णा त्यांच्या डोळ्यात बसले. चव्हाणसाहेबांनी दामूआण्णाला बोलावून, त्यांना थेट हे पोल उभे करण्याचा ठेकाच देऊन टाकला. बस्स त्यानंतर दामुआण्णाचं आयुष्य कमालीचं पलटी मारून गेलं. एकही दिवस शाळेत न गेलेल्या या माणसाला टेक्नॉलॉजीची जाम ओढ आणि त्या इच्छेपोटीच दामुआण्णा ट्रॅक्टर चालवायला शिकले होते. त्यांना जेसीबीसारखं ट्रॅक्टर डोक्यात खेळू लागलं किंवा खड्डे करणारं आणि थेट खांब उचलून त्यात रोवणारं एखादं मशीन भेटलं तर...! दामुआण्णाचा शोध सुरू झाला. हा अडाणी माणूस थेट राजस्थानला जाऊन पोचला. तिथून गड्डा खोदणारं आणि थेट खांब रोवणारं मशीन घेऊन हा माणूस महाराष्ट्रात आलादेखील, दामुआण्णाची खासियत ही की महाराष्ट्रातलं किंवा किमान मराठवाड्यातलं तरी गड्डे करून लाइटचे पोल उभे करणारं, हे ट्रॅक्टरवरलं मशीन त्यांनी पहिल्यांदाच आणलं.


झोपड्याच्या घरात राहिलेल्या या माणसाने हळूहळू गावात स्वत:चं एैसपैस घर बांधलं,   दामुआण्णाचा एकट्याचा प्रश्न सुटला, पण गावातले भाऊबंद गरीब लोकं? यांच्या घरी दारिद्र्य मात्र ठाण मांडून बसलेलं. जगणं हलकं करण्यासाठी गावात रेशनिंग दुकान होतं, पण ते बड्या घरच्या माणसाच्या ताब्यात. तिथे सगळा काळाबाजार, रॉकेलही परस्पर विकलं जायचं, गोरगरिबांना शेती नाही. चुलीसाठी जळणफाटा आणावा, तर लोकांच्या शिव्या खाव्या लागायच्या. दामुआण्णाला याची चीड आली. त्यांनी गावातल्या लोकांना सोबत घेऊन अर्ज तयार केला. पन्नास एक जणांच्या सह्या घेतल्या. त्याच लोकांना सोबत घेऊन तहसील कार्यालय गाठलं. तहसीलदारांना अर्ज दिला. आणि पुरवठा अधिकाऱ्याकडे आंदोलनाचा इशारा दिला. जमलेले लोक आणि त्यांचा राग पाहता तहसीलदारने तात्काळ गावात व्हिजिट केली आणि रेशन दुकानदाराचे कान उपटले..! त्यानंतर गावात धान्य वेळेवर मिळू लागलं... 

 

दामुआण्णांना गावात निवडणूक लढवण्याची इच्छा झाली. पण इतक्या इरसाल आणि इमानदार माणसाला निवडून कोण येऊ देईल? निवडणूक लढवण्यासाठी ग्रामपंचायतचं बेबाकी प्रमाणपत्र लागतं, दामुआण्णांनी ग्रामपंचायतला अर्ज केला, तर ग्रामसेवकाने पाणीपट्टी भरायला सांगितली. "मला कधी पाणीच पुरवलं नाही, तर पट्टी कुठून देऊ.?’ हा दामुआण्णांनी सवाल केला. दोघांचं भांडण झालं...! पण दामुआण्णांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवलीच. ‘पण हा जर निवडून आला, तर आपलं दुकान बंद करील' या भीतीतून ग्रामसेवकाने दामुआण्णाच्या विरोधात पैसे वाटले. शेवटी हा लढवय्या माणूस तीन मतांनी पराभूत झाला...!

 

पण त्यांचा संघर्ष मात्र थांबलेला नाही. गावात दलित वस्तीत ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी उभी केली, पण त्याला पाइपलाइनच नाही केलेली, गटार नाले कागदावरच बांधले आहेत. आणि ग्रामपंचायतीचं बांधकाम केलं म्हणून लाखो रुपये सरपंच ग्रामसेवकाने खिशात घातलेत. या सगळ्यांच्या तक्रारी दामुआण्णांनी सरकार दरबारी केल्यात, पण तारखा सुरूच आहेत. याच्या बातम्या पेपरमध्ये छापून याव्यात म्हणून दामुआण्णांनी सगळी कागदपत्रे अनेक पत्रकारांना दिली, पत्रकारांनी ती ठेवून घेतली. दामुआण्णा रोज पेपर चाळत बसले. पण बातमी मात्र कुठेच छापून आली नाही. "इथे इतके घोटाळे तुमच्या पत्रकारांना दिले पण कोण छापत नाही अन् तुम्ही औरंगाबादवरून येऊन माझ्यावर लेख लिहिणार, पण तो छापून आणणार का साहेब.?" हा दामुआण्णाचा सवाल..!

 

कधीकाळी उपासमार सहन केलेला हा अडाणी माणूस शिकायचं स्वप्न उरातच विरून गेलेला. मेलेल्या ढोराचं सडकं मटण, बुरा चढलेल्या भाकरी खाऊन जगणारा आज भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे. ही जिद्द त्याच्यात कुठून आली. ही जिगर त्याला भुकेनं दिली असेल का? खरंतर अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर यांनी लावलेल्या वृक्षाचं दामुआण्णा हे एक फळ आहे...! असे दामुआण्णा प्रत्येक गावात असतात जे न्यायासाठी आणि लोकशाहीसाठी संघर्ष करत असतात. गरज आहे, ती या दीपस्तंभांना आपापल्या परीने सॅल्युट करण्याची... दामुआण्णा हा त्यांच्या गावापुरता का असेना पण एक संघर्षशील योद्धा आहे...!
लेखकाचा संपर्क - ९९७५३०६००१

बातम्या आणखी आहेत...