Home | Magazine | Rasik | Datta kanwate's article lotus boy

लोटस बॉय

दत्ता कनवटे | Update - Nov 11, 2018, 07:13 AM IST

त्याचं नाव आहे, वेल्या...वेल्या लेलसिंग नाईक... पण त्याला सगळे ‘ए पावर' म्हणूनच हाक मारतात.

 • Datta kanwate's article lotus boy
  वेल्या लेलसिंग नाईक...

  त्याचं नाव वेल्या. तोरणमाळ परिसरातला हा एक पावर. पावर म्हणजे सालगडी. वय बारा-तेराच्या आसपासचं. हा दिवसभर गुरं राखतो. मधल्या वेळेत गाडीघोड्यांतून जाणाऱ्या ‘सौंदर्यासक्त’ पर्यटकांना तळ्यात बुडी मारून कमळ तोडून देतो. दुर्गम भागात जगण्याचा संघर्ष पेलणारा हा भारतमातेचा फाटका लेक. आदिवासी विकास, बालकल्याण आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण या तीन योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उधळण करणाऱ्या या महाराष्ट्रात आजही अशी काही मुलं आहेत, याची कल्पना असेल का, “अंत्योदय’ हेच आपले ध्येय मानणाऱ्या या सरकारला? निदान स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी (११ नोव्हेंबर १८८८) साजरा होणाऱ्या शिक्षण दिनानिमित्त या विषयावर आत्मचिंतन होण्यास कुणाची काय हरकत असावी?

  त्याचं नाव आहे, वेल्या...वेल्या लेलसिंग नाईक... पण त्याला सगळे ‘ए पावर' म्हणूनच हाक मारतात. भिलाई भाषेत पावर म्हणजे सालगडी, गुरं राखणारा, पावरा. नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ या गावात भीमसिंग नाईक या आदिवासी शेतकऱ्याच्या घरी तो गुराखी म्हणून काम करतो.


  मी जेव्हा तोरणमाळच्या, कमळ फुलांनी गच्च भरलेल्या तलावावर पोचलो, तेव्हा मला तिथे लेहराई, रणजित, घिशा, येणग्या ही अशी सारी मुलं भेटली. वेल्यासुद्धा त्यांच्यातलाच एक मुलगा. टपोरे डोळे, सरळसोट नाक, चुटुकदार ओठ, दाटबरप केस, दिसायला एकदम रुबाबदार गडी! ही सगळी मुलं तलावावर बसून असतात, पर्यटकांची गाडी दिसली की सुसरीसारखं तलावात उतरायचं, काडकाड कमळाची चार फुलं मोडायची आणि आणून पर्यटकांच्या हातात ठेवायची बस्स... त्याची किंमत फक्त दहा रुपये..! वेल्या त्या सगळ्यांत वयाने मोठा आणि चपळ, त्यामुळे तोच सगळ्यात आधी गाडीपर्यंत पोचायचा! अगदी ओघानेच त्याची विचारपूस सुरू केली. काही बोलतो नाही बोलतो, तोच कुणीतरी त्याला आवाज दिला, ‘ए पावर चल गाडी आयी..!' आवाज कानी पडायच्या आत, वेल्याने अंगावरचे कपडे धाडदिशी बाजूला फेकले, तलावात झेपावला. आणि गाडी थांबवायच्या आधी तर पठ्ठ्या कमळ फुले घेऊन हजर. पण मला मात्र हे, ‘पावर' म्हणजे काय हा प्रश्न पडलेला, गाडी निघून गेली, वेल्या थोडा निवांत झाला नि मग मी त्याला विचारलं, "तेरा नाम तो वेल्या है... तो तुझे पावर क्यों बुलाते?’ तेव्हा वेल्या म्हणाला, "मैं उनके यहां काम करता ना, इसके लिये मुझे पावर बुलाते’
  वेल्याचं आताचं वय फार फार तर १२ वर्षं असेल.

  त्याचं गाव इथून खूप खाली धडगाव तालुक्यातल्या डोंगरात कुठेतरी ३० किलोमीटर लांब आहे. त्याच्या बापाने फक्त ५०० रुपये अॅडव्हान्स घेऊन वेल्याला इथे गुरं राखायला ठेवलंय. वेल्याच्या राखणीला आता जवळपास १२ गुरं आहेत. सकाळी सात वाजता वेल्याचा दिवस सुरू होतो. या गुरांचं शेण काढायचं, त्यांना चरायला जंगलात कुठेही लांबवर घेऊन जायचं आणि सायंकाळी उन्हं थोडी क्षीण होऊ लागली की परतीचा रस्ता धरायचा. या सगळ्या कामाचे त्याला पैसे किती मिळत असतील? तर वर्षाकाठी फक्त तीन हजार रुपये! ही रक्कम दिवसाकाठी फक्त आठ रुपये एकवीस पैसे इतकी मामुली होते. मोठ्या शहरातल्या बाजारात फार फार तर दोन लिंबाची किंमत..! यात फक्त एकच अॅडिशनल गोष्ट त्याला मिळते, ते म्हणजे दोन वेळचं जेवण. या बारा वर्षांच्या पोराला तिसऱ्या वेळी जेवावं वाटलं, तरी ते मिळत नाही, कारण ते त्याच्या करारात बसत नाही.


  पावर रोज सकाळी सात वाजता गुरं घेऊन जातो. इतक्या सकाळी जेवण तयार होत असणार का? म्हणून त्याला सहज विचारलं की, "इतक्या सकाळी जेवून जातोस की डबा घेऊन?’ तेव्हा तो उत्तर द्यायचं टाळू लागला, तरीही जोर लावून विचारलं, तेव्हा तो म्हणाला "कुछ भी ऐसे ही चायपानी पीके जाता’ "तो दिनभर कैसा...?’ माझ्या या प्रश्नावर तो त्रोटक बोलू लागला. पण जे बोलला ते धक्कादायक होतं. हा वेल्या रोज सकाळी फक्त चहा पिऊन ढोरं गुरं सोडतो, डोंगरात जातो. त्याच्या सोबत असते एक काठी आणि दुसरी काडीपेटी. तोरणमाळ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मक्याची शेती होते. वाटेने चालता चालता दोन-चार मक्याची कणसं मोडायची, ती भाजायची, खायची पुढं जायचं, कुठल्या तरी ओढ्याकाठी थांबायचं, दगड उलटेपालटे करायचे, त्याखालचे दोन-चार खेकडे उचलायचे, पुन्हा ते भाजायचे आणि पोटात ढकलायचे. थोडी सवड मिळालीच तर मग मासेही पकडायचे. मग संध्याकाळी मालकाकडे मिळतील त्या भाकरी खायच्या आणि उघड्या अाभाळाखाली बाज टाकून पडायचं. आदिवासी विकास, बालकल्याण आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण या तीन योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उधळण करणाऱ्या या महाराष्ट्रात आजही अशी काही मुलं आहेत.. याची कल्पना तरी असेल का, "अंत्योदय' हेच आपले ध्येय मानणाऱ्या या सरकारला?


  एका मध्यम आकाराच्या दगडावर ढोपर टेकवून वेल्या पुढे कथन करत गेला. त्याला त्याच्यासकट पाच भाऊ, तीन त्याच्यापेक्षा मोठे आणि एक त्याच्यापेक्षा लहान. फक्त लहानच भाऊ शाळेत जातो. वेल्यासकट बाकीचे त्याचे मोठे तीनही भाऊ शाळेत गेलेले नाहीत. त्याचे सर्वात मोठे दोन भाऊ गावाकडे घरचीच शेती कसतात. तर त्याचा तिसरा मोठा भाऊ असाच दुसऱ्या कुणाकडे, तरी पावर म्हणून काम करतो. आई-बाप कधी शेती, तर कधी रोजंदारी करून जीवन जगतात. या वेल्याला त्याच्या बापाने फक्त तीन हजार पगारात वर्षासाठी नोकर ठेवलंय, आणि त्यानं त्याचे फक्त पाचशे रुपये अॅडव्हान्स घेतलेत, कसं धाडस होत असावं खेळत्या वयातलं एक धडधाकट पोरगं असं कुणाच्या तरी दारात टाकून जाण्याचं? किंवा त्यामागचा त्याचा काय आकांत असावा? त्या क्षणी असे सगळे प्रश्न माझ्या मनात पडले, पण त्याचं उत्तर मिळू शकलं नाही, कारण त्याचा बाप इथून लांब ३० किलोमीटर अंतरावर रस्ता नसलेल्या गावात राहत होता. आणि त्याच्या बापाकडे मोबाइल फोनही नाही, की त्याला हे सगळं विचारता येईल! शेवटी उठताना मी वेल्याला एक शेवटचा प्रश्न विचारला की, "तू जर शिकला असतास तर तुला कुठली नोकरी करायला आवडली असती?’ त्यावर तो ताडकन म्हणाला, पोलिस! वेल्याची ही कहाणी वाचून सुन्न झाला असाल, तर मग आता मुमसिंग शेंबडे या पोराची कहाणी वाचा. मुमसिंग हा आता १४ वर्षांचा आहे, दिसायला धिप्पाड, टपोरे डोळे, लांबलचक नाक, जाडजूड ओठ आणि भारदस्त छाती. उभा राहिला तर असा टणक जवानासारखा दिसतो.
  पण तोही एक सालगडीच आहे.

  त्याचं मूळ गाव आहे, नवं तोरणमाळ. तो जेमतेम चार वर्षांचा असेल जेव्हा त्याचे वडील वारले. मग या पोरक्या पोराला घेऊन त्याची आई रुणाबाई तिच्या दूरच्या बहिणीच्या घरी आली. अशीच कशीबशी तीन एक वर्ष लोटली असतील, मुमसिंगच्या आईचं बिरदली पाडा इथल्या एका गड्याशी बस्तान जमलं, नि आदिवासीच्या परंपरेला धरूनच तिने त्याच्याशी लग्न केलं.

  पुढं या सात वर्षाच्या मुमसिंगला याच घरी टाकून आई पहाडीखालच्या बिरदली पाड्यात निघून गेली. मग या मुमसिंगला शाळेत कोण घालतंय? हळूहळू मुमसिंग, दिलीप चौधरी या त्याच्या मावसभावाची गुरं राखू लागला. त्याबदल्यात त्याला सुरू सुरूला तर फक्त दोन वेळची भाकर मिळायची, आता तीनेक हजार पगार मिळू लागलाय! सध्या तो ११ ढोरं आणि ९ बकऱ्या सांभाळतो, दिवस उजाडला की ढोरं सोडायची आणि मावळतीला गेला की घरी परतायचं, गुरं चारत तो कधी कधी खोल जंगलातही गेलाय, अगदी एक महिन्यापूर्वी त्याच्या घोळक्यातली एक शेळी बिबट्याने उचलून नेली,तेव्हा घाबरलेल्या गुरांसह तो आपला जीव वाचवून माघारी पळून आला. अशा घटना त्याच्या आयुष्यात तीन वेळा घडल्यात, पण तरीही त्याला हे सोडून कुठेच निघून जाता येत नाही. कारण त्याला स्वतःचं घर आहेच कुठे? रोज परिसर बदलून कुठंबुठं तो आपली गुरंढोरं चारत असतोच! त्याला सगळे पावर म्हणतात, “तुला याचं वाईट वाटत नाही का?’ असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, “सगळे तेच म्हणतात, सवय पडलीय आता, वाईट वाटून तरी काय करणार?’ ही त्याची हतबलता आहे. किंवा अनाथ अवस्थेतला, हाच त्याचा एकमेव सहारा आहे!


  पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या पदराखाली हे असं काहीतरी कुठंतरी चालू आहे, याची कल्पना नसेल कदाचित. पण जे आहे ते भयानक आहे. एकट्या तोरणमाळ या गावात असे सहा पावर भेटले. जे गुरं राखण्याचं काम करतात. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात असे कितीक तरी पावर असतील. पण हे ज्या मालकाकडे काम करतात, ते सुद्धा आदिवासीच कणीकोंडा करून जगणारे. उद्या कुणाला या सगळ्या प्रकारची कीव आलीच तर ही सगळी मुलं बालगृहात आणि त्यांच्या मालकावर एखादं दुसरी केस टाकून सरकार मोकळं होईल, पण ही सगळी कारवाई अन्यायकारक ठरेल कारण हा उपाय काही त्यांच्या मूळ समस्येवर काम करणारा नसेल!


  वेल्याचे त्यादिवशी तलावावर खूप फोटो काढले, पण गुरांसोबत मला त्याचा एकही फोटो काढता आला नव्हता. म्हणून परत निघण्याच्या दिवशी वेल्याच्या मालकाच्या घरी पोचलो. त्या घरातील एक म्हातारी ढोरं हकलत बाहेर येत होती. मी विचारलं “वेल्या आहे का?’ म्हातारी काहीच बोलली नाही, तिच्या मागून एक लहान मुलगी ढोरं हकलत येत होती, मी तिला म्हटलं “वेल्या को भेजो जरा’ तिही कसंनुसं हसत घरात गेली, मग तिचा बाप बाहेर आला. चालता चालता म्हणाला, “वेल्या भाग गया’ मी म्हटलं, “कैसे? उसके पास पैसा था क्या?’ मालक “नही ओ वैसाच गया, गया होगा चलते चलते!’ म्हणजे, वेल्या तीस किलोमीटर चालत त्याचा घरी गेला असणार! मी पुन्हा विचारलं “अब कैसा?’ मालक म्हणाला “अब कैसा मतलब ओ आयेगा वापीस, उसका पिताजी ला के डालेगा इधर!’ त्याचं हे शेवटचं वाक्य मात्र खूप जळजळीत होतं, वेल्याच्या बापाने ५०० रुपये अॅडव्हान्स जे घेतलेत,त्यामुळे पुन्हा वेल्याला माघार आणून घालणं त्याचा बापाला बंधनकारकच तर होतं.


  पण दुसऱ्या दिवशीच वेल्या का पळाला असेल? माझ्या प्रश्नांनी त्याला विचलित तर केलं नसेल ना? शिकायचं, पोलीस व्हायचं, हे असलं काहीतरी त्याच्या मनात गरगरत तर नसेल ना ?
  वेल्याचा ढोरासोबतचा फोटो न काढताच मी माघारी आलो, आत येऊन मला दोन आठवडे उलटलेत, पण अजून तरी वेल्याची काही खबरबात आलेली नाही...

  - दत्ता कनवटे

  dattakanwate@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९९७५३०६००१

 • Datta kanwate's article lotus boy
  मुमसिंग शेंबडे
 • Datta kanwate's article lotus boy
 • Datta kanwate's article lotus boy
 • Datta kanwate's article lotus boy

Trending