आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाउल : शकलीकरणाचं दस्तावेजीकरण!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशोर कदम उर्फ कवी सौमित्र. त्याच्या दिसण्यात आवेग असतो, शब्दांत असोशी. तो हृदयातून बोलतो. शब्दांतूनच इतरांच्या हृदयाला भिडतो. जगणं हीच त्याची अभिव्यक्ती असते आणि जगणं हीच त्याची कविता. ...‘आणि तरीही मी’ या पहिल्या काव्यसंग्रहानंतर १७ वर्षांनी नुकत्याच प्रकाशित झालेला ‘बाउल’ कवितासंग्रह त्याचीच साक्ष देतो...

 

अभिनेता किशोर कदमपेक्षा कवी सौमित्र हा जास्त जिव्हाळ्याचा वाटत आलाय महाराष्ट्राला. पंचवीस वर्षांनंतरही ‘गारवा’तील तजेला कमी झालेला नाही. "पॉप्युलर प्रकाशन'नं त्याचा पहिला कविता संग्रह १७ वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता, ‘आणि तरीही मी’. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांनी सजवलेल्या या संग्रहाचं निर्मितीमूल्य अतिशय उच्च दर्जाचं होतं. हाही कवितासंग्रह रसिक विसरलेले नाहीत. सतरा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. ज्येष्ठ चित्रपट अभिनेता या संबोधनापर्यंत येऊन पोहोचलेला किशोर कदम, स्वत:मधील अस्वस्थता, बंडखोरीची खुमखुमी, औदासीन्य, एकटेपणा, बेफिकिरी, जिप्सीपणा हे सगळं स्वत:तील कवीशी बोलत राहिला. झगडत राहिला. स्वत:ला पुन्हा पुन्हा तपासत राहिला. ‘आणि तरीही मी’ मधला मॅच्युअर रोमँटिसिझम पुढील सतरा वर्षात भटकत भटकत ‘बाउल’पर्यंत येऊन पोहोचल्यावर लक्षात येतं, की सौमित्रनं अंगभूत असलेला हा रोमँटिसिझम आताच्या म्हंजे ‘बाउल’मधील कवितेपर्यंत पोहोचताना, केवळ दूरवर नादत राहणाऱ्या व्हायोलिनच्या जोरकस सूरासारखा हलकासा आधार म्हणून वापरला आहे.

 

‘फिडलर ऑन द रूफ’मधील एका विशिष्ट लयीत सामाजिक व्यवहारात मश्गुल असलेलं गाव पुढे पुढे महायुद्धाच्या ढगांनी हळूहळू काळवंडत जावं आणि या ढासळणाऱ्या गावाच्या बचावलेल्या काही शेवटच्या घरांपैकी एका घराच्या छतावर वर्षानुवर्षे फिडल वाजवत बसणाऱ्या फिडलर्सच्या सुरांमधून राजकीय, सामाजिक बदलांचे, संघर्षांचे, मरणकळांचे, विनाशाचे अस्वस्थ करणारे संदर्भ उमटत रहावेत, तशी ‘बाउल’मधील कविता आहे.

 

सौमित्र हा फिडलर आहे. कवीच्या वैयक्तिक सुखदु:खाला आता सामाजिक, राजकीय संदर्भांची धारदार किनार आहे. ‘कृपया दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे किंवा लंकेश होण्याचा प्रयत्न करू नका… व्यवस्थेवर मारेकरी शोधण्याचा आधीच खूप ताण आहे’ किंवा ‘डेड पीपल आर आलवेज कुल, आणि योगायोगाने आमच्या घराण्यातच मृत्युची परंपरा आहे.’ यासारख्या ओळी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. ‘चोवीस चोवीस तेवीस चोवीस’ या कवितेत स्त्रीपुरूष नात्याची केलेली मांडणी सौमित्रमधील अतिशय दणकट माणूसपणाची साक्ष आहे. ‘चोवीस चोवीस आणि तेवीस चोवीसच्या या खेळात मी केवळ एक उणा म्हणून किती वणवणलोय बाहेर तो एक शोधत, तुला कल्पना नसेल’ हे सांगून सौमित्र पुढे म्हणतात, ‘म्हणूनच मी बाहेर पडून सतत काही नवीन करून तुझी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतो…’

 

कवी सौमित्रचा ‘बाउल’ हा नवाकोरा कवितासंग्रह पुण्यात आणि नाशिकमध्ये एका अनोख्या कार्यक्रमाने प्रकाशित झाला. बाउल हा झेन, सुफी आणि हिंदू संतपरंपरांचं मिश्रण असणारा बंगालमधील एक पंथ आहे. सौमित्रने ‘वाऱ्यानं बहकलेला’ किंवा ‘मॅड अफेक्टेड बाय द विंड’ असं त्याचं वर्णन केलंय. ही माणसं गाणी गात, आराधना करत एका जागी न थांबता अखंड भटकत राहतात. एकतारी, डुग्गी, चिपळ्या, चिलंबू यासारखी वाद्ये हाती घेऊन हा जत्था एका विलक्षण शोधाला निघाल्यासारखा पुढे जात राहतो. गाण्यागाण्यातून हाका मारत संवाद साधत राहतो. या बाउलपणाचं जगणं वाट्याला आलंय म्हणून ही बाउल कविता!

 

सौमित्रच्या या बाउलपणातील प्रकट गूढ पुण्यातील कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे, कवी मंगेश काळे आणि नाशिकमधील कार्यक्रमात ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे, संजय भास्कर जोशी आणि सुमती लांडे यांनी उकलण्याचा प्रयत्न केला. ‘सत्तेची उलथापालथ करायची असते, तेव्हा कवींना शीर्षस्थानी ठेवले जाते. कारण, कवी झाडासारखा नुसता थरथरला तरी मोठमोठ्या साम्राज्याची सत्ता उलथून टाकू शकतो,’ असे सांगत रंगनाथ पठारे यांनी सौमित्रच्या ‘बाउल’ कवितासंग्रहाच्या निर्मितीमूल्याचं महत्व अधोरेखित केलं. मंगेश काळे म्हणाले, की हा भटक्याचा संग्रह नाही. कवीची वृत्ती असेलही भटकी, पण हा निगुतीनं रचलेला कवितासंग्रह आहे. शकलीकरण झालेल्या ‘मी’चा शोध आहे. कवीची वृत्ती ‘बाउलीयन’ असेलही, पण हा भटकेपणा सामाजिक आणि कौटुंबिक भान ठेवणाराही आहे. अविनाश सप्रेंनीही कवितेच्या सामाजिकीकरणाबद्दल आणि समकालिन अस्वस्थतेच्या उचित भानाबद्दल सौमित्रच्या कवितेचं कौतुक केलं. किशोर कदमचं लेखन मुळातूनच परफॉर्मिंगच्या अंगानं जातं. ‘बाउल’मधील कविता वाचतानाही वाचकाला सौमित्रचा चिरपरिचित आसुसलेला आवाज ऐकू येत राहतो. ‘आणि तरीही मी’ किंवा ‘गारवा’नंतरच्या काळातील दोन दशकातील उलथापालथ ‘बाउल’ वाचताना लक्षात येत राहते. त्यामुळे ‘बाउल’ ही दहा पानांची दीर्घ कविता सौमित्रच्या तोंडून ऐकण्याची अनोखी संधी पुण्यात आणि नाशिकमधील प्रकाशन कार्यक्रमात रसिकांना अनुभवायला मिळाली. प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी कविताबरहुकुम तयार केलेल्या कृष्णधवल चित्रफिती, सचिन शिंदे यांचं दिग्दर्शन, प्रत्येक तुकड्यानंतर उंच लकेरीत ऐकू येणारं बाउल संगीत, कवीचं एकटेपण गडद करणाऱ्या गडद निळसर प्रकाशछटा आणि या कॅनव्हासवर सौमित्रचं कविता सादरीकरण हे सगळं अप्रतिम जुळून आलं. कवितेतील जिप्सीपण त्या तासभराच्या सादरीकरणात रसिकांच्या काळजात खोलवर कोरलं गेलं. कवितेला रसिकांचं भरभरून प्रेम मिळणं हे दृश्य फार आश्वासक आहे. रोहीत सरोदे यानं सफाईदारपणे केलेलं संगीत संयोजन आणि लक्ष्मण कोकणे व राहुल गायकवाड यांची नीटनेटकं तांत्रिक सहाय्य यामुळे सौमित्र यांचं हे कविता वाचन अनोखी नाट्यानुभूती देऊन गेलं.

 

मुळात,हा कवितासंग्रह बघताच क्षणी हातात घ्यावासा वाटतो याला कारण सौमित्र तर आहेच, शिवाय या कवितासंग्रहाचं अनोखं देखणेपणही कारणीभूत आहे. ज्येष्ठ चित्रकार आणि दिव्य मराठी -"रसिक'चे हितचिंतक सुभाष अवचट यांनी केलेलं आजच्या दृश्यभाषेत संवाद साधणाऱ्या पिढीच्या अभिरूचीशी जुळणारं मुखपृष्ठ आणि आतील मांडणी फारच अप्रतिम. संजय पेठे यांनी काढलेली सौमित्र यांची त्यांच्या जीवनानुभवाचा परिसर असलेल्या  खारदांड्यातील (मुंबई-बांद्रा पश्चिम) वेगवेगळ्या ठिकाणची छायाचित्रे संग्रहात पेरली आहेत. सुभाष अवचटांच्या सजावटीत त्यांचं अवलीयापण सौमित्रच्या बाउलपणाला विलक्षण आधारभूत ठरलं आहे. अवचटांच्या म्हणण्यानुसार, यानिमित्तानं कवीचं आणि त्याच्या जगण्याच्या परिसराचं दस्तावेजीकरणही झालं आहे. हा कवितासंग्रह मंगेश काळे म्हणतात तसा मधल्या पिढीच्या शकलीकरणाचाही दस्तावेज ठरणार आहे. रोमँटिक पावसाचे ढग ते युद्धाचे, उद्धवस्तीकरणाचे ढग असा गेल्या दोन तपातला बदल टिपणाऱ्या संवेदनशील पिढीच्या घालमेलीची आणि वैयक्तिक कोंडी ते सामाजिक कोंडी या दोहोत फिरणाऱ्या लंबकाची अस्वस्थता घेऊन आलेला ‘बाउल’ फार महत्वाचा कवितासंग्रह ठरेल यात शंका नाही. 

(लेखक नाशिकस्थित प्रसिद्ध नाट्यलेखक आहेत.)


दत्ता पाटील
dattapatilnsk@gmail.com
संपर्क : ९९२२७६२७७७