Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Dattu was scared for swimming, now won gold rowing!

पोहायला घाबरणाऱ्या दत्तूने रोईंगमध्ये पटकावले सुवर्ण!

अनंत पांगारकर | Update - Aug 25, 2018, 10:42 AM IST

आशियाई स्पर्धेत संगमनेरच्या दत्तू भोकनळ याने रोईंग क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.

 • Dattu was scared for swimming, now won gold rowing!

  संगमनेर- आशियाई स्पर्धेत संगमनेरच्या दत्तू भोकनळ याने रोईंग क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. पाण्यात कधीच न गेलेला आणि पोहायला घाबरणाऱ्या दत्तुला रणवीरसिंग या लष्करी अधिकाऱ्याने रोईंग खेळात आणले. परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले यश मराठी तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.


  दोन दिवसांपूर्वीच फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने आधीच्या दोन राऊंडमध्ये अनुक्रमे दुसरा आणि पहिला आलेला असताना व्यक्तिगत स्पर्धेत हातातोंडाशी आलेले दत्तूचे पदक थोडक्यात हुकले. मात्र, त्यातून सावरत त्याने सुवर्णपदक मिळवत देशाला यश मिळवून दिले.


  मूळचा मंगळापूर येथील दत्तूच्या परिवारावर वडिलांच्या दुर्धर आजाराने वीजच कोसळली होती. उपचारांसाठी घरातली पुंजी संपली. दोन वेळचे जेवण महाग झाले. शाळा सोडावी लागली. हातात टिकाव घेऊन तो विहीर खणायला मजूर म्हणून जाऊ लागला.उंचापुऱ्या दत्तूला वडील नेहमी म्हणत, तू मिल्ट्रीत जा, देशाची सेवा कर! त्यावेळी मिल्ट्रीत कसे जायचे हे सांगणारे कोणी नव्हते. कोणीतरी म्हणाले, आधी दहावी पास हो. मग तीन वर्षे शिक्षण बंद पडलेल्या दत्तूने शिक्षकांशी संवाद साधला. पुन्हा शाळेच्या पायऱ्या चढणाऱ्या दत्तूने पेट्रोलपंपावरील नाेकरी सांभाळत अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले.


  मनात जिद्द असली की, माणूस काहीही करु शकतो. दहावीच्या परीक्षेत तो पास झाला. याचदरम्यान वडिलांचे निधन झाले. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सेनेत दाखल व्हायला गेला. दगड फोडताना पुष्ट झालेल्या खांद्यामुळे आणि भरलेल्या छातीमुळे तो पहिल्याच प्रयत्नात निवडला गेला. त्याच्यातील चापल्य बघून रणवीरसिंह या अधिकाऱ्याने त्याला रोईंग खेळात सहभागी व्हायला नेले. कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या आणि कधीच पाण्यात न उतरलेला दत्तू बोटीवर स्वार झाला आणि काही दिवसांतच इच्छाशक्तीच्या बळावर या खेळात तरबेजदेखील झाला. केवळ सहा महिन्यांच्या सरावातच त्याने अनेक स्पर्धा जिंकत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकदेखील मिळवले. सेनेच्या आहारावर अवलंबून न राहता नियमित मेडिकल चेकअप आणि आहार घेण्यासाठी त्याला महिन्याला पन्नास हजार खर्च येत होता. अनेक क्रीडाप्रेमींनी त्याला मदतीचा हात दिला होता.


  जिंकण्याचा मार्ग सापडला
  रिआे ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी रोईंगचा संघात दत्तूची निवड झाली होती. वेळ अगदीच कमी होता. स्पर्धक खेळाडू चार-पाच वर्षांच्या सरावानिशी आणि अनुभवी होते. इतर स्पर्धकांशी तोकड्या इंग्रजीतून संवाद साधताना त्याच्या लक्षात आले की, फक्त सरावच नव्हे तर फिटनेसदेखील महत्त्वाचा असतो. त्यासाठी सरावासोबत आहार आणि निद्रादेखील मोजूनमापून घ्यावी लागते. दर्जेदार क्रीडा साहित्यानिशी तयारी करावी लागते. त्यासाठी सहा महिन्यांचा सराव पुरेसा नाही. दत्तूने आपले कौशल्य पणास लावत लढत देत जागतिक स्तरावर तेरावे स्थान मिळवले. तो जिंकला नव्हता, पण त्याला जिंकण्याचा मार्ग सापडला.

Trending