Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Daughter killed her mother and father for love

आठ महिन्यांची असताना दत्तक घेऊन बनवले अभियंता, त्याच मुलीने केली दांपत्याची हत्या

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 10:26 AM IST

नागपुरातील घटना, प्रेमात अडसर ठरल्याने कृत्य

 • Daughter killed her mother and father for love

  नागपूर- प्रेमात अडसर ठरत असलेल्या आई-वडिलांचा दत्तक मुलीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मारेकरी मुलगी आयटी अभियंता असून तिचा प्रियकर हा प्रथमश्रेणी क्रिकेटपटू आहे. पोलिसांनी मुलगी ऐश्वर्या (२३) आणि प्रियकर मोहम्मद इकलाख खान (२३) या दोघांनाही अटक करून कोठडीत रवानगी केली आहे.


  नागपुरातील दत्तवाडी परिसरात राहणारे शंकर अतुलचंद्र चंपाती (७२) आणि सीमा शंकर चंपाती (६४) या वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला होता. वेस्टर्न कोल फिल्ड्समधून सेवानिवृत्त झालेल्या शंकर चंपाती यांनी ऐश्वर्याच्या आई-वडिलांचे अपघातात निधन झाल्याने तिला दत्तक घेतले होते. त्यावेळी ती जेमतेम ८ महिन्यांची होती. चंपाती दांपत्याने तिची संपूर्ण काळजी घेतली. आयटी अभियंता म्हणून ऐश्वर्याला नागपुरातील एका कंपनीत नोकरीही लागली होती. मात्र, त्यापूर्वीच तिचे क्रिकेटपटू असलेल्या मोहंमद इकलाखशी प्रेमसंबंध जुळले.


  काही दिवसांपूर्वीच शंकर यांना या प्रकरणाची भणक लागली होती. म्हणून त्यांनी घर विकून पुण्याला स्थायिक होण्याची योजना आखली होती. त्यामुळे ऐश्वर्या आणि इकलाख यांनी शंकर व सीमा यांचा काटा काढण्याची योजना आखली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


  अशी केली वृद्धांची हत्या
  रविवारी दुपारी एेश्वर्याने खरबुजात गुंगी आणणारे औषध मिसळून ते शंकर व सीमा यांना खायला दिले होते. ते बेशुद्ध झाल्याची खात्री पटल्यावर ऐश्वर्या घराबाहेर पडली. या दरम्यान इकलाखने घरात शिरून दोघांवरही सत्तूरचे वार करून त्यांची हत्या केली. दोघे ठार झाल्याची खात्री पटल्यावरच तो तेथून पसार झाला. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास ऐश्वर्याने घरी येऊन आरडाओरड सुरू केली व शेजाऱ्यांपुढे बनाव निर्माण केला.


  सोशल मीडिया केला बंद
  सोशल मीडियावरील नोंदींच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा छडा लावतात, ही बाब लक्षात घेऊन अभियंता असलेल्या ऐश्वर्याने तिचे आणि इकलाखचे फेसबुक, तसेच ट्विटर अकाउंट घटनेच्या तीन दिवसांपूर्वी डिलीट करून टाकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागपूर शहर गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यावर संशयाची पहिली सुई ऐश्वर्यावरच वळली. तिची चौकशी केल्यावर या हत्याकांडाचा अवघ्या ४८ तासांमध्येच उलगडा झाला.

Trending