आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदचा आर्थिक व्यवस्थापक जबीर मोती लंडनमध्ये अटकेत; भारतीय सुरक्षा संस्थांचे मोठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/लंडन- संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश असलेला, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि त्याचा आर्थिक व्यवस्थापक जबीर मोती याला ब्रिटनच्या पोलिसांनी अटक केली आहे. पाकिस्तानी नागरिक असलेल्या जबीरला लंडनच्या चॅरिंग क्रॉस पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पकडले. हे भारतीय सुरक्षा संस्थांचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. 

 
जबीर मोती याला अटक करावी, अशी विनंती भारताने ब्रिटनकडे केली होती. तो जबीर सिद्दिकी या नावानेही ओळखला जातो. तो दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन यांचा जवळचा सहकारी अाहे. त्याच्याकडे पाकिस्तानचे पारपत्र आहे, त्यात तो कराचीचा रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दाऊदही अनेकदा कराचीच्या जवळपास दिसला आहे, असे भारतीय सुरक्षा संस्थांचे मत आहे.  दाऊद इब्राहिम १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. या स्फोटात जवळपास २५७ लोक ठार झाले होते. त्याशिवाय खून, खंडणी वसुली, अमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद आणि इतर काही प्रकरणांतही दाऊद ‘वाँटेड’ आहे.  


दाऊदचा विदेशातील व्यवसाय सांभाळतो
सुरक्षा संस्थांनुसार, जबीर मोती हा दाऊदचा विदेशातील व्यवसाय सांभाळतो. तो पाकिस्तान, मध्य-पूर्वेचे देश, ब्रिटन आणि युरोप, आफ्रिका आणि आग्नेय आशियाच्या देशांमध्ये दाऊदचे काम पाहतो. अवैश शस्त्रास्त्रांची विक्री, अमली पदार्थांचा व्यवसाय, रिअल इस्टेट, खंडणी यांसारखी बेकायदेशीर कामे तो करतो. त्यातून होणारी कमाई तो भारताच्या विरोधात काम करत असलेल्या दहशतवाद्यांना देतो. जबीर बार्बाडोस आणि अँटिग्वामध्ये दुहेरी नागरिकत्व मिळण्याच्या प्रयत्नात होता.  

  
चौकशीनंतर घेतले ताब्यात  
जबीर मोती १० वर्षांच्या व्हिसावर ब्रिटनमध्ये राहत होता. दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी मरीन आणि जावई जुनैद (पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादचा मुलगा) यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर जबीरला ताब्यात घेण्यात आले आहे.  

फारूक टकलाने बनावट नावावर मिळवले होते पासपोर्ट : सीबीआय
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या लोकांपैकी एक सक्रिय दहशतवादी आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार फारूक टकला याने २०११ मध्ये मुश्ताक मोहंमद या बनावट नावाने भारतीय पासपोर्ट मिळवले होते, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने टाडा कोर्टात गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा दावा करण्यात आला आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, टकला याला ८ मार्च २०१८ रोजी दुबईहून मुंबईला आणण्यात आले होते. मुंबईच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक झाली होती. तेव्हा त्याच्याकडून दुबईतील भारतीय दूतावासाने ८ फेब्रुवारी २०११ रोजी जारी केलेले हे पारपत्र जप्त करण्यात आले होते. मोहंमद फारूक यासीन मन्सूर ऊर्फ फारूक टकला हा मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दुबईला पळून गेला होता आणि तेथे तो मुश्ताक मोहंमद मियाँ या नावाने राहत होता, असा आरोपही सीबीआयने केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...