आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडेल शिवारात आढळला होता तरुणीचा मृतदेह; एलसीबी पथक रात्रीपर्यंत तळ ठाेकून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहरापासून जवळ असलेल्या वडेल शिवारात काल सोमवारी तरुणीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला होता. त्यानंतर धुळे एलसीबीचे पथक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तळ ठोकून होते. वडेल शिवार व मृतदेह आढळून आलेला परिसर पोलिसांनी अक्षरश: पिंजून काढला. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी शवविच्छेदनानंतर केली. या वेळी पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सखोल तपासाची हमी दिल्यावर मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. 


वडेल शिवारात मतिमंद मुलीचा मृतदेह काल सोमवारी सायंकाळी संशयास्पदरीत्या आढळून आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील व पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गोराडे व त्यांचे पथक रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तळ काेठून होते.मंगळवारी सकाळी तरुणीचे शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी जमिअत उलमा संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. या घटनेमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून सत्य समोर आणावे, दोषींना कठोर शासन करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेतली. या वेळी प्रकरणाचा सखोल तपास करावा. पोलिसांनी सत्य समोर आणावे. शवविच्छेदन इनकॅमेरा करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर अधीक्षक विश्वास पांढरे यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दुपारी शोकाकुल  वातावरणात मृत तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एलसीबीच्या पथकाने वडेल येथे जाऊन तपासणी केली. शिवाय काही नागरिकांकडे विचारपूसही केली. वडेल व परिसराला लागून असलेल्या इतर गावांमध्येही पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


पोलिसांचे आवाहन आणि शोध 
वडेल शिवारात काही ग्रामस्थांना ही मुलगी फिरताना दिसली होती, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे; परंतु पोलिसांच्या भीतीपोटी काही जण पुढे येण्यास तयार नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांचा शोध सुरू केला आहे. संबंधितांनी स्वत:हून पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


मुंबईला तपासणी 
मृत तरुणीचा व्हिसेरा व काही अवयव मुंबई येथील सर जे जे हॉस्पिटल व नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले जाणार आहेत. उद्या बुधवारी ही प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. प्रयोगशाळेने योग्य चाचपणी करून अहवाल त्वरित द्यावा अशी विनंतीवजा मागणीही पोलिसांकडून करण्यात येईल. 


... प्रश्न आहे अनुत्तरित 
वडजाई रोड परिसराला लागून हाजीनगर आहे. वडेल शिवार शहराच्या दुसऱ्या टोकाला ग्रामीण भागात आहे. मृत तरुणी मतिमंद होती. त्यामुळे एवढे अंतर ती गेली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे उत्तर पोलिसांकडेही नाही; परंतु लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


सखोल तपासावर भर 
मुलीच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्व बाजूने तपास केला जात आहे. तपासासाठी मृत मुलीच्या शरीरातील काही अवयव प्रयोगशाळेत पाठविणार आहे.त्याचा अहवाल आल्यानंतर इतर प्रश्नांचीही उत्तरे स्पष्ट होऊ शकतील. 
-सतीश गोराडे, पोलिस निरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...