आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dead Body Found: गटारीत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह, निमखेडी रस्त्यावरील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रात्रभरापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह निमखेडी रस्त्यावरील देवरामनगर परिसरातील गटारीत आढळला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर हुसेन गोपाळ-साबळे (वय २७, रा. चंदुअण्णानगर) असे मृत तरुणाचे नाव होते. मूळचे नांद्रा हवेली (ता. जामनेर) येथील गोपाळ कुटुंबीय कामानिमित्ताने जळगावात स्थायिक झाले. चंदुअण्णानगरात सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना तेथेच झोपडीत राहत आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजेपासून किशोर घरातून बाहेर पडला होता. रविवारीच त्याने नवीन मोबाइल खरेदी केला होता. रात्री उशिरापर्यंत किशोर घरी न आल्यामुळे त्याची आई शांताबाई यांनी परिसरात शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. रविवारी सकाळी ८ वाजेपासून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना देवरामनगर परिसरातील एका गटारीत तरुण पडलेला दिसून आला. त्याचा चेहरा पाण्यात बुडालेला होता. यानंतर सकाळी 10 वाजेपासून तेथे नागरिकांची गर्दी झाली. याचवेळी किशोरचा शोध घेत असलेली त्याची आई देखील तेथे पोहोचली. मुलाचा मृतदेह पाहून तिने आक्रोश केला. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला.


मृत्यूचे कारण अस्पष्ट
किशोरला दारूचे व्यसन होते. रविवारी दुपारी तो दारू प्यायला होता. रात्री नातेवाइकांच्या घरीदेखील गेला होता. यानंतर त्याचा मोबाइल बंद असल्यामुळे कुटुंबीयांना शोध घेता आला नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी मृतदेह आढळला. किशोरचे शरीर पाण्यात बुडालेले होते. पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण समोर येईल.


गर्भवती पत्नी, तीन मुलींचा आधार
किशोर हा आई शांताबाई यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात गर्भवती पत्नी आशा व तीन मुली असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता असलेल्या किशोरचा मृत्यू झाल्याने आता त्यांचा आधार गेला आहे. या घटनेनंतर कुटुंबीय, नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला.


मोबाइलचा घेतला शोध 
किशोर याने रविवारी नवीन मोबाइल खरेदी केला होता. हा मोबाइल घटनास्थळी सापडला नाही. परंतु, त्याच्या कानात इअरफोन अडकवलेले होते. सँडल गटारीच्या शेजारी होती. पोलिसांनी मोबाइल शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, गटारीत मोबाइल गवसला नाही. 

बातम्या आणखी आहेत...