आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिवंत शेतकऱ्याला पंतप्रधान किसान योजनेच्या ऑनलाइनमध्ये दाखवले मृत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धारूर तहसीलदारांची तलाठ्यास नोटीस, आता नवा अर्ज भरून घेणार
  • जे नाही ललाटी, ते करून दाखवी तलाठी... म्हणीचा प्रत्यय

संदीपान तोंडे 

धारूर - पंतप्रधान किसान योजनेत अर्ज दाखल केल्यानंतर अनुदान कसे आले नाही याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याला अापण सरकारी अाॅनलाइन प्रक्रियेत मृत असल्याचे कळाल्याने माेठा धक्काच बसला. हा शेतकरी मृत असल्याचे  दाखवले गेल्याने त्यांचा पंतप्रधान किसान याेजनेचा  अर्जही रद्द करण्याचा प्रकार धारूरमध्ये उघडकीस आला आहे. या शेतकऱ्याने तहसीलदारांसह संबंधाितांच्या विराेधात पोलिसांत तक्रार करताच तहसीलदारांनी याची दखल घेत तलाठ्यास नोटीस पाठवून खुलासा तर मागवलाच, परंतु  नवीन ऑनलाइन अर्ज भरण्याच्या  सूचना दिल्या आहेत. अनुपकुमार मिश्रा असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

धारूर शहरातील अनुपकुमार गणेशप्रसाद मिश्रा यांच्या नावे १५ एकर जमीन असून केंद्र सरकारने गतवर्षीपासून प्रत्येक शेतकऱ्यास  पंतप्रधान किसान योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे.  मिश्रा यांना याेजनेचा लाभच मिळत नसल्याने त्यांनी ४ डिसेंबर २०१९ रोजी या योजनेत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरला.   दोन महिन्यानंतर मिश्रा हे येथील तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. त्यांच्या अर्जाची तपासणी  केल्यानंतर ते मयत असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात येऊन ऑनलाईन पत्रही देण्यात आल्याचे उघड झाले. याचा मिश्रा यांनी जाब विचारला असता कर्मचारी अनुत्तरित झाले. मी जिवंत असताना मृत कसे  दाखवण्यात आले,   हा प्रकार कोणी केला याचे उत्तरही मिश्रा यांना मिळाले नसल्याने त्यांनी  थेट धारूर पोलिसांत तसेच राज्याच्या  मुख्यमंत्र्यांकडे  लेखी तक्रार केली. ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीत केली. याची दखल  तहसीलदार  शेडोळकर यांनी घेऊन सबंधित तलाठ्याकडून लेखी खुलासा मागवला.  सदरील शेतकऱ्यास लाभ मिळण्यासाठी नवीन अर्ज अपलोड करण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित विभागास  केल्या.  
मला असा का त्रास देतायॽ 
मी पंतप्रधान किसान योजनेत नियमानुसार अर्ज सादर केला असताना माझा अर्ज मयत झाल्याचे नोंदवून नामंजूर करणे ही खेदाची बाब आहे . याचा मला खूप मानसिक त्रास झाला. मला अगोदरच ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझे वय सध्या ६५ वर्षे  आहे. मला न्याय मिळण्याची गरज आहे .
-अनुपमकुमार मिश्रा, शेतकरी धारूर .
तलाठ्यास नोटीस
जिवंत शेतकऱ्यास मयत दाखवल्यामुळे सबंधित तलाठयास नोटीस देण्यात आली आहे. खुलासा मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच सबंधित शेतकऱ्याचा नवीन अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत .
- व्ही .एस. शेडोळकर, तहसीलदार धारूर