आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांत 2 खातेधारकांचा हार्ट अटॅकने मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या दोन खातेधारकांचा २४ तासांत हार्ट अटॅकने मृत्यू झाला. पोलिसांनुसार, ५१ वर्षीय संजय गुलाटी सोमवारी संध्याकाळी बँकेत अडकलेल्या रकमेच्या विरोधात निदर्शने करून घरी आले होते. त्यांना हार्ट अटॅक आला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. संजय यांचे ९० लाख रुपये पीएमसी बँकेत जमा आहेत. दुसरे खातेधारक फत्तोमल पंजाबीही सोमवारी निदर्शनांत सहभागी होते. मंगळवारी दुपारी त्यांना हार्ट अटॅक आला. कुटुंबाने सांगितले की, रक्कम अडकल्याने ते तणावात होते.

निवडणुकीनंतर केंद्राशी चर्चा करणार : मुख्यमंत्री | पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत झालेल्या कर्ज घोटाळाप्रकरणी रिझर्व्ह बँकेने बंधने घातल्याने खातेधारकांना पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. याबाबत सध्या आचारसंहिता असल्याने काहीही करता येत नसल्याचे सांगून निवडणुका संपल्यावर हा विषय आम्ही केंद्र सरकारकडे घेऊन जाऊ. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासंदर्भात केंद्राकडे विनंती करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बँकेने ७३ टक्के कर्ज एकाच कंपनीला दिले, ते एनपीए झाले...
११,६०० कोटी रु. पेक्षा जास्त जमा रकमेसह पीएमसी अव्वल १० सहकारी बँकांपैकी एक आहे. बँकेने एचडीआयएल या कंपनीला ६,५०० कोटी रु. चे कर्ज दिले, ते बँकेच्या एकूण कर्जाच्या ७३% आहे. एचडीआयएलने कर्ज चुकवले नाही, त्यामुळे संकट आले.

आरबीआयच्या कर्मचाऱ्यांचीच २०० कोटींवर रक्कम अडकली...
घोटाळ्याचा अंदाज आल्यावर आरबीआयने बँकेतून विड्राॅलची मर्यादा निश्चित केली तेव्हा खातेधारकांत आरबीआयचे कर्मचारीही असल्याचे समोर आले. त्यांची २०० कोटी रुपयांवर रक्कम जमा आहे.

संजय गुलाटी (५१)त्यांचे ९० लाख रु. जमा आहेत. आंदोलन करून घरी परततानाच हार्ट अटॅक आला. जेट एअरवेज बंद पडल्याने नोकरी गेली होती.

फत्तोमल पंजाबी (५९)मुलुंडमध्ये हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल स्टोअर चालवत होते. पीएमसीचे जुने खातेधारक. मंगळवारी हार्ट अटॅक आला.