नागपूर / यूट्यूबवर आत्महत्येची क्लिप पाहून अनुकरण करणाऱ्या बालिकेचा मृत्यू

 मुलांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेऊन पालकांनी दक्ष राहावे -  पोलिसांचे आवाहान 

प्रतिनिधी

Jul 01,2019 07:30:00 AM IST

नागपूर - गळफास कसा घेतला जातो याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पाहून त्याचे घरात अनुकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय बालिकेला प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी नागपुरात उघडकीस आली. उत्तर प्रदेशातून नागपुरात स्थायिक झालेले राठोड कुटुंबीय केसापुरी परिसरात राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने विनोद राठोड शनिवारी बाहेर गेले होते. त्यांचा मोबाइल मुलगी शिखाजवळ होता. यूट्यूबवर ती सातत्याने दोन मुलींनी कसा गळफास घेतला ते पाहत होती. ती क्लिप तिने आपल्या आईलाही दाखवली होती. दरम्यान, आई व बहीण समोरच्या खोलीत असल्याचे पाहून शिखाने आतल्या खोलीत प्रात्यक्षिक करून पाहायचे ठरवले. तिने पंख्याला नायलॉनची दोरी बांधून फास गळ्यात अडकवला आणि तिला फास बसला. यातच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांसमोर प्रश्न
शिखाने आत्महत्या का केली असावी, हा पोलिसांसमोर प्रश्न आहे. चौकशीत तिने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. ही घटना पाहता मुलांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेऊन पालकांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

X
COMMENT