पुणे / ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तरुणाला वाचवताना अग्निशामक जवानाचा मृत्यू, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल

पुण्याजवळ दापोडी येथील घटना

Dec 02,2019 10:07:49 AM IST

पुणे : दापोडी परिसरात पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून माती अंगावर पडल्याने तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अडकलेल्यांमध्ये अग्निशमन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खड्ड्यात पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी उतरताना हे दोन कर्मचारीही ढिगाऱ्याखाली सापडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सरोज फुंदे या जवानाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात बचावकार्य करणाऱ्या पथकाला यश आले, तर विशाल जाधव या जवानाचा यात मृत्यू झाला.


दापोडी येथील विनियार्ड चर्चजवळ सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. खोदलेल्या खड्ड्यांच्या जवळच खणलेली माती ढीग करून ठेवली होती. सायंकाळी एक तरुण खड्ड्याजवळ बसला होता. अचानक माती घसरल्याने तो खड्ड्यात पडला. अंगावर माती पडल्याने तो आत अडकला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याला वाचवण्यासाठी खड्ड्यात उतरत असताना पुन्हा मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन कर्मचारीही खड्ड्यात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक महेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले असून, पथकात श्वान तसेच जीवितरक्षक अन्य उपकरणे आहेत.


एनडीआरएफचे एक पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पथकाने त्वरित बचावकार्य सुरू केले आहे. दरम्यान, चौकशीअंती या घटनेला जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

X