आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू; दांपत्याचा अवयवदानाचा संकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - अवयवदानाच्या क्षेत्रात आलेल्या एका कटू अनुभवाने मन सुन्न झाले होते. काही वर्षांपूर्वी दोन्ही किडनी निकामी झालेल्या एका रुग्णाला मुंबईत ऑपरेशनसाठी घेऊन गेलो होतो. त्याच्या दोन्ही किडन्या बदलणे गरजेचे होते. परंतु सहा महिने प्रतीक्षा केल्यानंतरदेखील किडनी न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. तेव्हाच अवयवदानाच्या क्षेत्रात काम करायचे ठरवले. या कार्याची सुरुवात स्वतःपासूनच करायची म्हणून मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. परभणीचे कार्यकर्ते शिवलिंग बोधणे यांनी व्यक्त केल्या भावना.


जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते असलेले शिवलिंग महादप्पा बोधणे यांनी आपल्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी रविवारी (दि.१९) पत्नीसह मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प सोडला. आतापर्यंत त्यांनी ८३ वेळा रक्तदान केले आहे. युवक अवस्थेपासूनच राजकीय क्षेत्रात भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास करीत विविध प्रश्‍नांवर आंदोलने करणारे शिवलिंग बोधणे हे सध्या आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. रविवारी त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता. गेल्या अनेक दिवसांपासून मनात असलेला अवयवदानाचा संकल्प त्यांनी पत्नी सुजाता यांच्यासह मुले अभिमन्यू (२४) व अंकुश (२१) यांना बोलून दाखवला. त्याप्रमाणे सर्वांनीच होकार दर्शवत लगेचच शिवलिंग व पत्नी सुजाता यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन मरणोत्तर अवयवदान संमतीपत्र लिहून दिले. दोन्ही मुलांनी साक्षीदार म्हणून  अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या.