आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा हीटरचा शाॅक लागून मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिरडशहापूर येेथील घटनेने हळहळ, अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुटीनिमित्त गावी आलेल्या युवकाचा अंघोळीसाठी पाणी घेत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता घडली. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या मावशीलाही विजेचा धक्का बसला. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जय ज्योती जाधव (१६) हा इयत्ता अकरावी वर्गात कोटा (राजस्थान) येथे शिक्षण घेतो. सध्या सुट्ट्या असल्यामुळे तो गावाकडे शिरडशहापूर येथे आला होता. आज सकाळी त्याला कपडे घेण्यासाठी त्याचे कुटुंब बाहेरगावी जाणार होते. सकाळी आठ वाजता तो अंघोळीसाठी पाणी काढत असताना हिटर सुरु असल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.  यावेळी हिटर त्याच्या हातातच होते. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्याची मावशी संजीवनी जाधव यांनी आरडा ओरड केली. त्याच्या हातातील हिटर ओढत असताना संजीवनी यांनाही विजेचा धक्का बसला. दाेघांची अाेरड एेकून अशोक चौधरी मदतीला धावले. त्यांनी तातडीने वीज पुरवठा बंद केला. या घटनेत जय जाधव अत्यवस्थ झाला तर त्याची मावशी संजीवनी जाधव किरकोळ जखमी झाल्या. जय  यास तातडीने वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत जाहीर केले. या प्रकरणी अशोक चौधरी यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

जय जाधव हा इयत्ता दहावीमध्ये रिसोड येथे शिक्षणासाठी होता. मागील वर्षी दहावी परीक्षेत त्याने वाशीम जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवला होता. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या जयला पुढील शिक्षणासाठी कोटा (राजस्थान) येथे ठेवले होते.  २६ मार्च रोजी तो परत कोटा येथे जाणार होता.  या घटनेमुळे त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.