आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदपूर तालुक्यात चार महिन्यांच्या बाळाचा पेन्टा-3 लस दिल्यानंतर मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- हेपेटायटीस-बी यासह पाच आजारांना प्रतिबंध करण्यासाठी दिली जाणारी पेन्टा -३ ही लस दिल्यानंतर एका चार महिन्याच्या बाळाचा नाकातून रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. मात्र बाळाचा मृत्यू पेन्टा-३ या लसीमुळे नव्हे तर इतर कारणांमुळे झाला असावा, असे मत जिल्हा शल्यचिकित्सकांनी व्यक्त केले आहे. 

 

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथील ज्ञानेश्वर शिंदे यांना चार महिने वयाची संध्याराणी ही गोड मुलगी होती. तिला सोमवारी दुपारी लसीकरणासाठी त्यांनी अहदमपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तेथे तिला आरोग्य सेविकांनी पेन्टा-३ ही तोंडावाटे द्यावयाची लस दिली. यापूर्वी तिला पेन्टा-१ व २ या लसींसह इतर लसी देण्यात आल्या होत्या. मात्र तिसऱ्यांदा लस दिल्यानंतर काही वेळातच मुलीची प्रकृती बिघडली. तिच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर तोंडातून फेस येऊ लागला. त्यामुळे तिच्यावर स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार केले आणि सायंकाळी लातूरला हलवण्याचा सल्ला दिला. मुलीच्या पालकांनी तिला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणून दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू झाले. परंतु मुलीने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. तिचा रात्री उशिरा ११ वाजता मृत्यू झाला. मृत मुलीच्या पालकांनी बाळाला दिलेली लस चुकीची असावी किंवा ती उच्च दर्जाची नसावी अशी शंका व्यक्त केली असून यासंबंधी जिल्हा शल्य चिकित्सकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या आहेत. 

 

पेन्टा लसीमुळे मृत्यू होत नाही : डॉ. संजय ढगे 
याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजपर्यंत एकही बालक या लसी मुळे दगावले नसल्याचे सांगितले. लातूरचे नव्हे तर देशभरात हेपेटायटीससह इतर पाच आजारांपासून बचाव करण्यासाठी बाळांना ही लस दिली जाते. कधी कधी एखाद्या बाळाला ताप येतो, परंतु मृत्यू झाल्याचा इतिहास नाही. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून बाळाचा मृत्यू यामुळेच झाला की आणखी काही कारणाने झाला हे तपासले जाईल. बाळाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बरेच काही स्पष्ट होईल आणि त्यानंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल असे सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...