आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूची शृंखला : औरंगाबाद औद्योगिक परिसरात एकाच दिवशी तीन आत्महत्या, तर ७ महिन्यांत ११५ ‘ ए.डी.’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत जानेवारी २०१९ ते २२ जुलैदरम्यान तब्बल ११५ नागरिक विषप्राशन, गळफास घेतल्याने तसेच इतर घटनांतून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या अकस्मात मृत्यूची नोंंद (ए.डी.) पोलिसांत करण्यात आलेली आहे. २२ जुलै रोजी एकाच दिवशी तिघांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये एकाने गळफास घेऊन, तर दुसऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. तिसरी व्यक्ती विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.


आतापर्यंतच्या अकस्मात मृत्यूच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, तसेच त्या तुलनेत मागील वर्षीची आकडेवारी तपासून बघितली असता आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या तरुणांची असल्याचे नोंदीवरून स्पष्ट होते. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये एकूण १३४ अकस्मात मृत्यूंची नोंद होती. या वर्षी मात्र अवघ्या ७ महिन्यांत ११५ अकस्मात मृत्यूंची नोंद पोलिसांत करण्यात आलेली आहे.


घाणेगावात तरुणाचा गळफास
घाणेगावातील किशोर हरी कारके (२९) हा आई सुमनबाई कारके व एका भोळसर बहिणीसह घाणेगावातील संघर्षनगरात राहत होता. पत्नी रेखा काही दिवसांपासून दोघांत खटके उडत असल्याने विभक्त राहत होती. २१ जुलै रोजी रात्री किशोर व त्याच्या आईमध्ये शाब्दिक वाद झाल्याने त्याची आई भोळसर मुलीसह घाणेगावातच राहणाऱ्या मोठ्या मुलाकडे गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आई सुमनबाई घरी परतली, तर घराचा दरवाजा बंद दिसला. खिडकीतून आत पाहिले असता किशोरने पत्र्याच्या घरातील छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून त्याला बेशुद्धावस्थेत पोलिस वाहनातून घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून किशोरला मृत घोषित केले. 
‌मेहदीपुरातील शेतात विहिरीत अंध असणाऱ्या सखाराम जनार्दन चनघटे (६०, रा. मेहदीपूर, ता. गंगापूर) या वृद्धाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे सोमवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती ही अंध असून घटनेच्या दिवशी मुरलीधर चनघटे यांच्या मालकीच्या शेतामध्ये प्रातर्विधी आटोपून घरी परतताना विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून सखाराम चनघटे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांच्या नातेवाइकांनी व पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची नोंद वाळूज पोलिसांत करण्यात आली आहे. 
 

 

अग्निशमन दलाच्या मदतीनेे मृतदेह बाहेर काढला
वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल खंडागळे, नारायण मालोदे, कोतकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. ही विहीर ९० फूट खोल असून रुंदी कमी असल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण जात असल्याने अखेर पोलिसांनी मनपाच्या अग्निशमन दलास पाचारण केले. तासाभरानंतर पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. 

 

विषारी औषधी प्राशन केल्याने आत्महत्या 
विठ्ठल बाबासाहेब नवले (५५, रा. औरंगपूर, ता. गंगापूर) यांनी विषारी औषधी सेवन केल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पुंजाराम नवले व रमाकांत पटारे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. विठ्ठल नवले यांना डॉक्टरांनी तपासून सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. नवले यांंना तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. नवले यांच्या मृत्यूप्रकरणी वाळूज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार नारायण बुट्टे करत आहेत.