आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ आला होता; पण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सात वर्षांपासून मी महावितरण कंपनीत नोकरी करतो. वीजसेवक पदावर काम पाहत असताना आम्हाला फील्डवर कामाला जावे लागते. लाइनचे काम करणे खूप जोखमीचे होते. एकदा माझी रात्रपाळी होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील हडको एन-12 डी सेक्टरचा वीजपुरवठा अचानक बंद झाला. सर्वत्र काळोख पसरला होता. फ्यूज कॉल सेंटरवर ग्राहकांचे सतत दूरध्वनी खणखणत होते. माझ्यासोबत काम करणारे भगत नावाचे सहकारी होते. आम्ही तातडीने एन-12 सेक्टरच्या डीपीजवळ पोहोचलो. प्रत्येक फ्यूज तपासत होतो. दोन फ्यूज निघालेले होते. टॉर्चच्या उजेडात आमचे काम चालू होते. भगत यांनी पकडीच्या साह्याने फ्यूज काढला व नवीन फ्यूज तयार करून टाकण्याच्या प्रयत्नात होते, परंतु फेज टू फेज झाल्याने मोठा आवाज झाला आणि जाळाचा भडका उडाला. मी घाबरून मोठ्याने ओरडलो. डीपीच्या कुंपणावरून उड्या मारून बाहेर आलो.

तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले होते. माझ्या अंगावरचा शर्ट जळाला होता. माझे सहकारी भगत खाली कोसळले होते. लोकांच्या मदतीने मी त्यांना उचलले. माझ्या अंगावर काही ठिकाणी भाजले होते. ती डीपी पूर्णपणे बिघडली होती. दोन-तीन तासांनंतर डीपी बदलण्याचे काम पूर्ण झाले. पण त्या भयंकर घटनेने माझे सर्व अंग थरथर कापत होते. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती म्हणून आमचे प्राण वाचले. माझ्या नोकरीतला सर्वात भयानक अनुभव होता. आम्ही मृत्यूला अनुभवले होते. पुढे अशा अनेक धोक्यांना सामोरा गेलो, पण या घटनेची कायमस्वरू पी आठवण माझ्या मन:पटलावर कोरून ठेवली गेली आहे. वायरमन जीव धोक्यात घालून काम करतात म्हणून नागरिकांना अखंड वीजपुरवठा होत असतो, हेच खरे! महावितरण कंपनीत काम करताना अनेक वायरमनना आपला जीव गमवावा लागला आहे. काही कर्मचा-यांना अहोरात्र काम करावे लागले आहे. सणावारालाही आम्ही नोकरीत असतो.