आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीत वाद; महाआघाडीची माेट बांधण्यास निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला घटक पक्षांचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला राेखण्यासाठी छाेट्या- माेठ्या १० पक्षांना गृहीत धरून महाआघाडीची माेट बांधण्यास निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला  घटक पक्षांकडूनच जाब विचारला जात  आहे.  ‘अद्याप अजेंड्यावर चर्चा झालेली नसताना महाअाघाडीची घाेषणा कशी करता?’ असा सवाल जनता दल लाेकतांत्रिकचे अामदार कपिल पाटील यांनी दाेन्ही काँग्रेसला पत्राद्वारे विचारला. खासदार राजू शेट्टी यांनीही पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे याेग्यच असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ‘कपिल पाटील यांनी त्यांचे पक्षाध्यक्ष शरद यादव यांना विचारून अाधी अजेंडा ठरवावा, मगच चर्चा करावी, असे पत्र जाहीरपणे लिहून ते आघाडीच्या चर्चेत खीळ घालत अाहेत.’

 

छोटे पक्ष महाआघाडीचे वाजंत्री नाहीत : पाटील
२०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २६ व राष्ट्रवादीने २२ जागा लढवल्या होत्या. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी छोट्या घटक पक्षांना केवळ तीन जागा सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यावर आक्षेप घेत कपिल पाटील पत्रात म्हणतात, ‘छोट्या पक्षांची तीन जागांवर हाेणारी  बोळवण आम्हाला अजिबात मान्य नाही. छोटे पक्ष म्हणजे महाआघाडीचे वाजंत्री नाहीत.’


सर्वांनाच हव्यात जास्त जागा
१. भारिप : प्रकाश आंबेडकर यांना अकोला, सोलापूरसह इतर दोन जागा हव्या आहेत.
२. स्वाभिमानी शेतकरी संघटना : राजू शेट्टी यांना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेसह एकूण सात जागा हव्या आहेत.
३. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पालघर या जागांची मागणी या पक्षाचे नेते करत आहेत.
४. बहुजन विकास आघाडी : हितेंद्र ठाकूर यांचा पालघर मतदारसंघावर दावा आहे.
५. समाजवादी पक्ष : राज्यात अबू आझमींच्या नेतृत्वातील या पक्षाला मुंबईत १ जागा हवीय.
६. शेतकरी कामगार पक्ष : लोकसभेत रस नाही, विधानसभेसाठी अधिक जागांची अपेक्षा.

 

बिहारमध्येेही शिवसेना भाजपला घेरणार; सर्व ४० जागा लढवणार
पाटणा : लाेकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जदयू’ पक्षाशी युती करणाऱ्या भाजपला बिहारमध्येही घेरण्याची तयारी शिवसेनेने केली अाहे. या राज्यातील लाेकसभेच्या सर्व ४० जागा लढवण्याची घाेषणा शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष काैशलेंद्र शर्मा यांनी केली. बिहारमध्ये शिवसेनेला फारसा जनाधार नसला तरी कमी मताधिक्क्यांनी निकाल फिरवू शकणाऱ्या मतदारसंघात हा पक्ष भाजपला अडचणीचा ठरू शकताे. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशातील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांमुळे भाजपचा पाच जागांवर अत्यल्प मतांनी पराभव झाला हाेता.

 

शिवसेनेशी युतीसाठी अाग्रही असणे म्हणजे भाजप हतबल नव्हे : दानवे
‘देशात भाजपविराेधात अनेक पक्ष एकत्र येत अाहेत. या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांचे मतविभाजन हाेऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेशी युतीसाठी प्रयत्न करत आहाेत. मात्र याचा अर्थ भाजप हतबल आहे असे नव्हे,’  असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. 

 

लाेकसभेला सात जागा न मिळाल्यास वेगळा विचार करू : राजू शेट्टी 
जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि शेतमालास दीडपट हमीभाव या आश्वासनांचा समावेश करण्याच्या अटींवरच आम्ही महाआघाडीत सामील होणार आहोत.  लाेकसभेला महाराष्ट्रात आम्ही सात जागांची मागणी केली आहे. मात्र आघाडीने ताठर भूमिका घेतल्यास आम्हीही वेगळा विचार करू शकताे, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

 

‘भारिप’चे मन वळवण्याचे अाव्हान : 
काँग्रेसकडून ‘भारिप’चे  अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी एमआयएमची साथ साेडावी, असा आग्रहही सुरू आहे. दरम्यान, राज्यात अजून महाआघाडीची स्थापनाच झालेली नाही, प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

 

प्रकाश आंबेडकर आघाडीत येतीलच - काँग्रेस :   
प्रकाश आंबेडकर महाआघाडीत नक्कीच येतील, पण एमआयएम नसेल. आंबेडकर यांच्या मागण्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्या आहेत. जानेवारीत महाआघाडीचे ठरेल. त्यानंतर किमान समान कार्यक्रम निश्चित हाेईल,  असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...