आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार अमर राजूरकर-हेमंत पाटील यांच्यात भरसभेत वाद, धक्काबुक्की

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड -   नांदेडला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी झालेल्या गाेंधळाचे पडसाद बाहेरही उमटले. सभागृहाबाहेर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांच्यात धक्काबुक्की झाली. पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला.  दरम्यान, सभागृहात गाेंधळ घातल्याप्रकरणी ४ सदस्यांना पालकमंत्र्यांनी निलंबित केले.  
बैठकीच्या सुरुवातीला काँग्रेस- पीआरपीचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र हा मुद्दा विषयपत्रिकेवर नसल्याचे सांगून विराेधकांनी त्यास विराेध केला. तसेच अध्यक्षांची परवानगी घेऊनच बोलावे, असेही सुचवले. त्यावरून पालकमंत्री आणि आमदार डी.पी. सावंत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी धर्माबादला दिलेला १२ कोटी रुपयांचा निधी रद्द करण्याचा इशारा दिला. त्यावर आमदार राजूरकर यांनी जिल्हा परिषदेच्या कामात हस्तक्षेप करू नका, असे म्हणत पालकमंत्र्यांना धारेवर धरले. याचदरम्यान गदारोळ सुरू झाला.

 

काँग्रेसचे सदस्य बापूराव गजभारे, संजय बेळगे, प्रकाश भोसीकर, रामचंद्र नाईक यांना सभागृहाचे नियम मोडल्याप्रकरणी  निलंबित करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. या गदारोळातच पालकमंत्र्यांनी बैठक गुंडाळली आणि ते सभागृहाबाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर पालकमंत्र्यांच्या समक्षच अमर राजूरकर व शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. प्रकरण हमरीतुमरी, धक्काबुक्कीपर्यंत गेले. मात्र, पोलिस व इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण निवळले. काही वेळानंतर पालकमंत्री आणि राजूरकर यांच्यामध्ये बंद खाेलीत चर्चा झाली.   


काँग्रेसने घातला गाेंधळ : नियोजन समितीच्या बैठकीला स्थानिक खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे उशीर झाल्याचा आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. बैठकीत झालेल्या गोंधळाला अशोक चव्हाण यांनी कदम यांना जबाबदार धरले होते.  त्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केला. 


बैठकीत ऐनवेळी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा ठराव मांडण्यात आला.  हा ठराव  नियमबाह्य  असल्याने आपण विरोध केला. मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी बहुमताच्या बळावर गोंधळ घातल्याचा आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...