आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम जेठमलानी यांच्यामुळे देेशातील शेतकऱ्यांना मिळाली होती कर्जमाफी ; शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जागवल्या आठवणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ख्यातनाम कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांना शेतकरी चळवळीबद्दल मोठी आस्था होती. त्यांनी शेतकऱ्यांना नादारी घोषित करण्यासंदर्भातले अर्ज सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यास शरद जोशी यांना सुचले होते. त्यामुळे १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती, अशी आठवण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढली.

दिवंगत जेठमलानी यांना आदरांजली वाहून शेट्टी म्हणाले की, २१ जुलै २०१७ रोजी मी संसद भवनवरचा शेतकऱ्यांचा मोर्चा संपवून कोल्हापूरकडे येण्यासाठी दिल्ली विमानतळावर थांबलो होतो. त्यादिवशी जेठमलानी हे मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाच्या लॉजमध्ये बसले होते. महेंद्रसिंग टिकेत, शरद जोशी, देवीलाल यांना चळवळीमध्ये कायदेशीर सल्ला देऊन त्यांनी नि:स्वार्थी मनाने मदत केली होती, हे मला माहिती होते. त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो. माझी ओळख सांगितली. या भेटीत आम्हा दोघांत जवळपास तासभर चर्चा झाली. शेतकरी चळवळ, देशातील राजकीय परिस्थिती, भरकटलेली न्यायव्यवस्था, मोदी सरकारची शेतीविषयक धोरणे यावर त्यांनी स्पष्ट व रोखठोक भूमिका मांडली. 

संसद भवनावर मोर्चा काढल्याबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. पाठीवर थाप मारून महेंद्रसिंग टिकेत, शरद जोशी, देवीलाल यांचा शेतकरी लढ्याचा वारसा सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला. वयाच्या ९३ व्या वर्षीसुद्धा तरुणाला लाजवेल, अशी त्यांचे वागणे, बोलणे होते. चळवळीत वावरणारा कार्यकर्ता असूनही मला ते आश्चर्याचे वाटले. बोलण्याच्या ओघात त्यांनी १९७८ पासूनचा शेतकरी चळवळीचा भारतातील इतिहास माझ्यासमोर उभा केला. जेठमलानी यांच्या सल्ल्याने शेतकरी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे नादारी घोषित करण्यासंदर्भातले लाखो अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केले होते. या अर्जांमुळे १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरकारने प्रत्येक शेतकऱ्यास १० हजारपर्यंतची मोठी कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील अनेक लढ्यात जेठमलानी यांनी मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दल देशातला शेतकरी त्यांचा कायम ऋणी राहील. 

बातम्या आणखी आहेत...