Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Decreasing complaints of corruption in two years even after corruption increased

भ्रष्टाचार वाढूनही २ वर्षांत निम्म्याने घटल्या तक्रारी

अरुण नवथर | Update - Aug 06, 2018, 12:38 PM IST

लाचखोरांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण मागील दोन वर्षांत निम्म्याने घटले आहे.

 • Decreasing complaints of corruption in two years even after corruption increased

  नगर- लाचखोरांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण मागील दोन वर्षांत निम्म्याने घटले आहे. हुशार झालेले लाचखोर आता लाच मागण्यासाठी व ती स्वीकारण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. कायद्यानुसार लाच घेणारा व देणारा दोघेही गुन्हेगार आहेत. मात्र, आता केवळ लाच मागितल्याची तक्रार दिली, तरी आपल्यावरच गुन्हा दाखल होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. परिणामी दोन वर्षांत भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढून तक्रारींचे प्रमाण कमी झाल्याचे सध्याचे चित्र आहे.


  भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा, म्हणून शासनाने प्रत्येक राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत केला. केंद्रीय पातळीवर दक्षता आयोगही स्थापन केला. पण, लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या १२ वर्षांमध्ये सुमारे २९७ लाचखोरांना रंगेहात पकडले. मात्र, मागील दोन वर्षांपासून हे प्रमाण निम्म्याने घटले आहे. मागील सात महिन्यांमध्ये केवळ लाचखोरांच्या विरोधात केवळ ११ तक्रारी दाखल झाल्या. अनेकजण तक्रार करण्याऐवजी शासकीय काम करून घेण्यासाठी संबंधित लोकसेवकाला लाच देवून मोकळे होतात. एखाद्या जागरूक नागरिकाने तक्रार देण्याची तयारी दाखवली, तरी संबंधित लोकसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडत नाही. लाच मागण्यसाठी व ती स्विकारण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत.


  तिऱ्हाईत व्यक्ती, ठराविक ठिकाणांच्या माध्यमातून, तसेच जागेवरच लाच मागणी करून ती स्वीकारण्यात येते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाईची संधीच मिळत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कशा पध्दतीने सापळा रचला जातो, याची माहिती लाचखोरांना आहे. त्यामुळे लाच मागताना व ती स्वीकारताना हे लाचखोर कमालीची दक्षता बाळगतात. त्याचबरोबर कायद्यानुसार लाच देणारा व घेणारा दोघेही दोषी आहेत. अनेकदा तक्रारदाराने लाचेची काही रक्कम आधी दिलेली असते, त्यानंतर तो तक्रार देण्यासाठी पुढे येतो, अशा वेळी लाच दिल्याप्रकरणी आपल्यावरही गुन्हा दाखल होईल, या भीतीपोटी संबंधित व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येण्याऐवजी लाचेची उर्वरित रक्कमदेखील देऊन टाकतो. या परिस्थितीमुळे लाचखोरीच्या तक्रारींमध्ये घट झाली असून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.


  ज्या लाचखोर कर्मचाऱ्याविरुद्ध सापळा लावायचा आहे, त्यासाठी दुसऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला पंच म्हणून नेले जाते. त्याला व संबंधित विभागाच्या कॉम्पिटंट अधिकाऱ्यास साक्ष देण्यासाठी बोलावले जाते. मात्र, आरोपीचे वकील त्यास अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की, ते गडबडतात व संशयाचा फायदा घेऊन आरोपी सुटतात, असा अनुभव लाचलुचपतच्या अनेक अधिकाऱ्यांना आलेला आहे.


  'लाचलुचपत'ची जनजागृती
  लाचलुचपत विभागामार्फत दरवर्षी ३१ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह राबवला जातो. गर्दीची ठिकाणे, शाळा- महाविद्यालये, बसस्थानके आदी ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून भ्रष्टाचाराच्या विराेधात पुढे येण्याचे आवाहन सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येते. पत्रके, पोस्टर, फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते. तरी देखील लाचखोरांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येण्यास तयार नाहीत.


  कायद्यात सुधारणा करण्याची गरज
  लाचलुचपत प्रतिबंधकच्या नवीन कायद्यानुसार नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. लाच मागणाऱ्याच्या विरोधात सात दिवस अगोदर माहिती देणे बंधनकारक आहे. नवीन कायद्यानुसार तक्रार दिली तर आपल्याच विरुध्द गुन्हा दाखल होईल की काय? अशी भीती तक्रारदारांना वाटते. त्यामुळे हा कायदा सोयीऐवजी नागरिकांच्या अडचणीचाच अधिक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
  - अॅड. सुरेश लगड, विधीतज्ज्ञ


  लाचखोर फिरतात उजळ माथ्याने
  लाचलुचपतने अनेक लाचखोर शासकीय कर्मचारी, अधिकारी, लोकसेवक रंगेहाl पकडले आहेत. लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या संबंधिताला शासकीय विभागातून निलंबित केले जाते. परंतु, कायद्यातील पळवाटेचा आधार घेत यापैकी अनेक जण उजळ माथ्याने पुन्हा काही दिवसांत सेवेत रुजू होतात. महसूलातील अनेक लाचखोरांना तर बढती देऊन इतरत्र बदली केली जाते. त्यामुळे लाचखोरांना कायद्याचा धाक वाटत नाही.


  लाच देण्याऐवजी तक्रार द्या
  भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईचे प्रमाण २७ टक्के आहे. नागरिकांनी लाच देण्याऐवजी कोणतीही भीती न बाळगता लाचखोरांच्या विरोधात तक्रार देणे आवश्यक आहे. लाच घेणारा व देणाराही दोषी असतो. त्यासाठीच नागरिकांनी लाच देण्याऐवजी लाच मागणाऱ्यांची आमच्याकडे तक्रार करावी, तर लाचखोरांना आळा बसेल.
  - नितिनकुमार चौधरी, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग.


  अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत
  तक्रारदाराच्या हस्ताक्षरात लाचखोराबद्दल तक्रार घेतली जाते. सापळा लावताना व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला जातो. मेमरी कार्डमधील आवाजाची नाशिकच्या प्रयोगशाळेत स्पेक्ट्रोग्राफिक चाचणी होते. ही चाचणी केल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे तांत्रिक पुरावा उपलब्ध होतो, तरी न्यायालयात हे पुरावे दुय्यम म्हणूनच ग्राह्य धरतात. प्रत्यक्ष तक्रारदार, पंच, साक्षीदार यांच्या बळावरच गुन्हा सिद्ध करावा लागतो.

Trending