आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांचे घटते महत्त्व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली माझे ऐकत नाही, माझे पक्षात काही चालत नाही, मी राजीनामा द्यायच्या विचारात आहे, अशी विधाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ऐन निवडणुकीत करावीत, हे काही चांगले लक्षण नाही (अर्थात, महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने). अशी विधाने असलेले एक फोन रेकाॅर्ड व्हायरल झाले आणि अशोकरावांनी 'तो माझा आवाज नाही, हा संवाद एडिट करण्यात आला आहे' वगैरे विधाने केली नाहीत. फक्त तो माझा वैयक्तिक विषय आहे, असे ते माध्यमांसमोर म्हणाले. याचा अर्थ उघड आहे. राजीनामा द्यावासा वाटावे अशी परिस्थिती अशोकरावांवर पक्षात आली आहे. ती का आली असावी, कोणी आणली असावी हे चर्चेचे मुद्दे आहेत. राज्याच्या दृष्टीने हा विषय टीका करावी, चर्चा करावी असा असेलही, पण मराठवाड्याच्या दृष्टीने मात्र हा विषय नेतृत्वाच्या उणिवेतला आणखी एक खड्डा या अर्थाने चिंतेचा आहे. 

 

अशोक चव्हाण हे मूळचे पैठण (जिल्हा औरंगाबाद) तालुक्यातले. काही पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज नांदेडला गेले आणि ते नांदेडकर झाले. शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये राहून केंद्रात आणि राज्यात सत्ता सांभाळली. त्या सत्तेचा उपयोग मराठवाड्यासाठी करूनही दिला. विशेषत: जलसंधारणाची अशी काही कामे केली की आजही त्यासाठी त्यांचे नाव निघते. नांदेड जिल्हावासी तर आजही त्यासाठी त्यांच्या स्मृतींसमोरही नतमस्तक होतात. त्यांचे दोन शिष्य मराठवाड्याचेच नाही, राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले. विलासराव देशमुख हे त्यापैकी एक. दुसरे अशोकराव. शंकररावांचे शिष्य, पुत्र आणि राजकीय वारसही. या वारसदारीचा अशोकरावांना मोठा फायदा झाला. राज्यात आधी मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री त्यांना होता आले. मुख्यमंत्री म्हणून दीडच वर्षाचा काळ त्यांना मिळाला. आदर्श इमारत घोटाळ्यात ते अडकले आणि पायउतार करण्यात आले. त्या वेळपासून सुरू झालेला राजकीय विजनवास आता काही लवकर संपणार नाही, असे सर्वच राजकारण्यांना वाटत होते. पण पक्षाने त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमले. त्यामुळे सातत्याने बातम्यांमध्ये राहण्याचे भाग्य पुन्हा मिळाले. अर्थात, कुठे मुख्यमंत्रिपद आणि कुठे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद! पण त्या निमित्ताने राज्याचे नेतृत्व करायला मिळाले यातच त्यांना समाधानी राहावे लागले आहे. आता तर त्या बाबतीतही खात्री देता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. ते स्वत:च राजीनामा देण्याची भाषा करू लागले आहेत, तेही त्यांचे महत्त्व कमी करण्यात आल्याचे संकेत देऊन. 

 

प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख हे नेते म्हणजे मराठवाड्याची आशा होते. एकेक करत ते तिघेही या इहलोकातून निघून गेले. तेव्हापासून मराठवाड्यात पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे. पण त्यातल्या त्यात या प्रांतातून मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेला एक नेता म्हणून अशोकरावांकडे पाहिले जाते आहे. ज्या पक्षातून त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे त्याच पक्षात त्यांचे महत्त्व संपल्यात जमा असेल तर भविष्यात काय, हा प्रश्न आहे. त्यामुळेच मराठवाड्यासाठी ही चिंतेची बाब आहे. नांदेडमधली जनता तर सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच अशोकरावांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याचे स्वप्न पाहते आहे. त्या स्वप्नापुढे मग ही निवडणूक लोकसभेची आहे की विधानसभेची याचे भानही ती विसरली आहे आणि दुसरीकडे अशोकराव मात्र आपले महत्त्व संपल्याचे संकेत देत आहेत. कारण त्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती त्यातल्या बहुतेकांना ती मिळालेली नाही, असे त्यांच्या लक्षात आले आहे. इतरांचे सोडा, खुद्द अशोकरावांच्या उमेदवारीच्या बाबतीतही तेच झाले. ते स्वत: लोकसभेऐवजी विधानसभेसाठी इच्छुक होते. लोकसभेसाठी आपल्या आमदार असलेल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पण ते स्वत: उभे राहिले नाहीत तर नांदेडची जागा हातातून जाऊ शकते, हे संकेत मिळालेले असल्याने पक्षाने त्यांच्यावरच उमेदवारी थोपली आहे. म्हणजे आता आमदारकीचा आणि पर्यायाने मुख्यमंत्रिपदाच्या संधीचा प्रश्नच नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. पृथ्वीराज चव्हाणांचे समजू शकते, तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतील, पण मुकुल वासनिकांसारखी तरुण मंडळी त्यांना डावलू लागली असेल तर हे दु:ख आणखीनच तीव्र बनते. त्यातून एखादे नेतृत्वच संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशोकरावांच्या बाबतीत असे काही घडले तर हानी मराठवाड्याचीच आहे हे नक्की. भलेही अशोकराव मुख्यमंत्री झालेच तरी मराठवाड्यासाठी फार काही करतील याची कोणालाही शाश्वती नसली तरी. दुसरा कोण नेता मराठवाड्यातर्फे मुख्यमंत्री होऊ शकताे? 


-निवासी संपादक - औरंगाबाद 
दीपक पटवे 
मराठवाडा 
 

बातम्या आणखी आहेत...