आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचे भविष्य पणाला लावणारी माया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांचे बालपण सुखकर करण्याच्या नादात आणि मायेच्या नावाखाली घरचे मोठे त्यांचे भविष्य, त्यांची सामाजिक आणि शारीरिक जडणघडण पणाला लावत आहेत, याकडे मात्र नकळत डोळेझाक होताना दिसत आहे. ज्येष्ठ सदस्यांना न दुखावता यातून मार्ग कसा काढायचा, अशी मोठीच अडचण तरुण पिढीसमोर उभी आहे.


तीन दिवस झाले होते छोटा आदित्य नीट जेवत नव्हता, चॉकलेट, चिप्ससाठी खूप हट्ट करत होता आणि सतत रडरडही करत होता. त्याची ताई लहानगी छकुलीही तसंच करत होती. साजूक तुपाची फोडणी दिलेली खिचडी दोघांना खूप आवडते म्हणून आज त्यांच्या आईने मुद्दाम खिचडी केली होती. सकाळी नाश्ता नीट केला नसल्यामुळे दोघं बहीणभाऊ भूक भूक करत होते. किचनमध्ये त्यांचा गोंगाट ऐकू येत होता. ताटात खिचडी वाढेपर्यंत अचानक त्यांचा आवाज शांत झाला. इतक्यात कसे दोघे शांत झाले या विचाराने ती ताट घेऊन हॉलमध्ये गेली तर दोघेही पुढ्यात चिप्सची पाकिटं, जेम्स अन् चॉकलेट घेऊन बसले होते. सासूबाई त्यांच्याजवळ बसून त्यांना चिप्सची पाकिटं फोडून देत होत्या. ती त्यांना जरा वरच्या पट्टीतच म्हणाली, ‘अहो आई, एक वाजलाय, मुलांची जेवणाची वेळ झालीये आणि तुम्ही त्यांना आता हे सगळं देताय?’ “अगं, मुलं दंगा करत होती म्हणून दिलं, ताट झाकून ठेव. नंतर दे त्यांना,’ असं अगदी सहज बोलून गेल्या त्या. पण आता चिप्स खाऊन दोघेही झोपी जातील. सकाळीही असंच केलं होतं, किंबहुना गेल्या तीन-चार दिवसांपासून असंच होतंय. नेमकं जेवणाच्या वेळी सासूबाई मुलांना असाच काही चटरपटर खाऊ देतात, त्यानंतर मुलं जेवत नाहीत. आणि आदित्य तर फक्त चॉकलेट आणि चिप्सच खाणार म्हणून हट्ट करतो. संध्याकाळी घरी येताना नवऱ्यानेही मुलांसाठी चॉकलेट्स आणले. ती चॉकलेट्स बघून तिचा दबून राहिलेला राग उफाळून बाहेर आला. 


छकुली आता चार वर्षांची झाली होती. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून घरी असाच प्रकार सुरू आहे. ती जरा कुठे रडली किंवा हट्ट केला तर ती म्हणेल तसं सासूबाई करायच्या. छकुली त्रास देते, तिचा रडवेला चेहरा मी नाही पाहू शकत किंवा मी तिच्यावर जीव लावते म्हणून ती माझाकडे येते, अशी कारणं सांगून त्या छकुलीचा हट्ट पुरवायच्या. पण असं दररोज चिप्स आणि चॉकलेट्स खाल्यामुळे छकुली नीट जेवत नव्हती, याचा तिचा तब्येतीवर आणि स्वभावावरही विपरीत परिणाम होत होता, ही गोष्ट त्यांना कळत होती, पण वळत नव्हती. मुलांवर माया दाखवण्याचा जणू हाच एकमेव मार्ग आहे, असा त्यांचा समज होता. तिने सासूला प्रेमाने, रागाने सांगून समजावून पहिले होते. पण त्या काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. नवराही मुलं मागतात म्हणून पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स असं जंक फूड वरचेवर आणायचा. त्यामुळे कुणाशी भांडायचे न कुणाला समजवायचे, हेच तिला कळत नव्हते. सासूची माया केवळ खाण्यापिण्याचा बाबतीत मर्यादित नव्हती. इतकी लहान मुलं किती सफाईदारपणे मोबाइल हाताळतात, या कौतुकापायी त्या सतत मुलांच्या हातात मोबाइल द्यायच्या. छकुली तासन््तास मोबाइल हातात घेऊन असायची. बाहेर जाऊन खेळणं, सायकल चालवणं या गोष्टींत ती फार रस घेत नसे. तिचा अनुकरण आदित्यही करू लागला होता. या सगळ्याचा एकूणच त्यांचा भविष्यावर परिणाम होणार होता. 


ही समस्या तिचा एकटीची नव्हती. तिचा मैत्रिणी आणि तिचा ओळखीच्या तिच्या वयाच्या इतर आयाही अशाच समस्यांना सामोरं जात होत्या. तिचा एका मैत्रिणीचा नवरा मुलासाठी महागडी चॉकलेट्स आणि कोल्ड ड्रिंक्स आणून द्यायचा. महागडी असली तरी ते प्रोसेस्ड फूड असल्यामुळे ते आपल्या बाळासाठी आरोग्यदायी नाही, हे सांगून सांगून ती बिचारी दमली होती. पण त्याचं यामागचं लॉजिक वेगळंच होतं. त्याच्या मते असे खाद्यपदार्थ म्हणजे त्यांच्या लहानपणी ऐश असायची,जी त्यांना परवडणारी नव्हती. आता जर आपल्या मुलाला या गोष्टी देऊ शकतो तर त्याने त्या उपभोगाव्यात, असं वाटे.


तिच्या आणखीन एका मैत्रिणीचा नवरा कपडे, खाऊ, खेळणी, हाॅटेलिंग सगळं ब्रँडेडच असावं, हा नियम कटाक्षाने पाळायचा. दर वीकएंडला महागड्या आइस्क्रीम पार्लरमध्ये, मॉलमध्ये शॉपिंग ठरलेलं. या गोष्टीचा त्यांच्या पाच वर्षांच्या जान्हवीवर वाईट प्रभाव पडत होता. पण इथेही तेच. आपल्या जे मिळाले नाही ते  मुलांनी तरी उपभोगावे. 


सुप्रियाच्या घरी जरा वेगळी परिस्थिती होती. ती स्पष्टवक्ती आणि खमकी असल्यामुळे तिचा मुलाला बाहेरचं खाणं नाही म्हणजे नाही. तो खाऊ तिचा सासू-सासऱ्यांनी किंवा नवऱ्याने आणला असला तरी ती सरळसरळ तो खाऊ बाहेर टाकून देते. त्यामुळे घरात वाद झाले तरी चालेल, पण मुलाचे असे लाड होऊ द्यायचे नाहीत, यावर ती अगदी ठाम होती. इतर आयांना मात्र घरातील वातावरण बिघडू नये म्हणून मुलांचा आरोग्याशी तडजोड करावी लागत होती. 


मुलांचे बालपण सुखकर करण्याच्या नादात आणि मायेच्या नावाखाली घरचे मोठे त्यांचे भविष्य, त्यांची सामाजिक आणि शारीरिक जडणघडण पणाला लावत आहेत, याकडे मात्र नकळत डोळेझाक होताना दिसत आहे. ज्येष्ठ सदस्यांना न दुखावता यातून मार्ग कसा काढायचा, अशी मोठीच अडचण तरुण पिढीसमोर उभी आहे.

 

- दीपा पिल्ले पुष्पकांथन, बंगळुरू
pillaydeepa09@gmail.com

बातम्या आणखी आहेत...