आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज एका येड्याला शाना करतो... आज तू भेटला!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपक देशपांडे, सोलापूर

काही माणसांचा जन्म प्रश्न विचारण्यासाठीच झालेला असतो. समोरच्या माणसाला प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती काढून घेणे हे काहींचे न सोपवलेले कामच असते. या माणसांकडे प्रश्न विचारण्याची प्रचंड आध्यात्मिक शक्ती असते. समोरचा माणूस ज्या क्षेत्रातला आहे त्या क्षेत्रातले प्रश्न विचारून काही चुकांची जबाबदारी त्याच्यावर निश्चित करण्याची त्यांच्याकडे हातोटी असते. या प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिले की, तुम्ही त्यांच्या जाळ्यात आेढले जाता... आणि जो काही संवाद सुरू होतो तो असा असतो...
प्रश्न विचारणारा : कुठं गेला होता?
मी : मार्केटमध्ये.
प्रश्न वि : कशाला गेला, उगं, ऊन आहे, घरात बसता येत न्हाई?
मी : नाही, भाजी आणायला गेलो.
प्रश्न वि : कुठं गेला भाजी आणायला?
मी : मार्केटमध्ये.
प्रश्न वि : कोणत्या मार्केटमध्ये, लक्ष्मी मार्केटमध्ये का? दुसरीकडं कुठं गेला होता?
मी : लक्ष्मी मार्केटमध्ये गेलो होतो.
प्रश्न वि : का, तिथं स्वस्त असती भाजी?
मी : हां. बाकीच्या मार्केटपेक्षा स्वस्त असती की... भाजी.
प्रश्न वि : बाकीच्या मार्केटमध्ये म्हंजे?
मी : कस्तुरबा, चैतन्य, सैफुल, ७० फूटपेक्षा स्वस्त असती म्हणतेत.
प्रश्न वि : कोण म्हणतेत?
मी : लोक म्हणतेत, लक्ष्मी मार्केट जुनं आहे ना...
प्रश्न वि : जुनं असल्यावर का स्वस्त असती भाजी..? सगळी सारखीच भाजी आणि सारखाच भाव असला पाहिजे ना...
मी : ते काय आहे. पहिल्यांदा यार्डात येती भाजी. मग लगेच लक्ष्मी मार्केटलाच येती ना.. पूर्वी तर लक्ष्मी मार्केटमध्ये लिलाव होत होता.. त्यामुळे स्वस्त असती भाजी.
प्रश्न वि : काय तर सांगताे बघ, एकदा म्हनतो यार्डातनं सगळीकडे येती, एकदा म्हनतो लक्ष्मी मार्केटला पहिल्यांदा येती, काय बी सांगायला का?
मी : अवोs तसं नाही ओss, गावात स्वस्त आणि गावाबाहेर महाग असती.. असं लोकं म्हनतेत.
प्रश्न वि : अजून पण काय तरच सांगायला का... उगं. गावाबाहेर तर खेड्यातनं लोक येतेत भाजी विकायला म्हणून तिथं स्वस्त असती म्हणतेत की रे...
मी : तसं नाई ओss ते.. गावाबाहेर काही ठिकाणी स्वस्त आहे, पण लक्ष्मी मार्केटला जी व्हरायटी मिळती ना.. ती दुसरीकडे मिळत नाही...
प्रश्न वि : व्हरायटी म्हंजे?
मी : भाज्या, फळ ह्याची व्हरायटी.
प्रश्न वि : फळं खातो तू, परवडतं का तुला..? आमी बिझनेसवाले असून आमाला परवडत न्हाई, तुला परवडतंय..
मी : फळं खाणं आरोग्याला चांगलं असतेत म्हनतेत.
प्रश्न वि : कुणाच्या आरोग्याला चांगलं असतेत.
मी : आपल्याला प्रत्येक सीझनची फळं खाणं चांगलं असतंय म्हन.
प्रश्न वि : तितं मुंबईला तर कॉफर्ड मार्केटमधी कोणत्या सीझनला कोणती बी फळं मिळतेत म्हन.. द्राक्ष आणि आंबे तर वर्षभर असतेत म्हन की...
मी : अवोss ते असंल तसं, पण बाजारात ज्यादा फळं अाणि स्वस्त फळं जे असतेत ना.. ते खावं, असं म्हनतेत.
प्रश्न वि : उगं काय तर सांगायला. केळी, आंबा केमिकल घालून पिकवतेत. कलिंगड लाल रंग घालून करतेत. साखरेचं इंजेक्शन गोड करतेत म्हन की.. केमिकलनं पिकवलेली फळं खाल्लं, तर आरोग्य बिघडतंय का चांगलं राहतंय...
मी : अवो, नीट बघून गॅरेंटेड फळं घ्यायचं.
प्रश्न वि : फळाची काय गॅरंटी असती. कलिंगड दुकानात लाल दिसतंय, घरी गेलं की पांढरं होतंय. आंबा... दुकानात गोड असतंय. आपण घरी नेलेली पेटीच आंबट निघती. उगं काय सांगाला... घरी फळं नेलं ना... मी तर आधी शिव्या खातो. नंतर फळं खातो. तू नेलेली फळं काय गोडच असतंय...
मी : अवोss तसं नाई. जरा नीट बघून चौकशी करून घेतला ना... फळ चांगलं मिळतंय, भाजी चांगली मिळती...
प्रश्न वि : उगं काय तर सांगायला.. भाजी काय परवडती का.. घ्यायला..  ६० रुपये काकडी, २५-३० रुपये मेथी. असं महाग भाजी काेन खावं. गरिबांनी काय माती खावं..?
मी : अवोss ते बिझनेसची टॅक्ट असती... व्यापाराची.. आता बघा.. कधी टोमॅटो महाग, कोथिंबीर स्वस्त, कोथिंबीर महाग, कांदा स्वस्त..
प्रश्न वि : काय तर सांगाला उगं. काकडी तर ४० रुप्याच्या खाली उतरत नाही. लोकांनी हाय ना भाजी खायचंच बंद करावं.
मी : मग काय खायाचं..?
प्रश्न वि : डाळी खावं.
मी : डाळी काय स्वस्त आहेत का?
प्रश्न वि : सरकार देनार आहे म्हणं की... डाळ स्वस्त..
मी : कधी देनार कोणास ठाऊक, दिली तरी किती स्वस्त देनार सांगा बरं...
प्रश्न वि : कोण निवडलेत सरकार?
मी : आपण निवडलाव की...
प्रश्न वि : आपन नाही.. तुमी निवडलाव. आता कशाला वरडायचं उगं. आणि सरकारच्या नावानं कशाला, स्वत:च्याच नावानं वरडायचं..
मी : का?
प्रश्न वि : डाळ कोण म्हाग केलेत..?
मी : कोण केलेत..?
प्रश्न वि : तुम्हीच केलाव... की रेss..
मी : ते कसं..?
प्रश्न वि : शहरातले लोक काय डाळी तयार करतेत..?
मी : न्हाई.
प्रश्न वि : फक्त खातेत डाळी... डाळ तयार करनारे १० शेतकरी आणि खाणारे तुमच्यासारखे १ लाख माणसं. तू हाय ना डाळ खाऊ नको उद्यापास्नं. तू शेतात जा. तुझ्यापुरती डाळ पिकव. मग खा. मग डाळीची किंमत कळती तुला...
मी : आे.. मला कशाला बोलालाव उगाचच.
प्रश्न वि : मग कोणाला बोलू, तूच भाजीला चालला ना..?
मी : मग माझं काय चुकलं..?
प्रश्न वि : उगं काय तर बोलू नको. तुझंच चुकतंय सगळं.
मी : म्हंजे..?
प्रश्न वि : स्वत: भाजी न पिकवता कशाला खातो तू..?
मी : मी कसं पिकवू भाजी...?
प्रश्न वि : टेरेसवर भाजी पिकव की... ते लोक पिकवतेत म्हन की.. तसं...
मी : अवो... टेरेस गार्डनला पानी लागतंय. पानी तर ४-५ दिवसांनी एकदा येतंय.. कसं पिकवावं भाजी सांगा की...
प्रश्न वि : कुनामुळं यायलंय पानी... चार दिवसानं सांग बरं..?
मी : माझ्यामुळं.
प्रश्न वि : मग कुनामुळं पावसाचं पानी वाय घालवायचं... आणि दुसऱ्याला दोष द्यायचं..?
मी : अवोs मी काय केलो ओss ..?
प्रश्न वि : सगळं तूच करायलाय..
मी : मग तुमी करायलाव..?
प्रश्न वि :  मी काय करू... तुझ्यासारखे असतेत ना... त्यांना शानपन सांगतो.
मी : तुम्ही केलेय का टेरेस गार्डन..?
प्रश्न वि : टेरेस गार्डन केलं, बोर मारलो, रेन हार्वेस्टिन केली.. माझ्या घरची भाजी मीच माझ्या अंगणात उगवून खायलो.. तुझ्यासारखं न्हाई, असं निष्काळजी वागत न्हाई मी..
मी : उगं सकाळी सकाळी मला का येड्यात काडायलाव ओss..
प्रश्न वि : तू येड्यात निघतो म्हणून तुला येड्यात काढायलो.. असं वाटायलाय तुला. रोज एका येड्याला शाना करायचंय, असं ठरवलो. अाज तू भेटला त्याला मी काय करू..?

बातम्या आणखी आहेत...