आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीरोगतज्ञ, मनस्वी कलाकाराची पर्यावरणासाठी धडपड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपक कुलकर्णी

वैद्यकीय व्यवसाय किती धावपळीचा, ताणतणावाचा असतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. मात्र ती सर्व धावपळ, ताणतणाव विसरायला लावणारा छंद आणि जोडीला पर्यावरण रक्षणाचं भान ठेवून स्वत:मधला मनस्वी कलावंत जोपासणाऱ्या औरंगाबादेतल्या डॉ. अनुराधा यांच्याबद्दल...


रूग्णांची वर्दळ, ओपीडी,आयपीडी ,आयसीयूमधल्या रुग्णांसाठी विशेष धावपळ, कधी नॉर्मल प्रसूतीसाठी प्रयत्न तर कधी सीझरचा निर्णय... एखाद्या स्त्रीरोग तज्ञाची दैनंदिनी यापेक्षा वेगळी नसते. त्यांचं आयुष्यं रुग्णांभोवतीच फिरणारं असतं. मात्र अशाही तणावातून डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी पर्यावरण रक्षणाचा, चित्रकलेचा छंद जोपासत समाजभान जपलंय. त्यामुळे त्यांच्या तपासणी कक्षात शिरताच छोट्या-छोट्या बाटल्यात, कुंडीत लावलेली मनी प्लँट व विविध शोभेची हिरवीगार रोपे डोळ्यांना सुखावतात. 

खतनिर्मितीही घरीच... 


बागकामाची आवड जोपासताना झाडांना लागणारं खत डॉ. अनुराधा स्वत:चं तयार करतात. निवडलेल्या भाज्यांचे देठ, नको असलेली पाने, चिरलेल्या भाज्यांच्या-विविध फळांच्या साली, घर-रुग्णालयातला रोजचा कचरा छोट्या डस्टबिनमध्ये एकत्र करतात.  कचऱ्याला हवा मिळावी आणि ओल्या कचऱ्यातील पाणी बाहेर पडण्यासाठी डस्टबिनला छोटी-छोटी छिद्रे पाडून त्यांनी खतासाठी डबे तयार केलेत. या डस्टबिनमधल्या कचऱ्याची त्या नियमित निगा राखतात. त्यातून कचऱ्याचे खत तयार करतात. हे खत घरातल्या वेली, लहान झाडांसाठी वापरतात. बागकामाची आवड असणाऱ्या गृहिणीनींही  घरातच खत तयार करावं, असं अनुराधा यांना वाटतं.  बाजारातून तयार खत आणण्यासाठी लागणाऱ्या पैशांचीही यामुळे बचत होते. खत तयार करण्यात मेहनत आणि सातत्य मात्र हवे, असंही अनुराधा म्हणतात.  पाण्याचा पुनर्वापर


बागेतील वेलींना अथवा झाडांसाठी लागणारं पाणी हेही घरातलंच असतं. मात्र धुण्याभांड्याचं पाणी वाया न जाऊ देता त्याचा वापर त्या  झाडांसाठी करतात.  साबणाच्या पाण्याला बादलीत थोडा वेळ तसंच ठेवल्यास साबण अथवा पावडर खाली बसते. वरवरचे पाणी त्या झाडांसाठी वापरतात. यातूनच त्यांनी दोनशेच्या आसपास विविध प्रकारचे मनी प्लँट, चिनी गुलाब, जाई-जुईच्या वेली व शोभेच्या झाडांची लागवड केली आहे. चित्रकलेतही पारंगत 


डॉ. अनुराधा यांना चित्रकलेचाही छंद आहे. जलरंगातली  त्यांची चित्रं मनाला भुरळ घालतात. कुठल्याही मार्गदर्शन अथवा प्रशिक्षणाशिवाय केवळ आवड म्हणून त्यांनी काढलेली चित्रे एखाद्या निष्णात चित्रकारासारखी आहेत. निसर्गचित्रे, संकल्पचित्रे, ऐतिहासिक वास्तू हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. आजवर काढलेल्या  चित्रांचं प्रदर्शन भरवण्याचा त्यांचा मानस आहे.

लेखकाचा संपर्क : ९८२२८५७५६८

बातम्या आणखी आहेत...