आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटी संस्कारच महत्त्वाचे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटना साधारण 5 ते 6 वर्षांपूर्वीची. सासुरवाडीला जाण्यासाठी चाळीसगावहून गाडी पकडण्याचे ठरवले. एका अत्यंत जवळच्या इंजिनिअर मित्रालाही त्याच दिवशी चाळीसगावला जायचे होते. तेव्हा आम्ही दोघांनी त्याच्या गाडीतून चाळीसगावपर्यंतचा प्रवास करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे सकाळच्या सुमारास प्रवास सुरू झाला. प्रवासादरम्यान कौटुंबिक गप्पांचा विषय सुरू झाला. मी त्याला त्याच्या आईविषयी चौकशी केली. तेव्हा त्याच्या बोलण्याचा स्वर एकदम बदलला. तो म्हणाला, आई खूप वृद्ध झाली असून तिचे आणि आमचे पटत नाही. आम्ही गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कसेबसे सांभाळले. तिच्यावरून आम्हा नवरा-बायकोत भांडणे होऊ लागली. त्यामुळे तिला मोठ्या भावाकडे नेऊन सोडले आहे.
मोठ्या वहिनीशीही तिचे भांडण झाल्याने तिला आता घराबाहेरील एका आऊटहाऊसमध्ये ठेवले आहे. काहीच न बोलता हा विषय तिथेच संपला. परंतु एका वृद्ध मातेला दोन मुले असूनही तिची अशी आबाळ होते हे ऐकून मन खिन्न झाले. पुढे रेल्वेत बसल्यावर आमच्या समोरच्या सीटवर एक साधारण 55 वर्षांचे गृहस्थ व 75 वर्षांची वृद्ध बाई आपसात सिंधी भाषेत बोलत होते. त्या गृहस्थाने त्या वृद्धेची सुटकेस व्यवस्थित जमवून दिली. खांडवा स्टेशन येईपर्यंत एका नवपरिणीत जोडप्याने त्या दोघांचे आशीर्वाद घेतले. पुढे ते गृहस्थ माझ्याशी मराठीत बोलत होते. आपला परिचय करून देताना ते म्हणाले की, ही माझी बहीण असून फाळणीदरम्यान पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालो. कुटुंबापैकी आम्ही बहीण-भाऊच जिवंत राहिलो. माझा स्वत:चे कोल्हापुरात कपड्याचे दुकान आहे. बहीण हरदा येथे राहते. तिला मुले, नातू, पणतू आहेत. मी दरवर्षी आपल्या बहिणीला एका महिन्यासाठी आपल्या घरी आणतो. त्या व्यापा-याचे शिक्षण कमी असूनही तो संस्कारी होता, तर माझ्या मित्रावर संस्कार झालेलेच नसतील का? संस्कारच शेवटी महत्त्वाचे असतात. त्यावरुनच माणसाचे वर्तन कळते.