आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडकारण्य : ‘अभद्र’ युतीचा वारसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपक पटवे

ध्येयधोरणांच्या, विचारांच्या अगदी विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी सत्तेसाठी युती करण्याच्या प्रकारांमुळे भारतातले अनेक प्रादेशिक पक्ष बदनाम झाले आहेत खरे, पण हा वारसा आपल्याला मिळाला आहे तो ब्रिटनकडूनच. तिथेही लिब-लेब पॅक्ट होत आले आहेत.  
महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन टोकाचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि आपल्याकडे हे विपरीत कसे घडले म्हणून चर्चा सुरू झाली. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाने सत्तेच्या लालसेने हिंदू धर्माच्या रक्षणाचे ब्रीद बाजूला सारले, ज्यांना इतकी वर्षे टीकेचे धनी बनवले त्यांच्याच मांडीला मांडी लावून या पक्षाचे नेते सत्तेत बसले म्हणून अनेक माध्यमवीर आणि राजकीय विश्लेषकांनीही शिवसेनेवर आणि काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. असे करणारा शिवसेना हा काही पहिलाच प्रादेशिक पक्ष नाही, हे दाखवून देत आपण मग देशातील शिरोमणी अकाली दल, तेलगू देसम पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, स्वतंत्र पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांनीही कसे दशकानुदशके हेच केले आहे, हे आधीच्या भागांमध्ये पाहिले आहे. भारतात असे आणखीही बरेच प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांना सत्तेसाठी प्रवाहपतित व्हावे लागले आहे. त्यांच्याविषयीही आपण जाणून घेणार आहोत. पण, त्याआधी थोडे प्रगत देशांकडे, नव्हे ज्यांच्याकडून आपल्याला लोकशाहीचे धडे मिळाले त्या ब्रिटिशांकडे पाहू या. ब्रिटिश राजकारणात लिब-लेब पॅक्ट (Lib-Lab pact) या नावाची एक संकल्पना आहे. हे काय आहे, तर जसे आपल्याकडे शिवसेना आणि काँग्रेस यांची ‘अभद्र’ युती झाली आहे तशीच ही ब्रिटनमधली अभद्र युती म्हणता येईल. लिब हा लिबरल पार्टीसाठीचा शब्द आहे, तर लेब हा लेबर पार्टीसाठीचा शब्द आहे. यांनी सत्तेसाठी कशा एकमेकांशी तडजोडी केल्या आहेत हे जाणून घेण्याआधी हे पक्ष काय आहेत हे पाहूया. लिबरल पार्टी हा ब्रिटनमधला जुना पक्ष आहे. या पक्षाने अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर लेबर पार्टीचा जन्म झाला आहे. लिबरल पक्षाच्या राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली ती लक्षात घेऊन त्या पक्षाच्या ध्येयधोरणांना विरोध करण्यासाठीच खरे तर लेबर पार्टी अस्तित्वात आली आहे, असेच म्हणायला हवे. लिबरल या शब्दाचा अर्थच उदारमतवाद असा होतो. त्याच विचारांचा पक्ष म्हणजे लिबरल पार्टी. मुक्त बाजारव्यवस्थेचा खंदा पुरस्कर्ता. त्यासाठी भांडवलशाहीचाही पाठीराखा. सरकारीकरण जितके वाढेल, सरकारचा हस्तक्षेप जितका वाढेल तितका त्या देशातील नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होतो, असे हा पक्ष मानतो. सरकारने कमीत कमी काम केले पाहिजे, म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथेच सरकार पुढे आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक संपत्ती कमावण्याचा अधिकार आहे आणि ज्या ज्या सार्वजनिक गोष्टींचा कोणी वापर करेल त्याने त्यासाठी आवश्यक ती रक्कम अदा केली पाहिजे, कोणालाही काहीही फुकट देता कामा नये, ही या पक्षाची विचारधारा आहे. त्याच प्रकारची आश्वासने हा पक्ष सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देत असतो. याउलट लेबर पक्ष हा मजुरांचा म्हणजे गरिबांचा पक्ष मानला जातो. भांडवलशाहीबद्दल या पक्षाच्या मनात नेहमीच साशंकता असते. नव्हे, भांडवलशाही गरिबांसाठी मारक आहे, असे हा पक्ष सांगतो. सरकारने भांडवलशाहीला नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, मोठ्या उद्योगांवर कायद्याने भरपूर बंधने आणली पाहिजेत, श्रीमंतांवर मोठ्या प्रमाणात कर लावून त्या पैशाचे गरिबांमध्ये पुनर्वाटप केले पाहिजे, आरोग्याच्या सुविधा आणि शिक्षण हे सरकारने सर्वांना मोफत उपलब्ध करून दिले पाहिजे ही या पक्षाची भूमिका राहिली आहे. दोन टोकांवर असलेले हे दोन पक्ष म्हणजे आपल्याकडचे काँग्रेस आणि शिवसेनाच नाहीत का? पण, इतक्या टोकाची भूमिका असूनही हे पक्ष सत्तेसाठी एकत्र येण्याची उदाहरणे कायम समोर येत राहिली आहेत.पहिले लिब-लेब पॅक्ट झाले ते १९ व्या शकतात. खरे तर तेव्हा लेबर पार्टी अस्तित्वात नव्हती, पण ज्या संघटनेपासून हा पक्ष अस्तित्वात आला ती ‘लेबर रिप्रेझेंटेशन लीग’ त्याच भूमिका घेऊन लढत होती. १९ व्या शतकाच्या शेवटी हाऊस आॅफ काॅमनमधले अनेक खासदार लिबरल पार्टी आणि या लीगच्या एकत्रित पाठिंब्यावर निवडून आले होते. नंतर १९०३ मध्ये खऱ्या अर्थाने त्यांची युती झाली. म्हणजे लिबरल पार्टी आणि लेबर पार्टी यांनी १९०६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ३० मतदारसंघांत एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे न करण्याचा करार केला होता. त्यापैकी त्यांचे २९ उमेदवार निवडूनही आले होते. १९२३ च्या निवडणुकीनंतरही त्यांनी युती केली होती. लेबर पार्टीने लिबरल पार्टीच्या पाठिंब्यावर अल्पमतातले सरकार स्थापन केले होते. पण, लिबरल पक्षाने पाठिंबा काढल्यानंतर ११ महिन्यांनी हे सरकार पडले. पुन्हा १९२९ मध्येही लेबर पार्टीला सत्ता स्थापन करायला काही जागा कमी पडत होत्या. त्यावेळी लिबरल पार्टीने बाहेरून पाठिंबा देऊन लेबर पक्षाला मदत केली होती. ही परंपरा अजूनही सुरू आहे. मधून मधून तिथे अशा ‘अभद्र’ युतीचे सरकार सत्तेवर येत राहते.