आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीपक पटवे
deepak.patwe@dbcorp.in
अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर झुलत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षाने मागच्याच आठवड्यात बदललेले 'रंग' साऱ्या देशाने पाहिले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असे करण्यामागे शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाने सत्तालालसेतून फिकट केलेल्या 'भगव्या'ची पार्श्वभूमी आहे, हे वेगळे सांगायला नको. कारण काहीही असो, 'रंग' बदलण्याचा इतिहास हा या देशातील प्रादेशिक पक्षांचा अविभाज्य भाग आहे, हे मात्र खरे. हे बदलणारे रंग कधी विचारांचे असतील, तर कधी भूमिकेचे. कधी ते जाती-धर्माचे असतील, तर कधी राष्ट्रवादाचे. कधी तर ते 'मनसे'सारखे झेंड्याचे रंगही असतील. समोर निर्माण झालेली संधी साधण्यासाठी कधी ते बदललेले दिसतात, तर कधी नेतृत्वाच्या शैेली आणि वृत्तीमुळे बदललेले आढळतात. या बदललेल्या रंगाचा त्या त्या प्रादेशिक पक्षांना कधी फायदा झालेला आहे, तर कधी हानीही झाली आहे. काहींच्या रंग न बदलण्याच्या कृतीचेही असेच सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम झाल्याचे त्यांचा इतिहास सांगतो.
प्रादेशिक पक्षांच्या अशा रंग बदलण्याच्या इतिहासावर नजर टाकायची तर सर्वांत आधी समोर येतात ते तमिळनाडूतील द्रविडी पक्ष. त्यांना रांगेत पहिल्या स्थानी उभे करण्यामागे कारण आहे. एक तर प्रादेशिक पक्षांच्या इतिहासात हे द्रविडी पक्ष बऱ्यापैकी 'सिनिअर' आहेत. त्यामुळे 'सिनिअॅरिटी'नुसार मिळणारा मान त्यांना द्यायला हवा. दुसरे कारण म्हणजे, या पक्षांनी बदललेले रंग, अर्थात बदललेल्या भूमिका पाहिल्या तर थेट काळे आणि पांढरेच आठवावे लागते. इतके ते बदल टोकाचे आणि आश्चर्य वाटावे असे आहेत. काळानुरूप वाढणारे शिक्षणाचे प्रमाण, विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, त्यातून होणारे विचार परिवर्तन किंवा विचारांत येत जाणारी सौम्यता हे तर सर्वांनाच लागू आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांमध्ये हे बदल झाले, तर त्यात नोंद घ्यावी असे खरे तर काही असू नये. पण, या द्रविडी पक्षांनी काळाचे हे चक्र उलटे देखिल फिरवलेले आढळते. अर्थात, त्या बाबतीतही त्यांच्याशी स्पर्धा करणारे इतर प्रादेशिक पक्ष आहेतच.
द्रविड कळघम, द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि आताचा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ही द्रविडी पक्षांची साखळी आहे. कारण एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा पक्ष निर्माण झाला आहे. या सर्व पक्षांचा मातृपक्ष (पितृपक्ष मुद्दामच म्हणत नाही) म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रेरणेतून तयार झालेली 'जस्टिस पार्टी'. द्रविड आणि आर्य या सिद्धांताच्या पायावर १९१६ मध्ये हा पक्ष उभा राहिला. हा सिद्धांत म्हणजे द्रविड हे या देशातले मूळ निवासी. पण, मध्य आशियातून येऊन आक्रमण करणाऱ्या आर्यांनी इथे चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू केली. त्यात या देशाचे मूळ निवासी असूनही शिक्षण आणि अधिकारांपासून द्रविडांना वंचित ठेवले गेले. कारण आर्यांनी स्वत:ला उच्च स्थानी (ब्राह्मण) प्रस्थापित केले, तर द्रविडांना शुद्र (आजच्या मागास जाती- जमाती) ठरविले. त्यामुळे ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेली समाजव्यवस्था संपवून नवा समान पातळीवरचा समाज घडवायचा, या विचाराने प्रेरित होऊन हा पक्ष स्थापन झाला. त्यावेळच्या तमिळनाडूतील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये १६ पैकी १४ जण ब्राह्मण होते, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर या पक्ष निर्मितीची वेगळी कारणमीमांसा करायची गरज राहात नाही. त्यातूनच ब्राह्मणशाहीला म्हणजेच त्यावेळच्या काँग्रेसला जस्टिस पार्टी आपला शत्रू मानायला लागली. पेरियार (म्हणजे महामानव) म्हणून प्रसिद्ध झालेले इ. व्ही. रामास्वामी नायकर तर म्हणायचे की, ब्राह्मण नेत्यांचे वर्चस्व असलेल्या काॅंग्रेस पक्षाच्या हाती ब्रिटिशांनी सत्ता सोपवली, तर उपेक्षित, शोषित जातीतील जनतेचे काय होईल? पण ब्रिटिशांनी काँग्रेसच्याच हाती देशाची सूत्रे सोपवली. म्हणून १५ आॅगस्ट १९४७ हा दिवस काळा दिवस म्हणून पाळायची घोषणा पेरियार यांनी त्यावेळी केली.
काँग्रेस तेव्हा हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे म्हणून आग्रह करीत होती, तर पेरियार यांची जस्टिस पार्टी आणि पुढे नामांतर झालेली द्रविड कळघम पार्टी हिंदीची कट्टर विरोधक होती. द्रविड कळघमला द्रविडनाडू हे स्वतंत्र राष्ट्र करून हवे होते, तर काँग्रेस त्यावेळी एकराष्ट्रवादाची पुरस्कर्ती होती. इतका विरोधाभास असला, तरी पुढे याच जस्टिस पार्टीची अपत्ये असलेल्या द्रविडी पक्षांनी त्याच काँग्रेसला आपला मित्र बनवत तिच्याशी आघाडी केली. एवढेच नाही, ब्राह्मण असलेल्या जयललितांनी एका द्रविडी पक्षाचे नेतृत्वही केले. शिवाय, जस्टिस पार्टीचे एकेकाळचे अध्यक्ष राहिलेले पेरियार ज्यावर कठोर टीका करायचे, त्या कर्मकांडाचा पुरस्कार आणि मार्केटिंगही जयललिता यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जोमाने केले. इतर नेत्यांनीही असे रंग बदलले आणि पक्षाला मूळ धोरणांपासून दूर नेले. कोण होते ते नेते आणि पक्ष, हे पुढच्या भागात पाहू. मनसेने झेंड्याचा रंग बदलला, शिवसेनेने भगवेपण फिकट केले, हे अलीकडचे. या 'रंग' बदलाच्या बाबतीत इतर प्रादेशिक पक्षांचा इतिहासही दांडगा आहे. तामिळनाडूतील द्रविडी पक्ष तर त्याबाबतीत पितामहच म्हटले पाहिजेत, असे त्यांचे वर्तन राहिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.