आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक क्षेत्रातली अनीती 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच प्री एलएलबीच्या परीक्षा घेतल्या. त्या परीक्षेतील दोन पेपर्स रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने केला असून आता विद्यार्थ्यांना त्या दोन विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल. विद्यापीठाला हा निर्णय घ्यायला ‘दिव्य मराठी’ने  उघड केलेला एक शैक्षणिक घोटाळा कारणीभूत ठरला आहे. शहरातल्या एका विधी महाविद्यालयाने विद्यापीठाची परीक्षा सुरू होण्याच्या आठवडाभर आधी महाविद्यालयात एक सराव परीक्षा घेतली. त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आणि विद्यापीठाच्या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका यात ८० ते १०० टक्के साम्य असल्याचे लक्षात येताच, ‘दिव्य मराठी’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. सोबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे विद्यापीठाला या प्रकाराची दखल घ्यावी लागली. सततच्या पाठपुराव्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने चौकशी केली आणि एक अहवाल कुलगुरूंकडे दिला. त्यावर कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी दोन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे.  


परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षा सुरू होताच ती बाहेर येणे असले प्रकार होत असतात. त्याला बऱ्याचदा प्रश्नपत्रिका निर्मितीतली खालची फळी कारणीभूत असते. पैशांच्या मोहाने असे प्रकार केले जातात. पण या परीक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार गंभीर आहे. ज्यांनी विद्यापीठाला प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या त्यांनीच त्या प्रश्नपत्रिकांशी साधर्म्य असलेल्याच प्रश्नपत्रिका आपल्या महाविद्यालयात सराव प्रश्नपत्रिका म्हणून वाटल्या. आपल्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हावेत यासाठीच हा खटाटोप होता, हे उघड आहे. हा प्रकार या वेळी उघडकीस आणला गेला. पण यापूर्वीही असेच सुरू होते, अशीही माहिती समोर येते आहे. हा नैतिक भ्रष्टाचार आहे आणि आपल्या पेशाशी केलेली प्रतारणा आहे. उजळ माथ्याने ती केली जात होती. 


विद्यापीठाने हा प्रकार उघडकीस आणला गेल्यावर चौकशी केली आणि दोन विषयांची परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय घेतला हे चांगलेच झाले. पण या निर्णयाने आणखीही काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. चार प्रश्नपत्रिकांच्या बाबतीत हा प्रकार उघडकीस आला असताना दोनच विषयांच्या बाबतीत निर्णय का घेतला गेला? बरं, ज्यांनी हे अनैतिक आणि विद्यापीठाचा विश्वासघात करणारे कृत्य केले त्यांच्यावर विद्यापीठ काही कारवाई करणार आहे की नाही? ज्या विधी महाविद्यालयात हा प्रकार घडत होता त्या महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकांबरोबरच विद्यापीठातील यंत्रणाही या गैरप्रकारात सहभागी असल्याचे सिद्ध होते आहे. कारण विद्यापीठाकडे एकाच वेळी एका विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या प्राध्यापकांनी बनवून दिलेल्या असतात. प्रत्येक वेळी याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी बनवून दिलेल्या प्रश्नपत्रिका वापरण्याचा निर्णय दिला गेला. हे निर्णय देणारे विद्यापीठातील अधिकारीही यात सहभागी असल्याशिवाय कसे शक्य आहे? चौकशी करणाऱ्या समितीने या प्रकरणी काय अहवाल दिला आहे, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यापीठातील आपलेच सहकारी आहेत म्हणून कोणाला कारवाईतून सूट दिली जात असेल तर तोही नैतिक भ्रष्टाचार आहे, किंबहुना गुन्हा आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात विद्यापीठाने, विशेषत: कुलगुरूंनी गंभीर पावले उचलण्याची गरज आहे. 


कुलगुरू डाॅ. बी.ए. चोपडे यांचा अवघ्या तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. गेल्या पावणेपाच वर्षात कुलगुरू म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय केले आणि अनेक वादही ओढवून घेतले. अर्थात, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणारी यंत्रणा आहे आणि तिने ते केले असेलही. त्याची चर्चा कुलगुरू पदावर आहेत तोपर्यंतच होत राहील. खरा प्रश्न आहे तो दीर्घकाळ अस्तित्वात राहणाऱ्या या विद्यापीठाच्या ख्यातीचा. आज जगभरात अशी अनेक विद्यापीठे आहेत, ज्यांनी पिढ्यान‌्पिढ्या आपला लौकिक टिकवून ठेवला आहे. आजही त्या विद्यापीठांमध्ये शिकायला जाणे प्रतिष्ठेचे आणि भाग्याचे समजले जाते.  औरंगाबादच्या या विद्यापीठातील पदवीधरांना मात्र बाहेर अपेक्षित किंमत मिळत नाही हे सत्य कोणाला नाकारता येणार नाही. असे घडते ते विद्यापीठाविरोधात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे, असे कुलगुरू चोपडे यांना वाटते. त्यात तथ्य नाही असे नाही. पण त्याहून कटुसत्य तर हेच आहे की विद्यापीठाच्या कार्यकक्षेत घडणाऱ्या अशा नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आचरणामुळे विद्यापीठाची आणि पर्यायाने त्याच्या पदवीचीही पत कमी होत जाते. कुलगुरूंकडे आता जो कालावधी आहे, त्याचा वापर त्यांनी अशा अनैतिक कृत्यांवर कठोर प्रहार करून विद्यापीठाची प्रतिमा बदलवण्यासाठी करावा, अशी अपेक्षा आहे.


दीपक पटवे
- निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...