कुस्ती / 20 वर्षीय दीपक फायनलमध्ये; भारताचे चाैथे पदक निश्चित; कांस्यपदकाची  राहुलला संधी

दीपकची 86 किलाे वजन गटाच्या उपांत्य  फेरीत रेचमुथवर 8-2 ने  मात

वृत्तसंस्था

Sep 22,2019 10:49:00 AM ISTवृत्तसंस्था । नूर सुलतान
भारताच्या २० वर्षीय गुणवंत मल्ल दीपक पुनियाने शनिवारी जागतिक कुस्ती स्पर्धेतील भारताचे चाैथे पदक निश्चित केले. त्याने पुरुषांच्या ८६ किलाे वजन गटाची फायनल गाठली. दुसरीकडे गतवर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन मल्ल राहुल आवारेला आता स्पर्धेत कांस्यपदकाची संधी आहे. ताे ६१ किलाे वजन गटात भारतीय संघाला कांस्यपदकाचा बहुमान मिळवून देण्यासाठी आज रविवारी मैदानावर उतरणार आहे. त्याला उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, तरीही त्याने कांस्यपदकासाठीची संधी कायम ठेवली.


दीपकच्या अंतिम फेरीतील प्रवेशाने भारताचे स्पर्धेतील चाैथे पदक निश्चित झाले आहे. यापूर्वी भारताने २०१३ मध्ये जागतिक स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली हाेती. यासह भारताला आता या स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरीची नाेंद करण्याची संधी मिळाली. भारताच्या युवा मल्ल दीपकने आपल्या वजन गटाच्या उपांत्य सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टीफन रेचमुथचा पराभव केला. त्याने सरस खेळीच्या बळावर ८-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह ताे फायनलमध्ये दाखल झाला.


भारताला आतापर्यंत चाैथा आॅलिम्पिक काेटा
युवा मल्ल दीपक पुनियाने आपल्या ८६ किलाे वजन गटाची फायनल गाठून भारताला टाेकियाे आॅलिम्पिकसाठीचा काेटा मिळवून दिला. यासह भारताचा कुस्तीमधील हा चाैथा आॅलिम्पिक काेटा ठरला. यापूर्वी आता याच स्पर्धेत आॅलिम्पियन बजरंग पुनिया, रवी कुमार आणि महिला कुस्तीपटू विनेश फाेगटने भारताचा आॅलिम्पिक काेटा निश्चित केला आहे.


भारताला दुसऱ्या सुवर्णपदकाची संधी
आता भारतीय संघाला जागतिक कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या सुवर्णपदकाची आशा आहे. दीपकच्या रूपाने या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी दाेन वेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमारने २०१० मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. आता नऊ वर्षांनंतर ही संधी भारताच्या मल्लाला आहे. त्यासाठी दीपक प्रयत्नशील राहील.

X
COMMENT