आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण सखी हरित सखी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रिणींनो ज्या उत्साहानेे सण, व्रतवैकल्ये साजरे करतो त्याच उत्साहाने आपण निर्माल्याचं व्यवस्थापन करतो? जर हेच निर्माल्य बाग, एखाद्या कुंडीत मातीसह, शेणखतासह पुरलं तर काही दिवसांनी आपणास उत्तम दर्जाचे खत घरच्या घरी सहज मिळू शकते, तेही विनामोबदला.
 
 
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येता सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन्ह पडे ’ 

बालकवींच्या या ओळी कायम श्रावण महिन्याबद्दल मनात कुतूहल व आनंद निर्माण करतात. श्रावण, भाद्रपद महिना सुरु झाला की महिलांना सणवार, उत्सव, सोहळे साजरे करायचे वेध लागतात. यात सर्वात अग्रेसर असतात नवपरिणीत वधू. पहिल्या वहिल्या श्रावण सोमवारी नटूनथटून महादेवाची भक्ती करायची ओढ. ती बेलपत्राशिवाय कशी पूर्ण होणार? हल्ली चौकाचौकात रविवारपासूनच बेलाच्या फांद्या तोडून विक्री करायला बसणारी मंडळी असतात. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीच्या निमित्ताने, हरितालिकेला १६ प्रकारच्या वनस्पतींची १६-१६पाने गोळा करण्यासाठी परिसरातील चारपाच घरी फिरून वनस्पती गोळा केल्या जातात. पुन्हा बेलाला मान अग्रस्थानीच. शिवाय नैवेद्याकरिता केळीचे पान, आरस करण्याकरिता केळीचे खांब उपलब्धतेनुसार उपयोगात आणले जातात. सजावटीसाठी व पूजेसाठी व केसात माळायला गजऱ्यांसाठीतर विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची नितांत आवश्यकता असते. बहुतेक वेळा आपल्या आजूबाजूला असलेल्या शेजाऱ्यांना आधीच कल्पना देत पानाफुलांची सोय करून घेतली जाते. हल्ली तर याही प्रकारच्या सर्व वनस्पती पॅकेजप्रमाणे बाजारात सहज उपलब्ध असतात. हरितालिकेला रात्रभर जागरण करित दुसरे दिवशी येणाऱ्या गणपतीच्या स्वागताकरितासुद्धा आघाडा, केना, भृंगराज व इतर पत्रींची तयारी केली जाते. 

खरं तर आपल्या या सर्व धार्मिक चालीरीती, परंपरा या आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ घालवायला, पर्यावरण जपत पर्यावरणपूरक रितीभाती जपायला सुचवतात. पण आपण मात्र त्याच्याकडे त्या पद्धतीने न बघता फक्त एक सोपस्कार म्हणून बघतो व इथेच आपण चुकतो. अर्थात काही मैत्रिणी सजगपणे या बाबींकडे लक्ष देऊन हे सगळे सण, व्रत वैकल्ये अगदी पर्यावरण पूरक पद्धतीने म्हणजे पानं तोडण्याऐवजी वनस्पतीची रोपे वाटप करून साजरे करतात. श्रावण सरींनी न्हाऊन निघालेल्या वनस्पतींची पाने गोळा करतांना तितके जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहून स्वतःला नकळत मिळणाऱ्या प्राणवायूची आपल्या उत्साही, निरोगी होण्यासाठी न कळत मदत होत असते. आपण ज्या वनस्पतींची निवड करतो त्यात जास्तीत जास्त वनस्पती या औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आहेत. खरंतर या सर्व वनस्पती आपल्या परसबागेत, हल्ली कुंड्यांमध्ये, पोर्च वा गॅलरी वा टेरेस गार्डनच्या माध्यमातून आपल्या घरीच सहज उपलब्ध असायला हव्या. जेणेकरून त्यापासून मिळणारे सर्व लाभ आपणास मिळतीलच, शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात राहून आरोग्य चांगले राहण्यासाठी मदतच होईल.

मैत्रिणींनो, ज्या उत्साहाने आपण हे सण, व्रतवैकल्ये साजरी करतो त्याच उत्साहाने आपण निर्माल्याच्या व्यवस्थापनाची काळजी घेतो का? याप्रश्नाचे उत्तर ९५%नाही असेच असेल. मग तुम्ही म्हणाल की मग काय करतो तर आपण ज्या उत्साहाने वाहिलेल्या वनस्पतींच्या, फुलं, हारांच्या निर्माल्याची विल्हेवाट लावतो तेही शक्यतो सर्व निर्माल्य व्यवस्थित प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये गच्च भरलेल्या अवस्थेत करकचून गाठ मारुन कधीतरी जवळपासच्या नदी नाल्यात विसर्जित 

करून शेवटचे कर्तव्य पार पडले असे आपणाला वाटते. आणि नेमके इथेच आपण चुकतो. एकतर प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे त्या वनस्पती आतच सडतात दुसरे पर्यावरण प्रदुषणाचे एक मोठे संकट निर्माण होते ते वेगळेच. अर्थात माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीने हे सांगणे योग्य नव्हे, पण आपण खऱ्याअर्थाने श्रावणाचा, निसर्गाने भरभरून दिलेल्या प्रेमाचा अपमान करतोय.निसर्ग आपल्याला या काळात भरभरून देतोय व आपण त्यालाच काय परतफेड करतोय. हेच निर्माल्य आपल्याच बागे, एखाद्या कुंडीत आपण मातीसह, शेणखतासह पुरलं तर काही दिवसांनी आपणास उत्तम दर्जाचे खत घरच्या घरी सहज मिळू शकते, तेही विनामोबदला.
मैत्रिणींनो, विचार करण्याची वेळ आता आली आहे. पुर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा, सणवार नव्याने पर्यावरणपूरक पद्धतीने आपण सहज साजरे करू शकतो. पण तूर्तास एवढेच. चला, श्रावणी सखी होऊया, हरित सखी होऊया. निसर्ग जपूया. त्याला फुलवूया.
 

बातम्या आणखी आहेत...