आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दीपाली खेडकर
ग्रामीण, आदिवासी भागात काम करणं ही एक पर्वणी असते. काही अनुभव सहनशीलतेची परीक्षा घेतात तर काही अनपेक्षितपणे मनस्वी आनंद देऊन जातात. असाच एक आनंदी दिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते गावातील बालमेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून गेले तेेव्हा अनुभवला.
नवीन वर्षाचे संकल्प सगळेच करतात, परंतु त्यातील बहुतांश संकल्प आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले काम असे वैयक्तिक असतात. सामाजिक भान राखून, सार्वजनिक बांधिलकी मानून संकल्प करणारे विरळच. चार वर्षांपूर्वी नाशिक्लब या खासगी संस्थेतील सहा-सात कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे वेगळे पाऊल उचलले आणि ते आगळेवेगळे ‘पहिले पाऊल' ठरले. त्यावर्षी त्यांनी नवीन वर्षाचा संकल्प करून आदिवासी शाळेतील ३० विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप केले. त्यातून त्यांना एवढे समाधान मिळाले की त्यांनी एक-एक करीत तब्बल अाठ शाळा व शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वच त्यांनी स्वीकारलं. या उपक्रमाला नाव दिलं - ‘पहिले पाऊल'. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, व्यक्तिमत्त्व विकास व जीवनमान उंचावण्यासाठी ‘पहिलं पाऊल' आजपर्यंत विविध उपक्रम राबवत आलं आहे. त्यांच्या या कार्यामागील उदात्त हेतू लक्षात घेऊन आणिकच मंडळी त्यांना जोडली गेेली. मित्रपरिवार, नाशिक क्लबचे सभासद, नाशिकरोड डॉक्टर्स असा वाढत जाऊन हा ग्रुप २५ जणांचा बनला. या भागातील आरोग्याधिकारी, शिक्षणप्रमुख, सर्व शाळांमधील शिक्षकांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले. नुकताच त्यांनी आयोजित केलेल्या बालमेेळाव्याला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि ‘पहिले पाऊल'च्या कामाची मला प्रचिती आली.
ही संस्था जूनमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे दर्जेदार शैक्षणिक साहित्य, स्वेटर, रेनकोट, स्कूल शूज पुरवते. वेळोवेळी ग्रुपचे सदस्य शाळांना भेटी देऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात. मागील तीन वर्षांपासून या शाळांतील मुलांना एकत्र आणून त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा व शाळेच्या व दैनंदिन वातावरणातून थोडा विरंगुळा म्हणून बालमेळावा हा उपक्रम सुरू केला. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, गंमत जंमत, स्नेहभोजन याचा समावेश असतो. यावेळीही जावळ्याचीवाडी, दुगारवाडी, काळमुस्ते, हर्षेवाडी, जांभूळवाडी, उभ्रांडे, दिव्याचापाडा येथील ही मुले यात सहभागी झाली होती. त्यांचे आणि यांच्या शिक्षकांच्या उत्साहाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. दुर्गम भागातील नव्या पिढीतील या उत्साही शिक्षकांमध्ये मुलांवर काम करण्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती. संस्थेच्या डाॅक्टर पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यात संस्थेचे अध्यक्ष डाॅक्टर अजय पाटील, डाॅ. अभिनंदन कोठारी, डाॅ. अविनाश बाविस्कर व असोसिएशनचे १२ सदस्य सहभागी झाले होते.
अनेकदा ठराविक ठिकाणी मदतीचा मोठ्या प्रमाणात ओघ असतो. पण दुर्गम भागात जाऊन वेळ, पैसा, ताकद आणि भावना गुंतवून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि डोळ्यातील चमक बघण्यासाठी ही लोक वर्षभर मेहनत घेतात. आपल्यासाठी कुणीतरी न चुकता दरवर्षी आपल्याला भेटायला येतं याचं या मुलांना कोण कौतुक! कुणी कुणाचे नसताना फक्त प्रेमाच्या आणि आपुलकीच्या भावनेने बनलेले हे कुटुंब अनेकांना असेच कार्य करण्याची दिशा देत राहो हीच सदिच्छा!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.