आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाली नायगावकरने मंचावर शेअर केली खास आठवण, सोनाली कुलकर्णीसह पाणावले सगळ्यांचे डोळे!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनय क्षेत्रातील 14 ललनांचा सहभाग असलेली 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा सध्या 'झी युवा' वाहिनीवर सुरू आहे. अल्पावधीतच ही स्पर्धा अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. परीक्षक म्हणून सोनाली आणि मयूर यांची असलेली उपस्थिती आणि अद्वैत दादरकर याचं खुमासदार सूत्रसंचालन, यामुळे कार्यक्रमाने निराळी उंची गाठलेली आहे. स्पर्धक आणि परीक्षक यांचं निर्माण झालेलं निराळं नातं, ही सुद्धा या कार्यक्रमाची एक खासियत आहे.

पेशाने लावणी नृत्यांगना असलेली दीपाली नायगावकर, ही या स्पर्धेतील एक दर्जेदार स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. मूळची उस्मानाबादची असलेली दीपाली सर्वच स्पर्धकांसमोर मोठे आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरलेली आहे. आपल्या उत्कृष्ट नृत्याच्या जोरावर तिने सगळ्यांच्या मनात घर केलेले आहे. नुकतीच तिने स्पर्धेत एक लावणी सादर केली. या ठसकेबाज नृत्याच्या निमित्ताने तिने एक आठवण सुद्धा सगळ्यांसोबत शेअर केली.

एका नृत्यस्पर्धेत, सोनाली कुलकर्णीच्या 'अप्सरा आली' या गाण्यावर उत्तम डान्स केल्याबद्दल तिने पहिले बक्षीस पटकावले होते. 1000 रुपये किमतीचे रोख पारितोषिक तिला या स्पर्धेत मिळाले होते. ही आठवण सांगताना, सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्यासाठी आदर्श होती, हे सांगायला सुद्धा दीपाली विसरली नाही. या परितोषिकावर सोनालीचाच हक्क आहे, अशी भावना दिपालीच्या मनात होती. 'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने हे पारितोषिक सोनालीच्या हाती सुपूर्द करण्याची संधी मिळाल्याची भावना दीपालीने व्यक्त केली. सोनालीने सुद्धा मोठ्या मनाने ते बक्षीस स्वीकारले. सोनालीने त्यातील एका नोटेवर स्वतःची सही करून दीपालीला दिली. दीपालीसाठी हा फारच आनंदाचा क्षण होता. दोघींच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी आनंदाने एकमेकींना मिठी मारली. मंचावर घडणारी ही घटना बघताना साऱ्यांचेच डोळे भरून आले होते.   

बातम्या आणखी आहेत...