आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार प्रचारासाठी अनोखे फंडे वापरतात आणि आपला प्रचार वेगळ्या पद्धतीने करताना जास्तीत जास्त कसा होईल याकडे लक्ष देतात. शिवसेनेच्या मुंब्रा येथील उमेदवार दीपाली सय्यद यांनी अनोखाच प्रचार सुरू केला आहे. हिंदूबहुल भागात त्या दीपाली या नावाने प्रचार करतात तर मुस्लिमबहुल भागात सोफिया सय्यद नावाने प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मुस्लिमबहुल मतदारसंघात आव्हाड यांचा चांगला जनसंपर्क आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला गेला. गेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांनी शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांचा पराभव केला होता. मुस्लिमबहुल भाग असला तरी एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या, तर भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. कळव्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ठिकाणी योग्य उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने दीपाली सय्यद यांना शेवटच्या क्षणी शिवसेनेत घेऊन मुंब्र्याची उमेदवारी दिली. दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात रंगत निर्माण झाली असून आव्हाड यांच्यासमोरही तगडे आव्हान उभे ठाकले आहे. मुंब्रा भागातून दीपाली यांनी सोफिया नावावर मते खेचल्यास आव्हाड यांना विजय प्राप्त करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळेच त्या असा प्रचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
मूळ नाव दीपाली भोसले, लग्नानंतर सोफिया सय्यद
४१ वर्षीय दीपाली सय्यद यांचे मूळ नाव दीपाली भोसले असून लग्नानंतर त्यांचे नाव सोफिया सय्यद झाले आहे. मात्र, त्यांचे खरे नाव दीपाली सय्यद असेच असून याच नावाने त्यांनी निवडणूक अर्जही भरला आहे. मात्र, जेव्हा त्या मुस्लिमबहुल भागात प्रचार करायला जातात तेव्हा त्या आपले नाव सोफिया सय्यद सांगतात आणि अन्य ठिकाणी दीपाली सय्यद असे नाव सांगून प्रचार करतात. त्यामुळे या मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.
२०१४ मध्ये आपकडून लढल्या होत्या
दीपाली सय्यद यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगरमधून निवडणूक लढवली होती. यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश केला. नगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी केलेले आंदोलन फार चर्चेत राहिले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
सय्यद आडनावाने मते खाण्यास उभी नाही
२०१४ मध्ये जेव्हा दीपाली यांना सय्यद आडनावाचा फायदा घेत आहात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्या म्हणाल्या होत्या, आडनाव सय्यद असल्याने कोणाची तरी मते खाण्यासाठी उभे राहिल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझे आडनाव सय्यद असले, तरी मी पूर्वाश्रमीची भोसले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.