Home | Magazine | Rasik | deepankar rasik article

ऐसा चौकीदार होणे नाही!

दीपांकर | Update - Mar 17, 2019, 01:35 PM IST

विकासपुरुष अशी स्वत:ची प्रतिमा घडवून मोदी सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर या विकासपुरुषाला विनम्रतेची जोड देत त्यांनी प्रधा

 • deepankar rasik article

  विकासपुरुष अशी स्वत:ची प्रतिमा घडवून मोदी सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर या विकासपुरुषाला विनम्रतेची जोड देत त्यांनी प्रधानसेवकाची नवी प्रतिमा उभारली. धाडसी निर्णय जसे अंगलट येऊ लागले, तसे चर्चेचा रोख बदलण्यासाठी विरोधकांना कायद्याचा इंगा दाखवणे राजकारणदृष्ट्या अपरिहार्य होऊन बसले, तेव्हा प्रधानसेवकाला विंगेत ढकलून स्वत:ला लष्करी शिस्तीचा चौकीदार म्हणवत स्वत:ची आणखी एक प्रतिमा जनतेच्या मनावर ठसवली. विकासपुरुष-प्रधानसेवक-चौकीदार... यात एकसमान सूत्र आहे, नियोजनबद्ध प्रतिमासंवर्धनाचं आणि बाजार व्यवस्थापनाचंही. भांडवलशाही हेच सूत्र वापरून ग्राहकांवर राज्य करू पाहते, चौकीदाराची भूमिका बाजवणाऱ्या मोदींनी हीच भांडवलदारी सूत्रं वापरून मतदारांना वश केलं आहे. वशीकरणाचा हा प्रयोग पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यशस्वी होणार ही त्यांच्या समर्थकांना पूर्ण खात्री आहे आणि तो फसावा असं विरोधकांचं "विशफुल थिंकिंग' आहे...


  संसदेत प्रवेश करतेवेळी पायऱ्यांवर मनोभावे डोकं टेकवणारा प्रधानसेवक ते विधिनिषेध न बाळगता तळाला जाऊन निवडणुकांचं राजकारण करणारा चौकीदार... हा नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा सुसंगीपेक्षाही विसंगतींनी व्यापलेला पट आहे. शिताफीने एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरणे, नाकावर टिच्चून शब्द देणे आणि चतुराईने तो फिरवणे ही त्यांची खासियत राहिली आहे. पहिलेपणाचं श्रेय घेण्याचा त्यांचा सोस देशाने अनेकदा अनुभवला आहे. म्हणजे, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान, मॅडिसन स्क्वेअरमध्ये रॉक शो टाइपचा कार्यक्रम करणारे पहिले भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यानंतर आजवरचे सर्वात ‘मजबूत’ सरकार देणारे पहिले पंतप्रधान, पाकिस्तानविरोधात आधी सर्जिकल स्ट्राइक आणि नंतर पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे धाडसी आदेश देणारे पहिले पंतप्रधान अशी त्यांची जनतेच्या मनावर वारंवार ओळख ठसवण्यात आली आहे.


  हा अर्थातच त्यांच्या माध्यम व्यवस्थापनतंत्रावरच्या सध्या तरी अपराजेय हुकुमतीचा परिणाम आहे. गांभीर्यपूर्वक चर्चा-चिकित्सेला, समस्येच्या पाठपुराव्याला जराही अवकाश न देणारे आणि समजा कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला देशविरोधी ठरवण्यात पोषक वातावरण निर्मिती करणारे मोदींचे हे माध्यमतंत्र हा खरा तर समाजअभ्यासक-मानसशास्त्र तज्ज्ञ यांच्या स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यातून मोदींचेच नव्हे आताच्या "हायपर सेन्सिटिव्ह' होत गेलेल्या समाजाचे मानसही दृश्यमान होण्याची शक्यता आहे.
  गेल्या पाच वर्षांत खरा खोटा पहिलेपणाचा मान मोदींना दिला गेला आहेच. आणि तो त्यांनी आत्मविश्वासपूर्वक मिरवलाही आहे. पण इतरही अनेक गोष्टीत त्याचं पहिलेपण ठळकपणे दिसून आलं आहे. म्हणजे, बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांचा उघड पाठिंबा असलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. जगभर पसरलेल्या ‘गुजराती डायस्पोरा’ची ताकद ओळखून ओव्हसीज व्होटर म्हणून त्यांचे आणि इतरही हिंदुत्ववादी धर्माचरणी अनिवासी भारतीय समुदायांचे उपयुक्तता मूल्य ओळखलेले आणि ते ओळखून त्यांचे मन काबीज केलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. देश-विदेशात व्यापार उदिमात अग्रेसर असलेला गुजराती समाज, या समाजाचे कॉर्पोरेट विश्वात असेलेले प्राबल्य याचा सत्ताकारणासाठी यशस्वी वापर करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, हे खरेच आहे.


  आजवर मुख्यत्वे उ.प्रदेशचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना पंतप्रधान पदाचा मान (तसा तो मोदींनीही एकाचवेळी वाराणसीहून निवडणूक लढवून मि‌ळवला आहे.) मिळालाय, उ.प्रदेशचा गुजराती समाजाइतकाच देश-विदेशातल्या स्थलांतराचा प्रदीर्घ इतिहास आहे. परंतु उ.प्रदेशी समाजाचं व्यापार-उदिमात प्राबल्य नाही. कॉर्पोरेट विश्वात प्रभाव नाही. याच कॉर्पोरेट विश्वाची उघड नव्हे मूक संमती यापूर्वी अनेकदा महत्वाची ठरत आली आहे. ती मिळणं वा मिळवणं गुजरातेतून आलेल्या, छदामाचा प्रत्यक्षात कधीही व्यापार न करूनही नसानसांत व्यापार असलेल्या मोदींसाठी काहीसे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतासारखे आहे. हे असं समीकरण याच्या पुढच्या काळात अभावानेच जुळून येणार आहे. तसं तर डॉ. मनमोहन सिंह ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तो शीख समाजही जगभर आपले अस्तित्व राखून आहे. परंतु, फरक मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या राजकारण करण्याच्या वृत्ती-प्रवृत्तीत आहे. निवडणुकांचं राजकारण तळाला जाऊनच करायचं असतं, या ठाम विश्वासात आहे.


  मुख्यत: व्यापार-उद्योगात आघाडी घेतलेल्या गुजराती डायस्पोराचा वेळोवेळी चतुराईने वापर करून घेतल्यानेच इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशात मोदींचे भव्यदिव्य आगत-स्वागत घडून आले आहे. यातून त्यांची सर्वव्यापी, सर्वशक्तिमान अशी प्रतिमा अधिकाधिक ठळक होत गेली आहे. त्यांची ही प्रतिमाच त्यांच्या समर्थकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश देण्याचं काम करत आली आहे. ते पूर्णपणे भेदणं किंवा नष्ट करणं गेल्या पाच वर्षात विरोधकांना अभावानेच जमलेलं आहे. लोकशाहीने दिलेल्या साधनांचा अत्यंत चाणाक्षपणे आणि चतुराईने वापर करणारेही बहुदा मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. भारताचा पंतप्रधान कसा असावा (विरोधकांच्या मते कसे नसावा) याचे मापदंडच जणू मोदींनी गेल्या पाच वर्षात घालून दिले आहेत. म्हणजे, जेव्हा कधी मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील, तेव्हा त्यांची जागा घेणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याची मोदींशी तुलना होणार आहे. त्या पंतप्रधानाने बाहेर देशात जाऊन ‘मॅडिसन स्क्वेअर’ टाइप शो नाही केले, नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइकसारखे आक्रमक निर्णय नाही घेतले, तर तो यशस्वी मानला जाणार नाहीये.
  स्वपरिभाषित विकासाचं राजकारण करणारे मोदी, धर्माचे राजकारण करणारे मोदी आणि निवडणुकांचं राजकारण करणारे मोदी या तीन भिन्न प्रवृत्ती भासत असल्यातरीही त्यामागची वृत्ती एकच आहे.


  विकासाच्या राजकारणाला धर्माची आणि धर्माच्या राजकारणाला निवडणुकांच्या राजकारणाची जोड देत जनमानसाचा ताबा घेण्याची त्यांची योजना विरोधकांना नामोहरम करत आली आहे. यात विकासाचा नारा आणि देशभक्तीचे आवाहन नेहमीच बुलंद राहिले आहे. निवडणुका नसतील तर धर्मरक्षणाचा उद््घोष त्यांच्या बाजूने अस्फूट पातळीवर राहील, याचीही त्यांनी खबरदारी घेतली आहे. या काळात धर्माचा ध्वज रा.स्व. संघ आणि संलग्न संस्था-संघटनांनी खांद्यावर घ्यायचा ही विभागणी प्रारंभापासूनच सुस्पष्ट राहिलेली आहे. तर मोदींनी, जितकं तळाला जाऊन निवडणुकांचं राजकारण तितकं मोठं राजकीय यश हे समीकरण रूजवलं आहे. अर्थात भाजपमधल्या इतर नेत्यांनी असं राजकारण केलं तर ते फसण्याचीच शक्यता अधिक आहे, मात्र प्रभावी माध्यमतंत्र आणि नियोजनबद्ध प्रतिमा संवर्धन या दोन गोष्टींमुळे मोदी विधिनिषेधशून्य निवडणुकांचं राजकारण करूनही जगज्जेत्याचा वेश आणि आवेश टिकवून आहेत. सभ्यतेच्या संकेतात न बसणाऱ्या गोष्टी, उदा. माजी पंतप्रधान पाकचे गुप्त समर्थक असल्याचा संशय निर्माण करणं, विरोधी नेते देशद्रोही असल्याचे सुचित करत राहणं, निवडणूक प्रचारात शमशान-कब्रस्तान वाद जाणीवपूर्वक उकरून काढणंआदी गोष्टी मोदींनी लीलया आणि सातत्याने साधल्या आहेत. तरीही त्यांच्या समर्थक-मतदारांच्या मनावर त्यांच्याविरोधात साधा ओरखडादेखील उमटला नाही.


  मोदींच्या मीडिया मॅनेजर्सनी प्रतिमासंवर्धनाचं तंत्र थेट हिंदी सिनेमांमधून, त्यातही अमिताभ बच्चनला ‘लार्जर दॅन लाइफ’ रूपात पेश करणाऱ्या सिनेमांमधून उचलल्यासारखं आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकाचा काळ हा अमिताभला महानायक रूपात प्रभावीपणे सादर करण्याचा काळ होता. मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा हे दिग्दर्शक त्यात आघाडीवर होते. या निर्माता-दिग्दर्शकांचा लाडका सिनेमॅटोग्राफर होता, पीटर परेरा. या पीटरने पडद्यावर अमिताभला महानायक म्हणून पेश करण्यात मोठी मेहनत घेतली होती. म्हणजे, काय तर अमिताभ रंगवत असलेल्या भूमिकेतली बंडखोरी, आग, संताप, नसानसात मुरलेलं त्याचं योद्धापण, शत्रूला कायम आव्हान देणारी आक्रमक देहबोली प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यासाठी अमिताभची नैसर्गिक उंची, हातांच्या निर्णायर हालचाली यांचा कल्पक वापर केला होता. अमिताभ त्वेषाने हात फैलावून संवादफेक करत असेल, तर एकटा अमिताभ फैलावलेल्या हातांसह,आक्रमक देहबोलीसह फ्रेममध्ये दिसत राहील, अमिताभ नाचत असेल तर त्याच्या हातापायांच्या हालचालीने फ्रेम भरून राहील अशी ही योजना होती. तिचा ७० एमएम पडद्यावरचा परिणाम अभूतपूर्व होता. आता मोदींची सभेच्या वेळी टिपण्यात येणारी मुख्यत: प्रिंट मीडियातून, सोशल मीडियातून प्रसिद्ध होणारी छायाचित्रं पीटर परेराच्या इमेज बिल्डिंग तंत्राची आठवण करून देणारी असतात. ती कुणी एैऱ्यागैऱ्याने नव्हे, त्याकामासाठी खास नियुक्त केलेल्या छायाचित्रकारांनीच काढली असतात. मोदींनी सभेत बोलताना, हाताच्या मुठी आवळून हात उंचावले असतील. दोन्ही बाजूंना फैलावले असतील तर फोटोफ्रेम ही दोन्ही हातांच्या टोकांपर्यंतची रूंद असते. यातून मोदींचा शत्रू पक्षावर तुटून पडतानाचा जोश जनतेच्या मनावर ठसवत जातो. मोदींची स्टॅटिक वा हतबल पोज अभावानेच जनतेपर्यंत पोहोचते, यामागेदेखील परिणाम-प्रभावाची समीकरणं पक्की असतात. म्हणूनच जेव्हा विरोधक टीकाकारांना पराभूत, हताश मनोवस्थेतले मोदी दाखवायचे असतात, त्यांना जुन्यापान्या फोटोंमधून ते महत्प्रयासाने शोधावे लागतात.


  अगदी कालपरवापर्यंत राजकीय नेत्यांचे, अर्थात बाळासाहेब ठाकरेंचा अपवाद वगळता, राजकीय सभेतले नेत्यांचे केवळ चेहऱ्यांचे दर्शन घडवणारे फोटो प्रकाशित होत आले होते. मात्र, मोदींच्या व्यवस्थापकांनी इथेही पहिलेपणाचा मान राखत ‘लार्जर दॅन लाइफ’ रूपात त्यांचे प्रतिमासंवर्धन घडवून आणले आहे. राजकारणात यशस्वी व्हायचं तर, खरा नसेल तर बनावट शत्रू निर्माण करून तो खराच शत्रू आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवावे लागते. काँग्रेसनेही हे केले, पण त्यात मर्यादा होत्या, सभ्यतेची काही प्रमाणात चाड होती. मात्र मोदींनी स्वत:ला चौकीदाराची उपमा देत नवी प्रस्थापना केली आहे. काँग्रेससह इतर सारे विरोधक भ्रष्टाचारी आहेत, कमकूवत आहेत आणि तरीही ते सत्तातूर आहेत, हा विचारव्यूह रचून स्वत:ला प्रधानसेवकाची उपमा देत मोदी सत्तेत आले. स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, या प्रधानसेवकाच्या प्रतिमेला बळकटी देणाऱ्या योजना राबवून सुरुवातीची दोन वर्षं दणक्यात पार केली. नोटबंदीच्या निर्णयापासून त्यांनी त्यांच्यातल्या प्रधानसेवकाला रिटायर्ड केले आणि कृतीशी सुसंगत ठरेल अशी स्ट्रिक्ट चौकीदाराची उपमा देत नवी प्रतिमासृष्टी रचली.या प्रतिमासृष्टीतला चौकीदार अत्यंत सावध, चलाख, धूर्त आहे. त्याला त्याच्या पदाचं महत्वही ठावूक आहे आणि सत्तेच्या चाव्या चौकीदाराकडे सोपवणाऱ्या जनतेची अडचणही ठावूक आहे.


  म्हणजे, हा चौकीदार परिस्थिती पाहून रंग बदलतो. तो, मनात आलं तर नाकासमोर चालणाऱ्या विरोधकाला सोडूही शकतो, इंगाही दाखवू शकतो. तो मनात आणलं तर बेकायदा घुसखोरी करणाऱ्यांना रोखू शकतो, सोडूही शकतो. तो सोयीचं असेल तर गुन्हा घडताना हस्तक्षेप करून गुन्हेगारांना रोखूही शकतो आणि "मला ठावूकच नाही' असा आविर्भाव आणत स्वत:ची नजरही फिरवून घेऊ शकतो. तो गुन्हा घडलेला बघूनही ‘मुझे नही पता’ म्हणत गप्पही राहू शकतो, आणि "हा, मैंने देखा है, गुन्हेगारों को कडी से कडी सजा मिलनी चाहीए' असं स्टेटमेंटही देऊ शकतो. तो काल्पनिक घटना-प्रसंग-आकडे रचून समोरच्याची मती गुंगही करू शकतो आणि खरे घटना-प्रसंग-आकडे झाकून विरोधातल्यांची अवडवणूकही करू शकतो. तो कधीतरी प्रेमात येऊन एखाद्या चिमुरडीला चॉकलेट देऊन खूशही करू शकतो आणि निरुपद्रवी जोडप्यावर दंडुकाही उगारू शकतो. त्याच्याविरोधात समजा तुम्ही तक्रार घेऊन गेलं तर तो तक्रार करणाऱ्याविरोधात बोंब ठोकू शकतो, तो कायदेनियमांचा धाक घालू शकतो, पण सोयीने अप्राप्य भासणारी गोष्ट नियमांच्या चौकटीत बसवूदेखील शकतो. तो इतरांना सढळ हस्ते मदतही करू शकतो आणि इतरांच्या कामाचं श्रेय स्वत: एकटाच लाटूही शकतो. तो नंबरात आलेल्या हुशारांना मुख्य प्रवेशद्वारावर रोखूही शकतो आणि बनेलांना कुणाच्या नजरेत न येता ह‌ळूच मागच्या दाराने आतही घेऊ शकतो. तो स्तुतीपाठकांच्या शाब्दिक-शारिरीक हिंसेकडे डोळेझाकही करून शकतो आणि त्याच्यावर चौरीचा आळ घेणाऱ्यांनाच देव-देश आणि धर्मविरोधी ठरवून तो कोर्टकचेऱ्यांत अडकवूसुद्धा शकतो.


  ही सगळी रूपं स्वत:ला चौकीदार म्हणणाऱ्या मोदींमध्ये अनेकांनी गेल्या पाच वर्षात बघितली-अनुभवली. सत्ताकाळ संपता संपता चौकीदाररुपी मोदींनी भ्रष्टाचारी, कमकुवत असलेल्या विरोधकांना सहजपणे देशद्रोहीसुद्धा ठरवलं. विरोधकांना देशद्रोही म्हणणं, पाकसमर्थक म्हणणं, विरोधी पक्षांच्या राज्यसरकारविरोधात संशय पेरणं, पदाचं दडपण न घेता त्यांनी मोठ्या धडाक्यात रेटून नेलं. तुम्ही पंतप्रधान आहात, लोकांपुढ्यात तक्रार कसली करताय, विरोधक देशद्रोही असतील तर कोर्टात सिद्ध करा, त्यांना अटकेत टाका. विरोधी पक्षांची सरकारे लोकांची कर्जमाफी योजनांत फसवणूक करत असतील, त्याचा त्यांना जाब विचारा, असे तर्काला धरून असलेले प्रश्न विचारण्याची उसंतही त्यांनी विचारी जनतेला घेऊ दिली नाही.स्वत:ला चौकीदार म्हणत स्वत:ला हवी तेवढी सूट घेत पंतप्रधानपदावरच्या नेत्यांनी आजवरच्या इतिहासात जे संकेत पाळले, ते सारे त्यांनी धुडकावून लावले.गत सत्ताकाळातल्या अपराधांचं भलं मोठं ओझं वागवणाऱ्या काँग्रेसविरोधात त्यातही मुख्यत: राहुल-सोनिया गांधींविरोधात संभ्रम, संशय पेरणे यालाच त्यांचं पाच वर्षांच्या सर्वोच्च प्राधान्य राहिलं. बँकांचे कोट्यवधींचे घोटाळे समोर आले, विजय मल्ल्या, नीरव मोदींसारखे बडे उद्योगपती सरकारला गुंगारा देऊन पसार झाले, शेतीच्या समस्येने टोक गाठले, बरोजगारीने क‌ळस गाठला, तरीही हे काँग्रेसचं पाप आहे, हे समर्थकांच्या मनावर बिंबवण्यात ते यशस्वी ठरले. निवडणुका जाहीर होण्याआधी जनतेचाच पैसा वापरून स्वकर्तृत्वाच्या पानपानभर जाहिराती प्रसृत करून त्यांनी एकाच वेळी स्वत:ची जाहिरातबाजीही केली आणि माध्यमांना उपकृतही करून टाकले. काही नव्या, तर काही आधीच केलेल्या विकासकामांचेही धडाक्यात उद््घाटन, आरंभ करून विकासाचा माहोल तयार केला. विरोधकांनी जेव्हा त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरं देण्याच्या फंदात न पडता मोदींनी तुम्ही साठ वर्षांत काय केलं हे सांगा' असा आवाज चढवून सवाल केला.


  सबंध भारतात गुजरात राज्यांतून लष्करात दाखल होणाऱ्यांची सगळ्या कमी संख्या आहे. हा प्रश्न कुणाच्या मनात आला तरी तो ओठांवर कधीच येणार नाही, अशाप्रकारे मोदींनी कधी सीमेवर जाऊन लष्करी गणवेशात दिवाळी साजरी केली, कधी लष्कराची टोपी परिधान करून तर कधी आवेशात रणगाड्यावर बसून जनतेमध्ये स्वत:ची "मॅचो मॅन' ही प्रतिमा घडवली. मला हव्या तेवढ्या शिव्या घाला. माझ्या जवानांवर शंका घेऊ नका,असा बळी ठरलेल्याने विचारावा असा उफराटा सवाल त्यांनी विरोधकांना केला. मोदी आक्रमक आहेत, मोदी धडाडीचे आहेत आणि मोदी हेच देशाचे एकमेव रक्षणकर्ते, महनायक आहे हे त्यामधून सुचवलं गेलं. जेव्हा नोटबंदीसारखा एखादा खूपच अटीतटीचा प्रसंग आला, मोदींची मातृभक्त ही प्रतिमा पुढे आणली गेली. त्यांचं विनापाश असणं, अविवाहित असणं, नि:संग असणं पुढे आणलं गेलं. लंडन दौऱ्यात वेस्टमिनस्टर हॉलमध्ये आयोजित "भारत की बात, सब के साथ' कार्यक्रमात खुद्द मोदींच्या पेहरावापासून मंच सजावटीपर्यंत सारं काही प्रचारकी-भपकेबाज असूनही गीतकार-सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिलेली "फकीर' ही उपमा त्यांनी मोठ्या खुबीने मिरवली. याचमुळे यशवंत सिन्हा, अरुण शौरींसारखे पूर्वाश्रमीचे भाजप नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदतीला येऊनही मोदींच्या जाकिटाला भ्रष्टाचाराचा एकही डाग उमटला नाही.


  आता पाच वर्षांनंतर प्रधानसेवकापासून सुरुवात केलेले मोदी लष्करी शिस्त अंगी बाणवलेल्या कर्तव्यकठोर चौकीदाराच्या रुपात पुन्हा एकदा मतदारांसमोर उभे आहेत. त्यांचं उघडपणे धर्माभिभानी असणं, त्यांचं उघडपणे नातेवाईकांना अंतर देणं, त्यांचं उघडपणे कायदा-नियमांचा वापर करून विरोधी नेत्यांना सळो की पळो करून सोडणं, त्याचं हटवादी नोकरशाहीवर वचक ठेवणं, त्यांचं उघडपणे पाकिस्तानला उद्देशून "चुन चुन के बदला लेंगे'म्हणणं कडव्या हिंदुत्ववादी, मुस्लिमद्वेष्ट्या समर्थकांनाच नव्हे तर हुकुमशाहीचे समर्थक असलेल्या मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय मतदारांना भावनिक परमसुख देणारं आहे. असा मतदार-समर्थकांना भावनांच्या लाटांवर बसवून सी-सर्फिंगचा आनंद पुरवणारा असा "चौकन्ना'चौकीदार गेल्या सत्तर वर्षांत झाला नाही, पुढेही होणे नाही!


  ता.क. प्रस्तुत लेख लिहून झाल्यानंतर बातमी प्रसिद्ध झाली. पंतप्रधान मोदींनी "मैं भी चौकीदार' नावाच्या मोहिमेची घोषणा केली. योगायोगच हा. तुमचा चौकीदार दृढनिश्चयी आहे. पण मी एकटा नाहीये. प्रत्येक जण जो देशाच्या प्रगतीसाठी कष्ट घेतोय, तो चौकीदार आहे, आज प्रत्येक भारतीय मीसुद्धा चौकीदार आहे, हे गौरवाने बोलतोय, असं त्यांना सुचवायचं आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी म्हणजेच ३१ मार्च रोजी या मोहिमेशी निगडित कार्यक्रम होणार आहे. म्हणजे ज्या चौकीदाराला विरोधकांनी त्यातही मुख्यत: काँग्रेसने चोर म्हटलं त्यालाच मोदींनी आपल्या कार्यशैलीस अनुसरून प्रतिष्ठेची बाब बनवलं आहे.

Trending