आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धैर्यगाथा : भावनांचं रण जिंकत सिद्ध होतेय ‘विजेता'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘हे’ रणांगण लीलया पार करून, त्या आता सिद्ध होताहेत उत्तुंग गगनभरारीसाठी.. सर्वार्थानं ‘विजेता’ होण्यासाठी..!

दीप्ती राऊत

पतीने घेतलेला देशसेवेचा वसा अन् त्यातून लाभलेल्या राष्ट्रभक्तीच्या वारशाचा हृदयात होणारा ‘निनाद’ हाच जणू त्यांचा श्वास बनला आहे... देशरक्षणासाठी सरसावलेल्यांना शत्रूशी लढण्याआधी मनातलं, भावनांचं युद्ध जिंकावं लागतं... ‘हे’ रणांगण लीलया पार करून, त्या आता सिद्ध होताहेत उत्तुंग गगनभरारीसाठी.. सर्वार्थानं ‘विजेता’ होण्यासाठी..!    
 


गेल्या वर्षीचा २८ फेब्रुवारीचा तो दिवस होता. मांडवगणे कुटुंब चिमुकल्या वेदितेच्या वाढदिवसाच्या आनंदात होतं आणि पायाखालची जमीन हादरवणारी ‘ती’ बातमी आली... भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर निनाद मांडवगणे सेवा बजावताना सीमेवरील बडगाम येथे झालेल्या अपघातात शहीद झाले होते. पुलवामा प्रकरण ताजे होते, आदल्याच दिवशी पाकच्या घुसखोरीच्या, भारताच्या उत्तराच्या बातम्यांना पूर आला होता. शहीद निनाद यांंचे पार्थिव नाशिकच्या वाटेवर होते. मांडवगणेंच्या घरासमोर प्रसार माध्यमांची गर्दी झाली होती. दु:खाचा डोंगर कोसळला होता... पण, वीरपत्नी विजेता सारे अवसान एकवटून शांतपणे उभ्या होत्या. एका पत्रकाराने युद्धाच्या चर्चेविषयी प्रश्न विचारताच अत्यंत उद्विग्न मनस्थितीत त्या उत्तरल्या, ‘सोशल मीडियावरचं युद्ध थांबवा पहिल्यांदा... एवढा जोश असेल, तर सीमेवर जाऊन लढा..!' त्या घटनेस एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्या स्वत: भारतीय हवाई दलात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या आहेत. सध्या हैदराबादला त्यांचे प्रशिक्षण सुरू असून, येत्या जूनमध्ये त्या भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

‘युद्ध नकोच, युद्धामुळे काय होतंं ते तुम्हाला माहीत नाही. युद्धाचे परिणाम शहीदांच्या कुटुंबांना विचारा..' अशा परखड शब्दांत त्या दु:खद प्रसंगातही अत्यंत खंबीरपणे उत्तर देणाऱ्या विजेता मांडवगणेंच्या धैर्याची प्रचिती त्याच दिवशी आली होती. कडेवर लहानगी वेदिता होती आणि पुढं पतीचं पार्थिव. सांत्वन करण्यासाठी नाशिकच्या डीजीपी नगरमधील त्यांच्या घरी परिसरातील नागरिक, नातलग, परिचित आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या वातावरणामुळे गोंधळलेल्या वेदिताला शांत करीत त्या ‘दिव्य मराठी'शी बोलत होत्या. आपले वडील नाहीत, याची तिला जाणीव होऊ न देणं, हे माझं यापुढे पहिलं कर्तव्य असेल, असे त्या म्हणत होत्या. लहानग्या वेदिताला मांडीवर घेऊन ‘निनाद कुठे गेले नाहीत, ते आमच्यासोबत होते आणि सोबतच राहातील,' असेही त्या म्हणाल्या. ‘सीआरपीएफ’मध्ये सेवा बजावलेल्या वीरेंद्रकुमार तिवारी यांच्या कन्या असलेल्या विजेता या देखील सर्व्हिस सिलेक्शन बोर्डात प्रशिक्षण घेत होत्या. तेथेच निनाद यांचा परिचय झाल्यावर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. ‘आज निनाद नसले, तरी आमचे लग्न आहेच ना.. मला संधी मिळाली, तर मीही सैन्यात दाखल होणार आहे...' अतीव दु:खाच्या त्या क्षणीही त्यांच्यातील निर्धाराचं अन् धैर्याचं दर्शन घडत होतं...

पतीला वीरमरण आल्याच्या दु:खाचा दगड महिना-दोन महिन्यांनी त्यांनी बाजूला सारला आणि त्यांच्या जागेवर आपल्याला संधी मिळावी, यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला. अखेरीस त्यांच्या निर्धाराला यश आले आणि जूनमध्ये त्यांची हवाई दलात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. त्याचवेळी वेदितेलाही नाशिकमध्ये प्री-स्कूलमध्ये घातले होते. एका बाजूला आईचं काळीज, तर दुसरीकडं वीरपत्नी म्हणून केलेला निश्चिय... भावनिक कात्रीत त्या सापडल्या. पण, शहीद निनाद यांचे आई-वडील सुषमा आणि विजय मांडवगणे यांच्या आश्वासक साथीनं त्यांचा निर्णय सोपा झाला. गेल्या सात महिन्यांपासून त्या हैदराबादमधील खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत. मन नाशकात, शरीराने हैदराबादमध्ये आणि लक्ष ध्येयावर! दृढ निश्चय, खंबीर मन आणि कोणत्याही संकटात कणखरपणे चिकाटीनं उभे राहाण्याची ताकद, हेच गुण यात उपयोगी पडत असल्याचे त्या मानतात. आई-वडिलांनी नाव ठेवलं, तेव्हा आजच्या परिस्थितीची त्यांना कणभरही कल्पना नसावी, पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळवत विजेता मांडवगणे यांनी हे नाव सर्वार्थाने सार्थ ठरवलंय. पतीने घेतलेला देशसेवेचा वसा अन् त्यातून लाभलेल्या राष्ट्रभक्तीच्या वारशाचा हृदयात होणारा ‘निनाद’ हाच जणू त्यांचा श्वास बनला आहे... देशरक्षणासाठी सरसावलेल्यांना शत्रूशी लढण्याआधी मनातलं, भावनांचं युद्ध जिंकावं लागतं... ‘हे’ रणांगण लीलया पार करुन, त्या आता सिद्ध होताहेत उत्तुंग गगनभरारीसाठी.. सर्वार्थानं ‘विजेता’ होण्यासाठी..!    
 

बातम्या आणखी आहेत...