आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत सत्ताकल्लोळ!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीप्ती राऊत  

एकाच बॅनरखाली रडत पण नांदत असलेल्या या दोन्ही पार्ट्या पुढली नाटके स्वतंत्र रंगमंचावर करतील याची ती सुरुवात होती. परंतु ऐन धंद्याच्या टायमाला दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या, टीझर होता - आमचं ठरलंय... निवडणुकीच्या बॉक्स ऑफिसवर दोन्ही पार्ट्या तुफान चालल्या. हिशेबाच्या दिवशीच पहिल्याने डरकाळी फोडली आणि मुख्यमंत्रिपदात अर्धा वाटा मागितला आणि नाटकाची स्क्रिप्ट बदलली... रंगीत तालीम फसली आणि मायबाप प्रेक्षकांच्या समोर वेगळेच नाट्य उभे राहिले.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून या महानाट्याची रंगीत तालीम सुरुवात झाली.

ग्रामसंत गाडगे महाराजांच्या मोझरीत भाजपच्या महाजनादेश यात्रेची ती सुरुवात होती. राज्यभर निघालेल्या त्या यात्रेचे हीरो एक आणि एकच होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. बॅनर, होर्डिंग, रथ, व्यासपीठ... सबकुछ देवेंद्रमय.

दुसऱ्या पार्टीने जनआशीर्वाद यात्रेद्वारे आपल्याही तालमी सुरू केल्या होत्या. एकाच बॅनरखाली रडत पण नांदत असलेल्या या दोन्ही पार्ट्या पुढली नाटके स्वतंत्र रंगमंचावर करतील याची ती सुरुवात होती, परंतु ऐन धंद्याच्या टायमाला दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या, टीझर होता - आमचं ठरलंय...

निवडणुकीच्या बॉक्स ऑफिसवर दोन्ही पार्ट्या तुफान चालल्या.

मतांचा गल्ला कमीच जमला.

हिशेबाच्या दिवशीच पहिल्याने डरकाळी फोडली आणि मुख्यमंत्रिपदात अर्धा वाटा मागितला आणि नाटकाची स्क्रिप्ट बदलली...

दिवाळीच्या फराळाच्या दिवशी महानायकाने त्याचे खंडन केले आणि एका रात्रीत तो खलनायक बनला.

रंगीत तालीम फसली आणि मायबाप प्रेक्षकांच्या समोर वेगळेच नाट्य उभे राहिले.


प्रवेश पहिला : स्थळ -  मातोश
्री 


रंगमंचावर भगवा बॅकड्रॉप... सेनाप्रमुखांची प्रतिमा... मध्यावर पक्षप्रमुखांची खुर्ची... एका बाजूला युवराज आणि दुसऱ्या बाजूला प्रधान मंडळ.

राजभवनावर नायकाने शस्त्र म्यान केल्यावर मातोश्रीवर प्रतिनायकाने शस्त्रं परजली.


"राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हा मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द'...


शेवटचे पण हुकमी भावनिक शस्त्र बाहेर...


बाळासाहेबांच्या खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील उघड.


खोटारडेपणाची चिखलफेक... संवादाची दारे पूर्ण बंद.


राममंदिराच्या बाजूने निकाल लागलाच तर तो सरकारचा नाही, लोकांचा विजय असेल...


रामाच्या सत्यवचनाचा डायलॉग....


राजकारणाच्या खिडक्या खुल्या ठेवत प्रतिस्पर्ध्याला ललकारण्याचा प्रतिनायकाचा केविलवाणा प्रयत्न.


नवनियुक्त राजपुत्रासह सर्व आमदारांना रंगशारदेतून मालाडच्या रिट्रीटमध्ये हलवल्याच्या बातमीने पहिल्या प्रवेशावर
पडदा.प्रवेश दुसरा - स्थळ वसंतस्मृती


राम जन्मभूमीचा निकाल हा कोणाचाही विजय नाही किंवा कोणाचाही पराभव नाही - काळजीवाहू नायकाची संयत प्रतिक्रिया


संयम बाळगल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार


गेल्या पाच वर्षांत दोन मिनिटांत आवरलेली पहिलीच पत्रकार परिषद.


आमच्याकडून संंवादाचा हात कायमच पुढे आहे... शांत चेहरा आतल्या भावनांचा थांग लागू देत नाही.


"वडलांना दिलेला शब्द' ...


(खसखस आणि हशा)


राममंदिराचा आनंद आणि अभिनंदनाचे पेढे.


पुन्हा निवडणुका ... कार्यकर्त्यांचे लकाकणारे डोळे...


नेत्यांचे चिंतातुर चेहरे


मॅडम पाठिंबा देणार नाहीत... साहेब कोणताही डाव टाकतील...


वरून काहीतरी चक्रं फिरतील.. सरकार आपलेच येईल...


आशा-आकांक्षा... शक्यतांचा खेळ..


मुख्यमंत्र्यांच्या बदललेल्या ट्विटर हँडलचा शॉर्ट - "काळजीवाहू मुख्यमंत्री!'

प्रवेश तिसरा, स्थळ - वर्षा बंगला


वर्षानुवर्षं सत्तेचा निवास बनलेल्या "वर्षा'वरील काळजीवाहू सत्ता थोडी अस्वस्थ..


"मी पुन्हा येणार' चा संवाद बदलून "काळजीवाहू'चं विशेषण जोडलेलं.


आत्मविश्वासाच्या अभेद्य चेहऱ्याआड चिंतेची न लपणारी झलक. एक शांतचित्ताचे वरदान लाभलेले, दुसरे तिकीट नाकारल्याने पडद्याआड गेलेले, तिसऱ्या पराभवानंतर प्रथमच बाहेर आलेल्या, चौथे हसमुखराय, पाचवे संकटमोचक आणि सहावे दिल्लीदूत... भाजपच्या कोअर समिटीचा काथ्याकूट सुरू.


"वर्षा'च्या अभेद्य भिंतींबाहेर आतली कुजबुज बाहेर येतच नव्हती. प्रवेशद्वारातून एखादी गाडी बाहेर येताच प्रवेशद्वारापासून फर्लांगावर रोखलेल्या मीडियाचे कॅमेरे सरसावत. त्याच्या गाडीच्या खिडकीत खुपसले जात. ज्यांच्याकडे बातमी असे ते मीडियाच्या ताफ्याला न जुमानता सुसाट गाडी हाकत. ज्यांच्याकडे काहीच नसे ते चमकेश नेते मुद्दाम कॅमेऱ्यांजवळ येताच गाडीची गती मंदावून काचा खाली करीत होते.

कोअर कमिटीची पहिली बैठक संपली, दुसरी सुरू झाली.

दुसरी संपली, तिसरी सुरू झाली.

बातमी काही मिळत नव्हती.

"वर्षा'च्या बाहेर जे सुरू होते तेच आतही...

बाहेरचे बातमीच्या प्रतीक्षेत आणि आतले दिल्लीतील निरोपाच्या.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी व्हिडिओ कॉन्फरन्स केल्याची बोगस ब्रेकिंग एकाने सोडून दिली आणि बाकीच्या सगळ्यांना कामाला लावले.

तिकडे पाच वाजून गेले.

सव्वापाच वाजता महाराष्ट्र प्रभारी यादवांना फोन आला. होत नसेल तर विरोधात बसा... फक्त एका मिनिटाचा निरोप.
सगळेच अवाक‌्. त्यांनाही हे अनपेक्षित.

थेट राजभवन गाठले.

अल्पमतातील सरकार बनवू इच्छित नाही... राज्यपालांना पत्र दिले.

इच्छित नाही? की बनवू शकत नाही?

पडलो तरी पाय वर...

पडलेले खांदे आणि काळवंडलेले चेहरे.

ज्यांच्यामुळे ही वेळ त्यांच्यावर निशाणा साधण्याची नामी संधी.. सेनेने जनादेशाचा अनादर केला...

शेवटच्या लढाईसाठी आयटी टीम सज्ज..

सेनेने जनादेशाचा अनादर केला.. एका मिनिटात हजार मेसेज व्हायरल... एका तासात हजारचे लाख...


(हळूहळू सर्व लाइट मंद होत बंद... मोबाइलच्या स्क्रीन लाइटच्या मिणमिणत्या प्रकाशात रंगमंचावर ब्लॅकआऊट)प्रवेश चौथा - स्थळ राजभवन


बॅकग्राउंडला फक्त आवाज ... मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच बसेल...

(फटाक्यांच्या कडकडाटात पडदा उघडतो. फोकस - राजभवनाच्या पाटीवर)

संध्याकाळचे साडेसहा वाजलेले..

नेहमीच्या शांत संध्याकाळला छेद देणारा मीडियाचा कलकलाट


राजभवनी शिस्तीला फाटा मारणारी गर्दी

काँग्रेस - राष्ट्रवादीची पत्रं पोहोचली का... सगळ्यांच्या डोक्यात महत्त्वाचा प्रश्न..

कुणी म्हणे नार्वेकरांच्या हातात होती... कुणी म्हणे फॅक्स येणार आहे...

प्रत्येक जण ब्रेकिंग न्यूजचे तारे तोडण्यात मश्गुल...

तेवढ्यात प्रधान मंडळासह राजपुत्राचा प्रवेश आणि कॅमेऱ्यांची पळापळ.

बॅरिकेड्सवरून कॅमेरे झूम करून फोटो काढण्याची कसरत...

सेना नेते आत जाऊन अर्धा तास झाला

एवढा उशीर का?

कुजबुज पुन्हा आघाडी सक्रिय
 
फॅक्सची वाट बघताहेत..

राजकुमार आणि प्रधान मंडळ बाहेर आले ते थेट मीडियाच्या टेबलापाशी.

पडलेले चेहरे, एकमेकांना हात देत, एकमेकांच्या नजरा टाळत.

भाऊजींच्या आधाराने राजपुत्राने किल्ला लढवला.. तिन्ही भाषांत संयत निवेदन केले...

"राज्यपालांच्या निमंत्रणानुसार आम्ही सरकार स्थापनेची तयारी दर्शवली, मात्र सहयोगी पक्षांच्या पाठिंब्याच्या पत्रासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली, ती राज्यपालांनी नाकारली. यापुढे काय होणार, मला माहीत नाही, पण आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार..'

काँग्रेसने गेम केला...

राष्ट्रवादीने खेळ खेळला..

ब्रेकिंग न्यूजचा धुमाकूळ.

दहा मिनिटांत दुसरी बातमी

राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले...

काही मिनिटांतच राष्ट्रवादीचे नेते राजभवनावर.

पाचच मिनिटांत बाहेरही.

मीडियाचा ताफा टाळून अजित पवारांची गाडी सुसाट बाहेर.

जयंत पाटलांच्या गाडीला मीडियाचा गराडा.

उद्या साडेआठपर्यंत सरकार स्थापण्याच्या तयारीसाठी ४८ तासांची मुदत दिल्याची माहिती.

प्रवेश पाचवा - स्थळ - वाय. बी. चव्हाण सेंटर


सफेद गाड्यांमधील सफेद कपड्याच्या नेत्यांची गर्दी..


एमएच १२, एमएच १८.. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक.

पवारांची काळी लँडक्रूझर दिमाखात आणि कोपऱ्यात यशवंतरावांचा पुतळा केविलवाणा.

काँग्रेस किती वेळ लावतेय... कार्यकर्ते त्रस्त, आमदार अस्वस्थ...

सोनियांच्या चर्चेनंतर काँग्रेसचे केंद्रीय नेते मुंबईकडे रवाना..

कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह...

आपल्या आमदारांना कोणतं खातं मिळणार याबाबत सुरू झालेले तर्कवितर्क

इतक्यात दिल्लीतील मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीच्या वृत्ताने खळबळ

राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालीना वेग..

राज्यपालांनी शिफारस न केल्याचा खुलासा

दुपारी दोनला नवाब मलिकांची पत्रकार परिषद

आमच्याकडे संख्याबळ नसल्याचं पालुपद

राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपालांच्या खुलाशाचं स्पष्टीकरण

त्याआधीच राष्ट्रवादीने पाठविलेल्या पत्राबद्दल चुप्पी

संध्याकाळचे पाच वाजलेले..

काँग्रेसचे लोक एवढा उशीर का करतात...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सहनशीलता संपायला आलेली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी.. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी.

एवढी गर्दी निवडणुकीच्या प्रचारात केली असती तर आमदार संख्या तरी वाढली असती..

एखादी कोपरखळी, एखादा चिमटा.

मामाचं पत्र हरवलं.. सोशल मीडियावर धुमाकूळ

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पाठवलेले शिष्टमंडळ चव्हाण सेंटरमध्ये दाखल.

दीड तास बैठक आणि संयुक्त पत्रकार परिषद.

काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री, आजी-माजी प्रदेशाध्यक्ष उजवीकडे..


राष्ट्रवादीचे जयंतराव, भुजबळ, वळसे पाटील डावीकडे..

"आमचं आधी ठरू द्या... मग त्यांच्यासोबत ठरवू...'

पडदा पडतो.

पडद्यावर हेडलाइन - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू..

चार दिवसांत मुख्यमंत्र्यांनी ट्विटर हँडल दुसऱ्यांदा बदलले - "महाराष्ट्राचा सेवक'
पडदा पडतो.

बँकग्राउंडला भाजपच्या महाजनादेश यात्रेतील गाण्याची धून...

प्रजा हीच राजा... मी सेवेकरी...

लेखिकेचा संपर्क - ९७६४४४३९९८