आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रफालवरून घमासान; आम्ही संरक्षण करार करतोय, काँग्रेसने तर संरक्षणाचाच सौदा केलाय:निर्मला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला खोटारडी संबोधले, राहुल यांनी माफी मागावी : निर्मला सीतारमण
  • संरक्षण मंत्र्यांनी विचारले-यूपीए सरकारने अगस्ता-वेस्टलँडची ऑर्डर एचएएलला का दिली नाही?
  • विरोधीपक्ष नेते खरगे म्हणाले की, सरकारने रफालच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केली आहे. 

नवी दिल्ली- रफालवर शुक्रवारीही लोकसभेत खडाजंगी झाली. रफाल करारावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, आम्ही संरक्षण करार करत आहोत अन् काँग्रेस संरक्षणाशी सौदा करत आली आहे. त्या सलग दोन तास बोलल्या. नंतर राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आणखी ४५ मिनिटे बोलल्या. राहुल म्हणाले- संरक्षणमंत्र्यांनी २ तासांत इतिहास ते आजवरच्या सर्व गोष्टी सांगितल्या. मात्र अनिल अंबानींचा उल्लेख केला नाही. मॅडम, हे तर सांगा की रफाल करारात अनिल अंबानींनी कुणी आणले होते. उत्तरात निर्मला भावुक होत म्हणाल्या, राहुल यांनी मला खोटारडी म्हटले. पंतप्रधांनांना ते चोर संबोधतात. त्यांनी माफी मागितली पाहिजे. 

 

जेपीसीच्या मागणीवर खडाजंगी 
१:३० वाजता: खरगे यांचे आरोप : सरकार कोर्टात खोटे बोलले, जेपीसी हवी 
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, सरकारने सुप्रीम कोर्टात खोटे शपथपत्र देत सांगितले की, कॅगने रफाल कराराचे ऑडिट केले. मग पीएसीने कॅग अहवाल तपासला. हे पूर्णपणे खोटे आहे. म्हणून आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत. त्यातून सर्व सत्य समोर येईल. 

२:०० वाजता: निर्मला सीतारमण यांचे उत्तर : करारात घोळ नाही, टायपिंग चूक होती 
रफाल करारावर ७४ बैठकांनंतर शिक्कामोर्तब झाले होते. कॅगचा मुद्दा तर टायपिंगची गफलत होती. आता कॅगचा अहवाल तयार झाला आहे. मी खरगेजींना विचारू इच्छिते की तुमच्या राजवटीत करार पुढे रेटण्यासाठी एक दशकभर का लागले? तुम्हाला देशाची चिंता नव्हती, ती आम्हाला आहे. 

 

मॅडम, अनिल अंबानींना करारात कुणी घुसवले हे आधी सांगा : राहुल गांधी 

राहुल : मॅडम! तुम्ही हे तर सांगा की या संपूर्ण करारात AA ला कोण घेऊन आले होते? तुम्ही तुमच्या दोन तासांच्या भाषणात AA चा साधा उल्लेखही केला नाही. 
निर्मला : विमान खरेदी करण्याचा काँग्रेसचा इरादाच नव्हता. तुमच्या प्रत्येक AAचे (अनिल अंबानी) उत्तर Q(क्वात्रोची), RV(रॉबर्ट वाड्रा) असे आहे. 
राहुल : पंतप्रधान हे स्वत:च सर्व करारांवर शिक्कामोर्तब करतात. आपल्या मित्राच्या खिशात ३० हजार कोटी रुपये टाकतात. मग मंत्र्यांना उत्तरे देत बसावे लागते. 
निर्मला : मला कुणा खानदानाच्या कृपेने हे पद मिळालेले नाही. मी एक सामान्य कुटुंबातील महिला आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत व कष्ट घेतले आहेत. 

 

करारातील घाईबद्दल... 
निर्मला : देशाला पाकिस्तान आणि चीनकडून आव्हाने मिळत आहेत. वायुदलाचे सामर्थ्य वाढवायचे होते. 
राहुल : असे असेल तर मग रफालची संख्या १२६ वरून घटवत ३६ का केली? विमाने स्वस्त होती तर १२६ का खरेदी केली नाहीत? 

 

एचएएलबद्दल... 
निर्मला : राहुल मगरीचे अश्रू ढाळत होते. मात्र, काँग्रेसने एचएएलला मजबूत केले नाही. 
राहुल : एचएएल सर्व विमाने तयार करत आले आहे. असे काय घडले की १० दिवसांपूर्वीची AA ची कंपनी एचएएलपेक्षा चांगली वाटू लागली. 

 

वैयक्तिक आरोपांबद्दल... 
निर्मला : राहुल यांनी मला खोटारडी संबोधले. पंतप्रधानांना चोर म्हणाले. ते सातत्याने दिशाभूल करत आहेत. 
राहुल (संसदेबाहेर) : निर्मला भावुक हाेऊन उत्तरे देण्यास टाळाटाळ करू पाहत आहेत. पर्रीकरांकडे कोणत्या फायली आहेत,ते त्यांनी सांगावे. 

मोदींना घेरण्यासाठी राहुल यांनी AA चा (अनिल अंबानी) उल्लेख केला, निर्मलांनी Q (क्वात्रोची) आणि RV (रॉबर्ट वाड्रा) म्हणत दिले प्रत्युत्तर 


राहुल गांधींनी संसदेत पुन्हा मारला डोळा!

आरोप केल्यानंतर खाली बसत असताना राहुल गांधींनी आपल्या खासदाराकडे पाहत डोळा मारला. या आधी जुलै २०१८ मध्ये मोदींची गळाभेट घेतल्यानंतर राहुल यांनी असाच डाेळा मारला होता.