आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक कारणामुळे महापालिकेच्या मिळकतकर नोटिशीचे घोडे अडले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका एरव्ही मिळकतकर थकबाकीच्या नोटिसा नोव्हेंबर महिन्यात पाठवत असते. आता जानेवारी उजाडला तरीही थकबाकीच्या नोटिसा दिलेल्या नाहीत. त्यामुळे कर संकलन विभागातील १०० कर्मचारी वसुली कामाविना बसून आहेत. जीआयएस पाहणीतील संगणकीय कारणामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

जीआयएसमार्फत मिळकत पाहणीच्या कामासाठी महापालिकेने मिळकतदारांची सर्व माहिती असलेल्या प्रणालीचा अधिकार मक्तेदार कंपनी सायबर टेकला दिला. त्यामुळे त्या माहितीपर्यंत महापालिकेच्या संगणक विभागाची पोहोच नव्हती. परिणामी थकबाकीच्या ताज्या आकड्याच्या नोटिसा काढणे शक्य झाले नाही. नोटिसाच नाहीत तर वसुली कशी करायची असा मुलखावेगळा प्रश्न महापालिकेच्या कर वसुली विभागास पडला आहे. आर्थिक वर्षाखेर जवळ असून तब्बल २५७ कोटींचा मिळकत कर थकीत अाहे. सुमारे २ लाख १० हजारपैकी किमान १ लाख थकबाकीदार असल्याचा अंदाज आहे. तेवढ्या लोकांना नोटिसा द्यायच्या आहेत. 

 

याविषयी विचारले असता थकीत मिळकतदारांची यादीच्या माहितीची पोहोच ३१ डिसेंबरपर्यंत कंपनीकडे होती. ती आता १ जानेवारीपासून महापालिका संगणक विभागाकडे आली असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी रात्रीपर्यंत याबाबत महापालिकेत खलबते सुरू होती. महापालिका उपायुक्त त्रिंबक ठेंगळे-पाटील यांच्याकडे कर संकलन, संगणक विभाग व जीआयएस मक्तेदार यांची बैठक झाली. याबाबत कर संकलन विभागाचे प्रमुख आर. पी. गायकवाड यांना विचारले असता, आमच्याकडे संगणकीय माहिती नाही. त्यामुळे कोणाची किती थकबाकी अाहे हे कळत नाही. त्यामुळे नोटीस देता येत नाहीत, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. तर संगणक विभागास विचारले असता, १ जानेवारीला थकबाकीदारांची यादी व थकबाकीचा आकडा मिळाला. नाेटीस प्रिंट काढण्याचे काम सुरू आहे. ते आम्ही कर वसुली विभागास देऊ. 

 

आगामी अंदाजपत्रकासाठी महिनाच शिल्लक 
आगामी अंदाजपत्रक मांडण्यास केवळ महिना शिल्लक आहे. थकबाकीदारांची यादी नसल्याने कर संकलन कर्मचारी ते वाटू शकत नाहीत. थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येत असल्याने थकीत रक्कम वाढत आहे. सावकारीपेक्षा जास्त दंडात्मक आकारणी होते. यामुळे नागरिकांचे जास्त पैसे जातात. वेळेवर वसुली होत नसल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण येतोय. त्यामुळे विकास कामासह अन्य कामासाठी निधी नसल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडत आहे.
 
नोटीस काढण्याचे काम सुरू आहे 
कराराप्रमाणे जीआयएस काम करण्यासाठी सायबर टेक कंपनीकडे माहिती दिली आहे. नोटीस काढण्यात अडचण येत आहे. त्यावर उपाय करण्याचे काम सुरू आहे. अडचण दूर होईल आणि नोटीस काढण्याचे काम सुरू करण्यात येईल. त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, मनपा कर संकलन विभाग 
 

बातम्या आणखी आहेत...