आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली विधानसभा : आपसमोर विजयाच्या पुनरावृत्तीचे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकासकामांच्या जोरावर निवडणुकीत सहजपणे बाजी मारण्याचा अरविंद केजरीवालांना विश्वास
  • त्रिकोणी लढत झाल्यास ‘आप’ अडचणीत

नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय पुन्हा प्राप्त करत त्यांचा मजबूत गड टिकवायचे अाव्हान आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही ते तसाच विजय मिळवतील का, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे. अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या कामांच्या जोरावर विजय मिळवण्याचा विश्वास असला तरी गेल्या वेळी जसा विजय मिळाला होता तसा यावेळी मिळणार नाही, असे जाणकारांना वाटते. २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आपची स्थापना झाली होती आणि त्या निवडणुकीत पहिल्यांदाच त्रिकोणी लढती झाल्या होत्या. त्यावेळी सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला ७० पैकी केवळ ८ जागा मिळाल्या होत्या, तर भारतीय जनता पक्षाला ३२ जागा मिळाल्या होत्या. ‘आप’ला २८ आणि इतरांना दोन जागेवर विजय मिळाला होता. यामुळे भाजपला बहुमतापासून चार जागा दूर राहावे लागले होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. लोकपालाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षांत वाद झाला आणि ४९ दिवसांत केजरीवाल सरकार कोसळले. त्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये विधानसभेची निवडणूक घेण्यात आली. 

या निवडणुकीत ‘आप’ने सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज खोटे ठरवत ७० पैकी ६७ जागा पटकावल्या. त्यापूर्वीच्या निवडणुकीत ३२ जागा जिंकत बहुमताजवळ पाेहोचलेल्या भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या, तर पंधरा वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला तर एकही जागा मिळाली नाही.२०१५ मध्ये सत्ता मिळवणाऱ्या केजरीवाल यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते होते. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर एकेक करत अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले. यात योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार या दिग्गजांचा समावेश आहे. आणखी एक प्रमुख चेहरा असलेले कुमार विश्वास पक्षात असले तरी विजनवासात आहेत. ‘आप’ने दिल्ली विधानसभा निवडणूक आणि २०१४-२०१९ च्या लोकसभा निवडणुकीशिवाय विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला. पंजाब विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता त्यांची झोळी रिकामीच राहिली आहे.त्रिकोणी लढत झाल्यास ‘आप’ अडचणीत
 
काँग्रेसने नुकतेच त्यांचे जुने नेते सुभाष चोपडा यांना नेतृत्व दिले आहे. इतर जुन्या नेत्यांनाही एकत्र करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. जर यावेळी काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली तर ‘आप’ अडचणीत येऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे. गेल्या वर्षी मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि काँग्रेस पाच जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. भाजप २१ वर्षांपासून सत्तेबाहेर


भाजप दिल्लीत २१ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा व १७३१ वसाहती नियमित करण्याच्या निर्णयामुळे भाजपला विजयाचा विश्वास वाटतो. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत झालेल्या तीन नगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांनी ‘आप’ला पूर्णपणे नाकारले असून यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांची स्थिती आणखी वाईट झाल्याचा दावा भाजपने केला आहे.