आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटच्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानाला २९ ऑक्टोबरचा मुहूर्त!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जेट एअरवेजने २९ ऑक्टोबरपासून दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची जय्यत तयारी केली असून डीजीसीएनेही या विमानसेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. जेट एअरवेजने या नवीन विमानाचे वेळापत्रकही वेबसाइटवर जाहीर केले. मात्र, दिल्ली विमानतळावर स्लॉट न मिळाल्यामुळे हे वेळापत्रक तात्पुरते मागे घेतले आहे. कोणत्याही स्थितीत २९ ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचा दावा कंपनीच्या दिल्लीतील सूत्रांनी केला आहे. 


औरंगाबादची एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जुलैमध्ये झालेल्या बैठकीला जेट एअरवेजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नवील मेहता शहरात आले होते. तेव्हा त्यांनी या विमानसेवेची घोषणा केली होती. डीजीसीएची परवानगी आणि दिल्लीत स्लॉट मिळण्याची गरज या दोन अडचणी त्यांनी त्या वेळी मांडल्या होत्या. कंपनीने जुलैमध्ये डीजीसीएकडे परवानगीसाठी अर्जही केला होता. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कंपनीला ही परवानगी मिळाली. 


डीजीसीएची परवानगी मिळाल्यानंतर जेट एअरवेजने १ ते १५ सप्टेंबरदरम्यान वेबसाइटवर दिल्ली- औरंगाबाद-दिल्ली या विमानसेवेचे वेळापत्रक टाकले होते. मात्र, बुकिंग सुरू केली नव्हती. यानंतर जेटच्या दिल्ली आणि औरंगाबाद कार्यालयात बुकिंगसाठी गर्दी सुरू झाली. ऑनलाइन विचारणा, फोन कॉल वाढले. २९ ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू करण्याची जेट एअरवेजची तयारी होती. मात्र, विमानतळ प्राधिकरणाने दिल्ली विमानतळावर सकाळचा स्लॉट न दिल्याने कंपनीला हा निर्णय मागे घ्यावा लागला. असे असले तरी कंपनीने आशा सोडलेली नाही, सकाळचा स्लॉट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. २९ ऑक्टोबरची डेडलाइन चुकणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. 


...तर उद्यापासून सेवा सुरू
कंपनीतील एक उच्चस्तरीय अधिकारी म्हणाले, सर्वच विमान कंपन्यांना सकाळ किंवा संध्याकाळचे स्लॉट हवे असतात. यालाच प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, दिल्ली, मुंबईसारख्या व्यग्र विमानतळांवर या वेळेत जागा नसल्याने अडचण येते. दुपारी विमान सुरू करायचे असेल तर उद्यापासून करू शकतो, असे त्यांनी सांगितले. 


चार वर्षांनंतर थेट विमान...
दिल्लीसाठी चार वर्षांपूर्वी ३ विमाने होती. २०१२-१३ मध्ये जेटचे एक विमान बंद झाले. त्यापाठोपाठ एअर इंडियाचे विमान बंद झाले. २०१३-१४ मध्ये स्पाइसजेटचे सकाळ-संध्याकाळचे विमान बंद झाले. यामुळे दिल्लीहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या सत्रात थेट विमान नव्हते. त्यांना मुंबईहून जावे लागायचे. सध्या दिल्लीसाठी एअर इंडियाचे एकमेव विमान संध्याकाळी आहे. 


संभाव्य वेळापत्रक असे 
२९ ऑक्टोबरपासून विंटर शेड्यूलमध्ये सुरू होण्याची शक्यता असलेले हे विमान सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान दिल्लीहून निघेल, तर ११ ते १२.३० दरम्यान येथून परत जाईल. कंपनी सकाळी ५, ६ वाजेची वेळही घेऊ शकली असती. मात्र, जेटला फक्त दिल्लीतून नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतातील प्रवासी मिळवायचे आहेत. पहाटे हा प्रवासी दिल्लीत पोहोचत नाही. यामुळे उशिराची वेळ मागितली आहे. परत जाणाऱ्यांनाही ही वेळ सोयीची असेल. मात्र, नेमका हा स्लॉट उपलब्ध नाही. 

बातम्या आणखी आहेत...